किलबिलत्या पाखरांचा उत्साह आनंद देणारा - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 



जिल्ह्यात शाळा सुरु; विद्यार्थ्यांची उत्साहात उपस्थिती

किलबिलत्या पाखरांचा उत्साह आनंद देणारा

      - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 

कोविड प्रतिबंधक नियमपालनाबाबत व्यवस्थापनाला निर्देश

 

अमरावती, दि. 4 : शाळा सुरू झाल्यामुळे चिमुकल्या किलबिलत्या पाखरांचा उत्साह आनंद देणारा होता. मुलांचा शाळांमध्ये परतल्यानंतरचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. कोविडचे सर्व नियम पाळून शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे राज्याचे महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.

 

राज्यभरात आजपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून  कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा  गजबजल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज जिल्ह्यातील काही शाळांची पाहणी केली. यावेळी श्रीमती ठाकूर यांनी शाळा व्यवस्थापनाला खबरदारीच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची सूचना केली.

 

शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी अतिशय आनंदात उपस्थित झाले असून जुन्या मित्रांच्या भेटीगाठी आणि नवी पुस्तके यामध्ये विद्यार्थी रमून गेले आहेत. शाळा अचानक सुरू करण्यात आल्याने मागच्या वर्षीचा गणवेश तोकडा झाल्याने रंगीबेरंगी कपड्यात शाळेत जाण्याची मौज सगळ्यांनी अनुभवली. महिला व बालविकास मंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. मास्क लावणे अनिवार्य आहे, सातत्याने हात स्वच्छ धुणे आणि सॅनिटाइज करणे तसेच योग्य अंतर राखणे, अशा कोविड प्रतिबंधक सूचनाही त्यांनी विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधताना केल्या. शाळेत सातत्याने स्वच्छता राखण्याचे आणि मुलांना कोरोनाचे नियम पाळण्याविषयी सजग करण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला श्रीमती ठाकूर यांनी दिल्या.

 

वेळोवेळी आरोग्याचा आढावा घेऊन कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी निर्देश प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

 

00000

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती