Thursday, October 14, 2021

बारा रुग्णवाहिका, मॅमोग्राफी यंत्रणेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण अत्याधुनिक साधनसामग्रीमुळे आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर




बारा रुग्णवाहिका, मॅमोग्राफी यंत्रणेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
अत्याधुनिक साधनसामग्रीमुळे आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण
-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

          अमरावती, दि. 14 : नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हेच सर्वोच्च प्राधान्य मानून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यात येत आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात मॅमोग्राफी यंत्रणा उपलब्ध झाल्याने महिलांमधील कर्करोगाचे निदान वेळीच शक्य होऊन तत्काळ उपचार होऊ शकतील. जिल्ह्यात नव्या 12 रूग्णवाहिका उपलब्ध झाल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होऊन ग्रामीण रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले .

          विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे स्तन कर्करोगाचे निदान करणाऱ्या मॅमोग्राफी मशीनचे उद्घाटन व 12 रूग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. तुळशीदास भिलावेकर आदी यावेळी उपस्थित होते .

                                    अत्याधुनिक रुग्णवाहिका आरोग्यसेवेत दाखल

अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा बारा रुग्णवाहिकांना विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते मार्गस्थ करण्यात आल्या. बाराही रूग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय तसेच आश्रमशाळा यांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत .यापूर्वीही नऊ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोविड साथीची पार्श्वभूमी लक्षात घेता आरोग्य विभाग अधिकाधिक सक्षम व्हावा, यासाठी विविध अद्ययावत यंत्रणा व सामग्री उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  

 मॅमोग्राफी यंत्रणेमुळे जलद निदान व उपचार शक्य

            दिवसेंदिवस बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमधील स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. या आजारावर प्राथमिक स्तरावरच निदान झाल्यास रोगाच्या प्रथम टप्प्यावरच उपचार करणे शक्य होते. मॅमोग्राफी मशिनची सुविधा सुपर स्पेशालिटी रूग्णालयात उपलब्ध झाल्यामुळे जलद निदान व उपचार शक्य होतील.

खेड्यापाड्यातील महिलाभगिनींनामध्ये स्तन कर्करोगाबद्दल जनजागृती निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .

       श्रीमती ठाकूर यांनी यावेळी क्ष-किरण केंद्राची पाहणी केली. तसेच येथील डॉक्टर्स आणि परिचारिकांची संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या दूर करण्याची ग्वाही दिली.

 

          0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...