राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा भजन संगीत प्रार्थनेद्वारे गुरूदेवभक्तांचे राष्ट्रसंतांना वंदन मंगलमय वातावरणात निनादले प्रार्थनेचे सूर

 








राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा

भजन संगीत प्रार्थनेद्वारे गुरूदेवभक्तांचे राष्ट्रसंतांना वंदन

 

मंगलमय वातावरणात निनादले प्रार्थनेचे सूर

 

अमरावती, दि. 25 : गुरूकुंज मोझरी आश्रमाचा पावन परिसर, गुरुदेवभक्तांनी गायिलेली सुमधूर भजने, आसमंत निनादून सोडणारे प्रार्थनेचे सूर अशा मंगलमय वातावरणात मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 53 वा पुण्यतिथी सोहळा पार पडला.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी प्रार्थनेत सहभागी होऊन राष्ट्रसंतांना वंदन केले. आमदार बंटी भांगडिया, सुरेंद्र भुयार, पुष्पाताई बोंडे, आश्रमाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सचिव जनार्दन बोथे यांच्यासह अनेक गुरुदेवभक्त यावेळी उपस्थित होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर सोहळा न करता मर्यादित गुरूदेवभक्तांच्या उपस्थितीत पुरेशा दक्षतेसह प्रार्थना व वंदन कार्यक्रम झाला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळाला वंदन केले. त्यानंतर आश्रमात आयोजित प्रार्थनेत सहभाग घेतला. राष्ट्रसंतांच्या अनेकविध रचनांसह विविध धर्मांच्या प्रार्थना यावेळी सादर करण्यात आल्या. भजन आणि प्रार्थनेच्या मंगलमय सूरांनी आसमंत निनादून गेले होते. समस्त गुरुदेवभक्त प्रार्थनेत तल्लीन होऊन गेले होते. जगावरील कोरोनासारखी अरिष्टे दूर होवोत, सर्वत्र शांतता व समृद्धी नांदो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. परिसरातूनही अनेक गुरुदेवभक्त यावेळी उपस्थित होते.

000  

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती