Friday, April 14, 2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पर्व सामाजिक न्याय भवनात जयंती कार्यक्रम

 
















भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पर्व

सामाजिक न्याय भवनात जयंती कार्यक्रम

सामाजिक न्याय योजनांचा लाभ वंचितांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे

-  खासदार डॉ. अनिल बोंडे

 

अमरावती, दि. १४ : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचले. वंचितांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक न्याय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तो पोहोचण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व सर्वदूर जनजागृती करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजकल्याण कार्यालयातर्फे सामाजिक न्यायभवनात कार्यक्रम व विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार नवनीत राणा, प्रा. सुभाष गवई, रश्मी नावंदर, प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, प्रादेशिक उपसंचालक विजय साळवी, सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, श्री. मेटकर, दीपा हेरोळे आदी उपस्थित होते.  

खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श संविधानाची निर्मिती केली. देशात कल्याणकारी राज्यनिर्मितीसाठी संविधानात सामाजिक न्यायाची संकल्पना समाविष्ट केली. ती साकार करण्यासाठी वंचित घटकांसाठी शासनाकडून विविध योजना-उपक्रम राबवले जातात. त्याचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे.

खासदार श्रीमती राणा म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी ‘द प्रॉब्लम् ऑफ द रूपी : इट्स ओरिजिन ॲन्ड इट्स सोल्युशन’ हा ग्रंथ लिहिला. वित्त आयोग, राज्य व केंद्र शासनातील संपत्तीची वाटणी आदींबाबत विचार त्यांनी त्यावेळी मांडले होते. त्यांचे आर्थिक विषयांतील लेखन, संकल्पना याच आधारावर पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पाया घातला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, संविधाननिर्माते, तसेच संसदेतील कार्य याबाबत अभ्यासपूर्ण मांडणी प्रा. गवई यांनी आपल्या व्याख्यानातून केली.  श्री. वारे यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमीहिन सबळीकरण योजना, मिनी ट्रॅक्टर बचत गट योजना, गटई स्टॉल वितरण  आदी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी लाभ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या ‘समन्याय’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. श्रीमती केदार यांनी प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचा-यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...