मोथा- बासलापूर वनातील तलावाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजनपर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनाला चालना - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर





मोथा- बासलापूर वनातील तलावाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन
पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनाला चालना
          - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

       अमरावती, दि. १५ : चांदूर रेल्वे तालुक्यातील मोथा बसलापूर येथील वनक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या तलावामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री  ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

      वन विभागातर्फे बासलापूरच्या जंगलात निर्माण करण्यात आलेल्या तलावाचे जलपूजन पालकमंत्री ऍड. ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, तत्कालीन सहायक वन संरक्षक अशोक कविटकर, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

      मोथा बासलापूरच्या हिरव्यागार जंगलात या सुंदर तळ्याची निर्मिती करण्यात आली आहे.
आज विजयादशमीच्या मुहूर्तावर
मान्यवर, वनप्रेमी, नागरिक यांच्या उपस्थितीत जलपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रारंभी टाळ-मृदंगाच्या निनादात वन प्रवेशद्वारापासून जलपूजन स्थळापर्यंत वनफेरी काढण्यात आली. जलपूजनानंतर पालकमंत्री व इतर सर्व मान्यवरांनी तळ्यापासून काही अंतरावर वनविभागाने उभारलेल्या मनोऱ्यावर जाऊन वनाचे व परिसराचे अवलोकन केले व विविध बाबींची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली.

       या तलावामुळे जंगलातच मोठा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय होऊन त्यांचा जंगलाबाहेरील वावर थांबेल. वनानजिकच्या शेती क्षेत्रातही भूजलपातळी सुधारण्यास या तलावामुळे मदत होणार आहे. वनाचे पर्यावरण सुधारण्याबरोबरच पर्यटकांसाठी हे स्थळ महत्वाचा आकर्षणबिंदू ठरेल. जल व वन व्यवस्थापनाचे हे काम सर्वांसाठी आदर्श ठरणारे आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

 
     तलावाच्या भिंतीची लांबी 320 मीटर आहे. तलावात मोठ्या प्रमाणावर जलसाठा असून त्याची खोली 20 फूट आहे. सुमारे ८ कोटी लीटर पाणीसाठा येथे झाला  आहे. वनतलावासाठी जिल्हा नियोजनातून १८ लक्ष रुपये निधी देण्यात आला. तलावाचे अंदाजपत्रक व तलाव बांधकाम श्री. कविटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाळ
आशिष कोकाटे, वनरक्षक संतोष आखरे, वनसेवक अजय चौधरी यांनी केले आहे. वनतलावासाठी योगदान देणाऱ्या या सर्वांना पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात आले.
०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती