Wednesday, April 19, 2023

विभागीय आयुक्तांनी केली रोव्हर मशीनच्या प्रात्यक्षिकांची पाहणी

 





विभागीय आयुक्तांनी केली रोव्हर मशीनच्या प्रात्यक्षिकांची पाहणी

अमरावती दि. 19 : विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांनी आज ऑफिसर्स क्लब येथे रोव्हर मशीनची पाहणी केली. रोव्हर मशीनचे प्रात्यक्षिक व कामकाजाबाबत भूमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी माहिती दिली. या मशीनच्या सहाय्याने जमीनीचे मोजमाप अचूक व अल्पावधीत करता येते. अमरावती विभागास शासनाकडून व जिल्हा नियोजन समितीकडून आतापावेतो एकूण 134 रोव्हर प्राप्त झाले आहेत.

अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर, अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा, बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. ह. पी. तुम्मोड,  वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपायुक्त संजय पवार, भूसुधार सहायक आयुक्त शामकांत म्हस्के, अकोला महानगरपालिका आयुक्त कविता व्दिवेदी, भूमि अभिलेख विभागाचे  उपसंचालक विलास शिरोळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भूमि अभिलेख विभागात संगणकीकरण व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून अल्पावधीत जमिनीची अचूक मोजणी करून प्रकरणांचा निपटारा करण्यावर भर दिला जात आहे. सर्व्हे ऑफ इंडीयाच्या मदतीने, महाराष्ट्रात 77 ठिकाणी कॉर्स स्टेशन उभारण्यात आले असून जमिन मोजणीसाठी रोव्हर वापरून जी.पी.एस. रिडींग घेतले जाते व अवघ्या अर्ध्या ते एक तासात मोजणीची संपूर्ण प्रक्रीया अचूकरित्या पूर्ण होते.

 रोव्हर मशिन वापरून मोजणी केल्यामुळे मोजणी कामात अचूकता व पारदर्शकता येते. जमीन मोजणीचा अक्षांश-रेखांश आधारित नकाशा तयार होतो. मोजणीसाठी अल्प कालावधी लागतो. शिवाय मनुष्यबळ कमी लागते, यामुळे कमी खर्च होतो. नकाशाचे जिओरेफरेंसिंग करण्यास मदत होते.

        अमरावती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख स्मिता शहा, बुलडाणा जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख विजयकुमार सवडतकर, यवतमाळ जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिवदास गुंड व वाशिम जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिवाजी भोसले, उपअधीक्षक अनिल फुलझेले आदी यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ पाण्डेय यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आज पाचही जिल्ह्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी महाराजस्व अभियान, मनरेगा, नगरविकास विभाग, जत्रा शासकीय योजनांची उपक्रमाबाबात जिल्हानिहाय आढावा बैठक घेतली.


                                                           ********

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...