Saturday, October 23, 2021

सेजलच्या भाऊ-बहिणीला ॲड. यशोमती ठाकूर यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले; बहिणीच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारली



सेजलच्या भाऊ-बहिणीला ॲड. यशोमती ठाकूर यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले; बहिणीच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारली

आत्महत्याग्रस्त विद्यार्थिनीच्या कुटुंबाला महिला व बालविकास मंत्र्यांनी दिला आधार

         अमरावती, दि. 23 : कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने तणावात येऊन छिदवाडी येथील सेजल जाधव या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. लेकीच्या अशा अचानक निघून जाण्याने उध्वस्त झालेल्या जाधव कुटुंबाला महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आधार दिला. श्रीमती ठाकूर यांनी सेजलच्या भाऊ-बहिणीला शिक्षणासाठी दत्तक घेतले असून, जाधव कुटुंबाला तातडीची आर्थिक मदतही केली आहे.

            तिवसा तालुक्यातील छिदवाडी येथील सेजल जाधव या 17 वर्षीय विद्यार्थिनीने कुटुंबावरील कर्ज, नापिकी,  हलाखीची परिस्थिती यामुळे तणावात येऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत कळताच मंत्री श्रीमती ठाकूर हेलावून गेल्या. त्यांनी तातडीने तत्काळ जाधव कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांची व्यथा जाणून घेत सेजलच्या भाऊ- बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली व कुटुंबाला 10 हजार रूपयांची तत्काळ आर्थिक मदतही दिली. सेजलच्या भावंडांच्या शिक्षणाच्या जबाबदारीसह तिच्या बहिणीच्या विवाहाची जबाबदारी मंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वीकारली आहे.

महिला व बालविकास मंत्र्यांकडून युवकांना कळकळीचे आवाहन

एखाद्या विद्यार्थ्याने असा विचार करावा व स्वत:चे जीवन संपवावे, ही अत्यंत सुन्न करून टाकणारी ही घटना आहे. ही वेदना शब्दांत मांडता येत नाही. आत्महत्येसारखे घातक पाऊल कुणीही उचलू नये. आत्महत्या हा इलाज नाही. संकट आले तर हार मानू नका. एकदा का जीव गेला तर तो पुन्हा येणार नाही. विद्यार्थी व तरूणांनी डिप्रेशनमध्ये येऊ नये. हिंमत ठेवावी, असे कळकळीचे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी केले.

            जाधव कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहू. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासनाच्या वतीने मदत मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. अशा घटना घडू नयेत म्हणून प्रभावी व सातत्यपूर्ण समुपदेशन यंत्रणा उभारण्यासाठीही प्रयत्न करू. यानुषंगाने प्रशासनानेही आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...