Monday, October 18, 2021

जिल्हा नियोजनाबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकसर्व क्षेत्रांना न्याय; परिपूर्ण नियोजनातून अधिकाधिक विकासकामे करणारप्रशासनाने प्राप्त निधीनुसार नियोजित कामे पूर्ण करावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



जिल्हा नियोजनाबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
सर्व क्षेत्रांना न्याय; परिपूर्ण नियोजनातून अधिकाधिक विकासकामे करणार
प्रशासनाने प्राप्त निधीनुसार नियोजित कामे पूर्ण करावी
             - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

· गत आर्थिक वर्षातील 457 कोटी 7 लक्ष रु. खर्चाला मंजुरी
· चालू आर्थिक वर्षात 485.67 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद

अमरावती, दि. 18 : सर्व क्षेत्रे व घटकांच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून परिपूर्ण नियोजनातून अधिकाधिक विकासकामे राबविण्यात येतील. प्रत्येक तालुक्याला चांगला निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच प्राप्त निधीनुसार नियोजित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश  राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  आज येथे दिले.   

            जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात आज झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रताप अडसड, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेच्या 2020- 21 या वर्षातील सर्वसाधारण योजनेत 271 कोटी 39 लक्ष रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेत 101 कोटी 69 लक्ष, आदिवासी उपयोजनेत 83 कोटी 99 लक्ष रूपये अशा एकूण 457 कोटी 7 लक्ष रूपये खर्चाला यावेळी मंजुरी देण्यात आली.

वार्षिक योजनेत सर्वसाधारण योजनेत 2021-22 या वर्षात 300 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 101 कोटी 70 लक्ष व आदिवासी उपयोजनेसाठी 83 कोटी 97 लक्ष निधीची अशा एकूण 485 कोटी 67 तरतूद आहे.

कोविड संकटामुळे उद्भवलेली स्थिती पाहता सध्या 10 टक्के निधी प्राप्त आहे. उर्वरित निधीही शासनाकडून लवकरच प्राप्त होणार असून, आवश्यक कामांचे प्रस्ताव तत्काळ द्यावेत. तरतुदीनुसार निधी मिळूनही अद्याप कामे पूर्ण न करणा-या विभागांनी ती तत्काळ पूर्ण करावीत. त्यात कुठलीही हयगय खपवून घेणार नाही. जिल्हा नियोजनातील निधीची तरतूद पाहता प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

                                    अनुपस्थितांना नोटीसा

नियोजनाची महत्वाची बैठक असतानाही गैरहजर राहणा-या अनुपस्थित अधिकारी, कर्मचा-यांना नोटीसा बजावाव्यात. असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

  रात्री वीजकपात नको; विजेचे वेळापत्रक जाहीर करा

थकित वीज देयकांत टप्पाटप्प्याने  बिल अदा करण्याची सवलत द्यावी. वीज कपात करू नये. त्याचप्रमाणे, पावसामुळे डीपी बंद  पडल्यास तत्काळ दुरुस्ती झाली पाहिजे. शेतकरी बांधवांचे नुकसान होता कामा नये. रात्री वीज कपात करू नये. विजेचे वेळापत्रक जाहीर करा. जिल्हा नियोजनातून यापूर्वी दिलेल्या निधीतून ट्रान्सफॉर्मर खरेदीबाबत काय प्रक्रिया झाली, याबाबत परिपूर्ण माहिती सादर करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

  जलजीवन मिशनचे अधिकाधिक प्रस्ताव द्यावेत

सार्वजनिक ठिकाणी कार्यरत वाहतूक पोलीस, महिला कर्मचारी यांच्यासाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे आवश्यक आहेत. तशी तरतूद व्हावी. जल जीवन मिशनचे केवळ १६ प्रस्ताव गेले. अधिकाधिक प्रस्ताव द्यावेत. महिनाभरात ही कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.   

दिवंगत अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबाला 50 लक्ष रूपये साह्य

 कोविडकाळात सेवारत असताना निधन झालेल्या कोविड योद्धा शिवनंदा कोंडे यांच्या कुटुंबियांना 50 लक्ष रूपये सानुग्रह अनुदानाचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आला. दिवंगत शिवनंदा कोंडे या मोर्शी तालुक्यातील डोमक येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या.  

000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...