Wednesday, October 13, 2021

जिल्ह्यात अभियानासाठी 50 लाख रुपयांचा कृती आराखडा


पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे होणा-या लिंग निवडीला व स्त्रीभ्रूण हत्यांना प्रतिबंध करणे, मुलींच्या जिविताची व संरक्षणाची जबाबदारी, तसेच मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे आवश्यक आहे. त्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान जिल्ह्यात घरोघर पोहोचवावे.

- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 
जिल्ह्यात अभियानासाठी 50 लाख रुपयांचा कृती आराखडा
 बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

-   जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे बैठकीत निर्देश

 
अमरावती, दि. 13: 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या केंद्र शासनाच्या योजनेतंर्गत विविध नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम राबवून मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या सर्व स्तरावर जनजागृती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

             'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानामध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून, जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. त्याच्या बैठकीत श्रीमती कौर बोलत होत्या. अभियानासाठी सन 2021-22 या वर्षासाठी 50 लक्ष रूपयांचा कृती आराखडा यावेळी मंजूर करण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .कैलास घोडके, बालविकास प्रकल्प अधिकारी राजश्री कोलखेडे, श्रीमती एम. पांचाळ, अतुल भडंगे, मिनाक्षी भस्मे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी उमेश टेकाळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ .मनिषा सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी श्रीमती देशमुख आदी यावेळी उपस्थित होते .

            समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, यासाठी शासन  स्तरावरून एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगून श्रीमती कौर पुढे म्हणाल्या की, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन तयार करण्यात आले आहे. सर्व विभागांनी त्यात सक्रीय सहभाग घ्यावा. यामध्ये कर्तबगार मुलींच्या पालकांचा सत्कार, पथनाट्य, गर्भलिंगनिदान होणार नाही यासाठी विविध पथके, गर्भलिंग निदान झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई, विविध माध्यमांद्वारे प्रचार -प्रसिद्धी आदी बाबींचा समावेश आहे. यासाठी महिला व बाल विकास विभागासोबतच आरोग्य, शिक्षण, पोलीस, ग्रामविकास तसेच अन्य विभागांनी समन्वय साधून ही योजना प्रभावीपणे राबववी , असेही त्या यावेळी म्हणाल्या .

            'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजना राबविण्यासाठी महिला बाल विकास विभाग नोडल एजन्सी म्हणून काम करणार असून शासनाच्या इतर विभागांना या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे .त्यामुळे सर्वच विभागांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांगीण प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.

             मुलींच्या जन्माविषयी पालकांच्या मनातील न्यूनगंड नाहीसा करणे, मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा करणे, मुलींना शिकवून सक्षम करणे त्याचबरोबर विविध क्षेत्रात संघर्ष करुन ठसा उमटवलेल्या कर्तबगार मुली आणि पालकांचा सत्कार, आंतरराष्ट्रीय कन्या दिवस, जागतिक महिला दिनी मुली आणि महिलांचा सत्कार करणे आदी उपक्रमांचा कृती आराखड्यामध्ये समावेश असल्याची माहिती श्री. घोडके यांनी यावेळी दिली.

                                                                           *****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...