Wednesday, April 26, 2023

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम बैठक

 








जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम बैठक

कृषी निविष्ठांबाबत परिपूर्ण नियोजन करा

-  जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 26 : आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

 

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक महसूलभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, कृषी उपसंचालक अनिल खर्चान आदी यावेळी उपस्थित होते.     

 

जिल्ह्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 6 लाख 81 हजार हेक्टर असून, सोयाबीन, कापूस, तूर ही मुख्य पीके आहेत. गतवर्षी खरीप पिकाचे 6 लाख 74 हजार हे. पेरणी क्षेत्र होते. येत्या हंगामासाठी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारी, उडीद व मका आदी पिकांसाठी 83 हजार 24 क्विंटल बियाण्याची गरज आहे. सोयाबीन या मुख्य पीकासाठी 66 हजार 938 क्विंटल, कपाशीसाठी 5 हजार 850 क्विंटल व तुरीसाठी 4 हजार 746 क्विंटल बियाणे लागणार आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात मक्याचा पेरा जास्त असतो. त्यामुळे मक्याचे 3 हजार 600 क्विंटल बियाणे लागणार आहे. शेतकरी बांधवांना वेळेत बियाणे उपलब्ध असावे यासाठी परिपूर्ण नियोजन व कार्यवाही व्हावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. 

 

युरिया, एसएसपी, डीएपी, संयुक्त व मिश्र खते आदी सर्व खतांसाठी 1 काम 14 हजार 310 मे. टन आवंटन मंजूर आहे. त्यापैकी 45 हजार 47 मे. टन खतसाठा उपलब्ध आहे. उर्वरित अपेक्षित खतसाठा वेळेत सर्वदूर उपलब्ध राहील यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे, सरळ खतांचा वापर वाढविणे, ठिबक व सूक्ष्म सिंचनाद्वारे खत वापर आदींसाठी प्रयत्न व्हावेत. खत आवंटनानुसार दरमहा पुरवठ्याचे संनियंत्रण करण्यासाठी तालुक्यांचे रेकनिहाय नियोजन करावे, असे  निर्देश श्रीमती कौर यांनी दिले.  

 

गत खरीप हंगामात 1 हजार 400 कोटी रू. पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. ते 1 हजार 327.80 कोटी पर्यंत साध्य झाले आहे. पुढील हंगामासाठी 1 हजार 450 कोटी उद्दिष्ट असून, ते साध्य करण्यासाठी वेगाने कार्यवाही करावी. गरजू शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचून त्यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून द्यावा. पीक विम्याबाबत 13 हजार 700 शेतकरी बांधवांना पूर्वसूचना प्राप्त असून, ते पात्र आहेत. त्यांना तत्काळ विम्याचा लाभ मिळवून द्यावा. कृषी पंप वीज जोडणी, तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंपासाठी प्रलंबित अर्ज निकाली काढून संबंधितांना लाभ मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

अनधिकृत बियाणे, बोगस खते आदी आढळल्यास गुणनियंत्रण विभागाकडून कार्यवाही होत आहे. गतवर्षी सोयाबीनचे 36 लक्ष 73 हजार रू. किमतीचे 214.75 क्विंटल बियाणे, तसेच 7 लक्ष 95 हजार रू. किमतीचे 16.20 मे. टन बोगस खत आणि 4 लीटर अनधिकृत कीटकनाशक जप्त करण्यात आले. गतवर्षी कृषी निविष्ठांचे 2 हजार 360 नमुने काढण्यात आले. त्यात 194 कोर्टकेस पात्र नमुने आढळले. त्याचप्रमाणे, पाच प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, 21 परवाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. सातपुते यांनी सादरीकरणातून दिली.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...