पी एम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूसंपादन येत्या पंधरा दिवसात पूर्ण करा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 










पी एम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूसंपादन येत्या पंधरा दिवसात पूर्ण करा

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

अमरावती, दि. 10 : ‘पीएम मित्रा’ टेक्सटाईल पार्कमध्ये अनेक मोठे उद्योग गुंतवणूक करण्यास इच्छुक असून त्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर पडेल व  मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. पार्क उभारणीसाठी लागणाऱ्या जमीन संपादनाचे काम पंधरा दिवसात पूर्ण व्हावे, असे निर्देश  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कच्या भूसंपादनासाठी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत हे यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे, तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, आमदार श्वेता  महाले, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय,  प्र. जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विपीन शर्मा सभागृहात उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले की, पार्कसाठी गतीने जमीन संपादित होत आहे. या पार्कमुळे अनेक चांगले उद्योग अमरावतीत येतील. अनेक कंपनी येथे येण्यास इच्छुक आहेत. उद्योग विभागातर्फे याबाबत गुंतवणूकदारांची परिषद घ्यावी. तसेच वस्त्रोद्योग कंपन्यांसोबत सामंजस्य करार  होण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, अमरावती येथे ४१३.०७ हे. जागेवर पीएम मित्रा पार्क प्रस्तावित आहे. पार्कसाठी २२० हे. भूमी संपादित झाली आहे. केंद्र शासनासोबत करार करण्यात येईल. पुढील १५ दिवसांत उर्वरित आवश्यक भूमी संपादित करण्यात येईल. कापसावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग येथे सुरू होतील. त्याचा लाभ कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, रिद्धपुर येथे मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी समिती 15 दिवसांत स्थापन करण्यात येईल. समितीत एका महानुभाव अभ्यासकाचा समावेश करण्यात येईल. आता रिद्धपुर येथे थीम पार्कमध्ये सभागृह, कक्ष उपलब्ध आहेत. तिथे तत्काळ विद्यापीठाचे आवश्यक ते काम सुरू करावे. याठिकाणी अनेक अभ्यासक्रम मराठीत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी या विद्यापीठाचा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले.

पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कबाबत:

पीएम मित्रा ही योजना देशातील तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या सात राज्यांतील सात शहरांमध्ये सुरु करण्यात आली असून त्याअंतर्गत वस्त्रोद्योगाचे पार्क उभारण्यात येतील. त्यात अमरावती शहराचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या फाईव्ह एफ व्हिजन (म्हणजे फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) प्रेरित, पीएम मित्रा पार्क्स भारताला कापड उत्पादन आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनविण्याच्या सरकारच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे.

 सर्व उपयुक्त सुविधा, पुरेसा वीज पुरवठा, पाण्याची उपलब्धता आणि सांडपाणी विल्हेवाट लावण्याची व्यवस्था, एक प्रभावी सिंगल विंडो सिस्टीम तसेच अनुकूल आणि स्थिर औद्योगिक वस्त्र धोरण तयार होणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती