तिवसा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट व रुग्णवाहिकेचे लोकार्पणप्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होईल - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर





तिवसा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट व रुग्णवाहिकेचे लोकार्पण
प्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होईल
-   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

              अमरावती, दि. 14 : प्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावी, यासाठी ठिकठिकाणी पी.एस.ए.ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येत आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यावर भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे केले.

            तिवसा उपजिल्हा रुग्णालय येथे पी. एस. ए. ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन व दोन रूग्णवाहिकांचे लोकार्पण  पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. सभापती पूजा आमले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम, तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. गौरव विधळे, आरोग्य अधिकारी डॉ. योगेश तलमले आदी यावेळी उपस्थित होते .

             तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची प्रत्येक दिवशी 45 जंबो सिलेंडर भरले जातील एवढी क्षमता आहे. विविध तालुक्यांत ऑक्सिजन प्रकल्पांची सुविधा होत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट आणि सक्षम होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. त्या म्हणाल्या की,  कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये अमरावती शहराने राबविलेला पॅटर्न देशभरासाठी मार्गदर्शक ठरला व तो सर्वत्र राबविण्यात आला. 'अमरावती पॅटर्न' राबविल्यामुळे बहुतेक शहरांना कोविड साथीचे प्रमाण कमी करण्यात यश आले. तथापि, अजूनही कोविडचे संकट टळले नाही. यामुळे प्रत्येकाने कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

            गावांमध्ये, खेड्या-पाड्यांमध्ये संपूर्ण लसीकरण व्हावे यासाठी लसीकरणाचे शिबिर आयोजित करा. वृद्ध व्यक्तींना शिबिरापर्यंत येण्यासाठी वाहन सुविधा पुरवा. गावातील प्रत्येक घरी लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगा. कोविड लसीकरणामध्ये अमरावती जिल्हा अव्वल रहावा, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी  यावेळी केले .

             उपजिल्हा  रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार समुपदेशक अफसर पठाण यांनी मानले .

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती