चांदूर बाजारात निर्माण होणार अत्याधुनिक पशुवैद्यकीय चिकित्सालय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या पाठपुराव्याला यश

चांदूर बाजारात निर्माण होणार अत्याधुनिक पशुवैद्यकीय चिकित्सालय
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या पाठपुराव्याला यश

              अमरावती दि.१४ : ब्रिटीशकाळापासून जनावरांच्या बाजारासाठी राज्यभर प्रसिद्ध असलेल्या चांदूर बाजार येथे सुसज्ज पशुवैद्यकीय चिकित्सालयाची मागणी होत होती. जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी त्याचा पाठपुरावा केल्याने चांदूर बाजार येथे अत्याधुनिक पशुवैद्यकीय चिकित्सालय निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.  

            चांदूर बाजार हे जनावरांच्या बाजारासाठी ब्रिटीशकाळापासून प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथे पंचायत समिती स्तरावर एकमेव पशु वैद्यकिय दवाखान्याची सोय आहे. मात्र, चांदूर बाजार तालुक्यातील पशुधनाची संख्या, तेथील बाजारपेठ पाहता येथे तालुका स्तरावर जनावरांवर सर्व प्रकारचे उपचार करणारे सुसज्ज चिकित्सालय निर्माण करण्याची तालुक्यातील पशुपालक बांधवांची अनेक वर्षांपासून मागणी होती. राज्यमंत्री श्री. कडू यांनी पाठपुरावा करुन ही मागणी शासनाकडून मंजूर करुन घेतली. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय दवाखान्याचे रुपांतर पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात करण्याचा निर्णय जाहीर केला असून त्यासाठी पाच पदांचा आकृतीबंधालासुध्दा मान्यता दिली आहे. येथील कार्यरत पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी या पदाचे नविन चिकित्सालयात समायोजन करण्यास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयाने तालुक्यातील पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. 

          चांदूर बाजार तालुक्यात पशु सर्व चिकित्सालय होण्यासाठी आधी पदभरती व काही नवीन पदांची निर्मिती करणे गरजेचे होते. कोरोनाकाळात ही बाब काहीशी कठीण होती. मात्र, राज्यमंत्री श्री. कडू यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पदनिर्मितीचा मार्ग सुकर झाला व चिकित्सालयालाही मान्यता मिळाली. त्यासाठी आवश्यक विविध संवर्गातील चार नवीन पदे निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या चिकित्सालयात पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त, पशुविकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, कृषी परिचारक, वरिष्ठ लिपीक, परिचर असे प्रशिक्षित मनुष्यबळ कार्यरत राहणार आहेत.

 000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती