Saturday, January 31, 2026

DIO NEWS 31-01-2026

 राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा

अमरावती, दि. 31 (जिमाका):  गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर रविवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार डॉ. भोयर हे रात्री 8 वाजता तिवसा येथील श्री. देवरावदादा हायस्कूल प्रांगणात आयोजित 'आमदार चषक 2026' या अखिल भारतीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीने नागपूरकडे प्रयाण करतील.

0000000

Friday, January 30, 2026

DIO NEWS 30-01-2026

 बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सुविधांसाठी 10 लाखांपर्यंत अनुदान

*20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 30 (जिमाका) : राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या आणि ज्या संस्थांमध्ये ५१ टक्केपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त किंवा सदस्य आहेत, अशा संस्थांसाठी राज्य शासनाकडून मदत दिली जाणार आहे. बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयीसुविधांसाठी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत पात्र संस्थांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागवले आहेत. इच्छुक संस्थांनी प्रस्ताव २० फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे लागणार आहे. यासाठी संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असणे आणि नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत असणे आवश्यक आहे. संस्थेच्या विश्वस्त किंवा सदस्यांमध्ये बौद्ध समाजाचे प्रमाण ५१ टक्केपेक्षा जास्त असावे. या योजनेचा लाभ एका संस्थेला पाच वेळाच घेता येणार आहे.

या योजनेंतर्गत प्रामुख्याने स्वतःची इमारत असल्यास इमारतीचे किरकोळ नूतनीकरण व डागडुजी, शुद्ध पेयजल व्यवस्था, प्रसाधनगृह आणि स्वच्छतागृह उभारणी, ग्रंथालय, अभ्यासिका, संगणक कक्ष किंवा रिसर्च सेंटर अद्ययावत करणे, विपश्यना केंद्र किंवा प्रशिक्षण केंद्राचे नूतनीकरण, फर्निचर, जनरेटर, इन्व्हर्टर, सोलर सुविधा आणि सुरक्षा कॅमेरे बसवणे, कार्यशाळा किंवा सभागृहाचे बांधकाम व सुशोभीकरण या सुविधांसाठी निधी दिला जाणार आहे.

इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय, अल्पसंख्याक कक्ष, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, अमरावती येथे दोन प्रतीत सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000000

पारधी, फासे पारधी समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

* अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत

अमरावती, दि. 30 (जिमाका) : धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे सन 2025-26 या वर्षासाठी 'पारधी पॅकेज' अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या फक्त पारधी आणि फासे पारधी समाजातील पात्र लाभार्थ्यांनी 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पारधी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी पाच मुख्य योजनांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यात लाभार्थ्यांना शेळ्यांचा गट घेण्यासाठी अर्थसहाय्य. स्वयंरोजगारासाठी ऑटो रिक्षा खरेदीकरिता मदत, संगणक व झेरॉक्स मशीन खरेदी करून तांत्रिक व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य, पारधी समाजातील बचतगटांसाठी ट्रॅक्टर खरेदीची सुविधा, गरजू लाभार्थ्यांना व्यवसायासाठी ई-खटला खरेदीसाठी मदत देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांच्या सोयीसाठी विविध तालुकानिहाय अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत, धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालय, धारणी, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यासाठी अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती कार्यालय, मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यासाठी उप कार्यालय, मोर्शी येथे अर्ज उपलब्ध असतील.

प्राप्त अर्जांची संगणकीय यादी तयार करून कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पात्र उमेदवारांची निवड 'ईश्वर चिठ्ठी' पद्धतीने केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, दिव्यांग, विधवा, परितक्त्या आणि निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयातील विकास शाखा किंवा दुरध्वनी क्रमांक 07226-224217 यावर संपर्क साधावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी केले आहे.

00000

सोमवारी जिल्हा लोकशाही दिन

अमरावती, दि. 30 (जिमाका) : फेब्रुवारी महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संबंधितांनी व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

00000



राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली

        अमरावती, दि. 30 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदरांजली वाहिली. तसेच, याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

             यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चापले, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आदरांजली वाहिली.

00000

--

Thursday, January 29, 2026

DIO NEWS 29-01-2026







                        जिल्हाधिकारी कार्यालयात अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

            अमरावती, दि. 29 (जिमाका) : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून, आज जिल्हाधिकारी कार्यालयात शोकसभा आयोजित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

            यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चापले, अधिक्षक निलेश खटके आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी अजितदादा पवार हे शिस्तीप्रिय होते. त्यांचा वक्तशिरपणा सर्वांच्या परिचयाचा होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटांचे मौन पाळून मृतात्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी तातडीने निर्णय घेतला आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील आणि प्रशासनातील एक मार्गदर्शक हरपला असल्याचे सांगितले.

             शासनाने जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या राजकीय दुखवट्यामुळे कार्यालयातील सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

00000

भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया;

जिल्ह्यात आजपासून ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान

अमरावती, दि. 29 (जिमाका): कुष्ठरोगाविषयी समाजात असलेली भीती, अंधश्रद्धा आणि भेदभाव दूर करून रुग्णांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी उद्या, 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात 'स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान' आणि 'कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियान' राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली असून, त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

कुष्ठरोग हा पुरातन काळापासून अस्तित्वात असला, तरी आजही या आजाराबद्दल अनेक भ्रामक कल्पना समाजात आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि कुष्ठरुग्णांना भारतीय संविधानाने दिलेल्या 'समानतेच्या अधिकाराची' जाणीव करून देण्यासाठी यंदा ‘भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

बहुविध औषधोपचार पद्धतीमुळे हा आजार शंभर टक्के बरा होतो. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये यावरील औषध मोफत उपलब्ध आहे. वेळेत उपचार घेतल्यास कुष्ठरोगामुळे येणारी शारीरिक विकृती पूर्णपणे टाळता येते. मात्र, निदानास उशीर झाल्यास रुग्णाच्या कार्यक्षमतेवर आणि पर्यायाने देशाच्या आर्थिक प्रगतीवरही परिणाम होतो.

या अभियानामध्ये नियमित सर्वेक्षणासोबतच समाजातील वंचित घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यामध्ये वीटभट्टी कामगार, खाणकामगार, कारखान्यातील मजूर, कारागृहातील बंदी, तसेच आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांची विशेष तपासणी केली जाणार आहे. कुष्ठरोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता तातडीने शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा आणि उपचार पूर्ण करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

000000

लाडकी बहीण योजना: पात्र महिलांच्या अर्जातील त्रुटी सुधारण्याची संधी

अमरावती, दि. 29 (जिमाका): राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. ज्या पात्र महिलांनी ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण करताना चुकीचा पर्याय निवडला आहे, अशा महिलांचे लाभ सध्या तांत्रिक कारणास्तव बंद झाले आहेत. या त्रुटी सुधारण्यासाठी पात्र महिलांनी त्वरित आपल्या संबंधित अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी केले आहे.

या योजनेची प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून तांत्रिक चुका झाल्याचे निदर्शनास आले असून, 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देऊनही अनेक अर्ज प्रलंबित आहेत. योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्याचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे आणि ती महिला असावी. तसेच, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक नसावा. मात्र, अर्ज भरताना किंवा ई-केवायसी करताना अनावधानाने चुकीची माहिती भरली गेल्यामुळे अनेक पात्र महिला या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. अशा महिलांची यादी आता प्रत्यक्ष पडताळणीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी व ग्रामीण) यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.

ज्या महिलांचा लाभ तांत्रिक कारणास्तव थांबला आहे, त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकेकडे स्वयंघोषणा पत्र भरून द्यावे. अंगणवाडी सेविका या अर्जांची यादी तयार करून ती बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सादर करतील, जेणेकरून अर्जातील चुका दुरुस्त होऊन लाभ पुन्हा सुरू होईल. अधिक माहितीसाठी महिलांनी थेट बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000000

सोमठाणा खुर्द येथील पुनर्वसित ग्रामस्थांना घरमूल्यांकनाचा मोबदला मिळणार; कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 29  (जिमाका): मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत 2013-14 मध्ये पुनर्वसन झालेल्या आकोट वन्यजीव विभागातील मौजे सोमठाणा खुर्द येथील 112 घरमूल्यांकन धारकांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना घरमूल्यांकनाची दोन पट रक्कम देय असून, आवश्यक निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आकोट वन्यजीव विभाग,  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया यांनी दिली आहे.

मोबदला मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी पुढील कागदपत्रे आकोट वन्यजीव विभाग कार्यालयात सादर करावीत. यामध्ये 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्ज, सुरू असलेल्या बँक खाते पुस्तकाची छायाप्रत, आधारकार्डची छायाप्रत, नमुना 8 ची छायाप्रत (मूळ लाभार्थी मृत असल्यास वारस प्रमाणपत्र व वारसांच्या बँक खात्याची प्रत)  ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

लाभार्थ्यांची सविस्तर यादी www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी सोमठाणा खुर्द येथील लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000000

शहरात प्रतिबंधात्मक कलम 37  (1) व (3) लागू

अमरावती, दि. 12 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37  (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. दि. 10 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.

000000

Tuesday, January 27, 2026

DIO NEWS 27-01-2026

 खतांची अवैध विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई;

2 केंद्रांचे परवाने रद्द, तर 21 निलंबित

         अमरावती, दि. 27 (जिमाका): जिल्ह्यातील कृषी विक्री केंद्रांकडून होणारी खतांची साठेबाजी, जादा दराने विक्री आणि खतांसोबत इतर निविष्ठांची सक्ती (लिंकींग) करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत. खत नियंत्रण आदेश 1985 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील दोन कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, 21 केंद्रांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते योग्य दरात उपलब्ध व्हावीत, यासाठी जिल्हास्तरावर विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, तालुका स्तरावर 14 कृषी अधिकारी (खत नियंत्रण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जर एखाद्या केंद्रावर एमआरपीपेक्षा जास्त दराने खत विक्री होत असेल, साठा असूनही खत नाकारले जात असेल किंवा बोगस खतांची विक्री होत असेल, तर शेतकऱ्यांनी घाबरून न जाता तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक विक्री केंद्रावर एक क्यूआर (QR) कोड लावण्यात आला आहे, जो स्कॅन करून शेतकरी आपली तक्रार गुगल फॉर्मद्वारे नोंदवू शकतात. याव्यतिरिक्त, 8080536602 या व्हॉट्सॲप क्रमांकावरही तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

0000000



रस्ते अपघातात तातडीने मदत पोहोचवावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 27 (जिमाका) : रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावा, यासाठी कॅशलेस सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील अपघाताचे ठिकाण शोधून त्याठिकाणचे रूग्णालय यात अंगीकृत करावे, तसेच रस्ते अपघातात तातडीने मदत पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज रस्ते सुरक्षा समितीची सभा पार पडली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, अपघात रोखण्यासाठी गतीरोधक बसविताना शास्त्रोक्त पद्धतीने बसविण्यात यावी. यामुळे वाहनांचे संतुलन बिघडून अपघात घडू नये, याची काळजी घ्यावी. गती कमी करण्यासाठी स्ट्रीप्स बसविण्यात येतात. यामुळे वाहनांवरील नियंत्रण होत नसल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे गतीरोधकाची कामे करताना तांत्रिक बाबी तपासून कामे करण्यात यावी. यासोबतच अपघाताची ठिकाणे शोधून त्याठिकाणी उपाययोजना करण्यात यावी.

राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गाला पोहोच असणाऱ्या रस्त्यांवर गतीरोधक बसविण्यात यावे. त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या वाहनांची गती कमी होण्यास मदत मिळेल. तसेच बसेस थांबविण्यासाठी योग्य जागा शोधून त्याठिकाणी थांबविण्यात याव्यात. मोर्शी येथे रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडचण होत असल्याने ही अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावीत. शिंगणापूर येथील हायमास्टचे काम तातडीने करण्यात यावे. तसेच अपघाताची माहिती पोर्टलवर तातडीने भरण्यात यावी. रस्ता सुरक्षा अभियाना नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केली.

0000000




शेतीच्या नुकसानीची दर महिन्यात पाहणी करावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 27 (जिमाका) : नांदगाव पेठ येथील रतन इंडियाच्या प्रकल्पामुळे शेतपिकाचे नुकसान होत असल्याची तक्रारी येत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी यानंतर आता दर महिन्यात शेतपिकांची पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज रतन इंडिया पॉवर लिमीटेडमधील विविध प्रश्नांवर आज बैठक पार पडली. यावेळी आमदार राजेश वानखेडे, जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चापले यांच्यासह कंपनी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, वीज प्रकल्पामुळे परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी कृषी विभागातर्फे दर महिन्यात पाहणी करण्यात येईल. सध्या कृषी विभागाने शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान नोंदविले आहे, त्याची भरपाई देण्यात येईल. यात कोणतीही कपात करू दिली जाणार नाही. यासोबतच 16 जणांच्‍या अनुकंपा तत्वावरील नोकरीचा प्रश्नही विचार करण्यात यावा. यासाठी व्यवस्थापनासोबतच चर्चा करावी. वाघोली गावात राखेची धुळ येत असल्यामुळे यावर उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच गावाच्या स्थलांतरणाबाबत विचार करण्यात येईल.

प्रकल्पामध्ये विविध करणांनी आंदोलने होतात. ही आंदोलने शांततेच्या मार्गाने करण्यात यावी. तसेच काही समस्या निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. राखेच्या वाहतुकीमध्ये पारदर्शकता आणावी. वजन मोजण्यासाठी वे ब्रिजची व्यवस्था करण्यात यावी. प्रकल्पाशी संबंधीत व्यक्तींना त्रास होणार नाही, याची प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

000000


Sunday, January 25, 2026

DIO NEWS 26-01-2026

 








प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

अमरावती, दि. 26 (जिमाका) : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी दिली. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते जिल्हा शोध व बचाव पथकात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यात अमरावती (ग्रामीण) पोलीसातील दीपक पाल, दीपक डोरस, सचिन धरमकर, सुमित बांबल आणि गजानन वाडेकर, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ मधील विशाल निमकर, भूषण वैद्य, देवानंद भुजाडे, आकाश निमकर, अर्जुन सुदंल्डे आणि गणेश जाधव, मनपा अग्निशामक विभागातील सुशांत तायडे, सुरेश पालवे, जिल्हा होमगार्डमधील अजय आसोले, प्रफुल्ल भुसारी, महेश मांदाळे, सूरज ठाकूर, सागर माहुलकर आणि दीपक चिल्लोरकर यांचा समावेश आले.

यावेळी उपस्थितांना कृष्ठरोग निर्मूलनाची शपथ देण्यात आली. ध्वजारोहण कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, दुर्गा देवरे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा सूचना अधिकारी मनीषकुमार, तहसीलदार निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी उपस्थित होते.

000000





























जिल्ह्याच्या शेती, शिक्षण, औद्योगिक विकासावर भर देणार

-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

-जिल्ह्यात 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

-'राष्ट्र प्रथम' संकल्पनेत देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायती

- प्रत्यक्ष मैदानावर येऊन शिक्षण मंत्र्यांचे प्रोत्साहन

अमरावती,दि. 26 (जिमाका) : जिल्ह्याला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी शेती, शिक्षण  उद्योग आणि महिला सक्षमीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे. यात प्रामुख्याने सिट्रस इस्टेटमधील एआय प्रकल्प आणि आशियातील सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा देतील. शासन शेतकरी, महिला, युवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवित असून प्रगत तंत्रज्ञानाने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.    

प्रजासत्ताक दिनाच्या 77वा वर्धापन दिन पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर पार पडला. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या कृषी, शिक्षण , औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटन क्षेत्रातील प्रगतीचा आलेख मांडला.

यावेळी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले जनार्दन बोथे गुरुजी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद तसेच इतर विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, शेतकरी हा देशाचा कणा असून गेल्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत केली आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. प्रामुख्याने संत्रा पिकासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता'  आधारित तंत्रज्ञानाचा प्रकल्प राबविला जात आहे. औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी 'पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क'ची स्थापना करण्यात आली असून अमरावती विमानतळावरील आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे.

चिखलदरा येथील 'स्कायवॉक'मुळे पर्यटनात वाढ होणार आहे. तसेच मेळघाटातील नाईट सफारी आणि 'मधाचे गाव' ही संकल्पना स्थानिक आदिवासींचे जीवनमान उंचावेल. तसेच सिंधी समाजाच्या नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क दिला आहे. 'लाडकी बहीण' लाभार्थींनी पतसंस्था स्थापन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे.

प्रजासत्ताक दिनी राज्यभरातील 1 लाख शाळांमधील 2 कोटी विद्यार्थ्यांनी 'राष्ट्र प्रथम' या संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायती सादर केल्या. ज्यामध्ये जिल्ह्यातील 1 हजार 500 विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून आकर्षक कवायती सादर केल्या. विद्यार्थ्यांमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती, स्वयंशिस्त आणि शारीरिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्र्यांनी मैदानावर येऊन दाद दिली. यावेळी त्यांच्यासह सर्वांनी टाळ्यांचा कडकडाटात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. त्यांनी मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, माजी विद्यार्थी संघ स्थापना, विविध समित्यांचे एकत्रीकरण, कॉपीमुक्त अभियान आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची घोषणा करीत शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा मानस व्यक्त केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम गुरुकुंजचे सचिव जनार्दन बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाबद्दल श्री. भुसे यांनी श्री. बोथे गुरुजी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. समाजसेवेसाठी श्री. बोथे गुरुजी यांना जाहीर झालेला पद्‌मश्री पुरस्कार हा सर्व अमरावतीकरांसाठी अभिमान आणि गौरवाचा क्षण असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर विविध पथकांनी परेड संचलन केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा 'बालविवाहमुक्त' करण्याबाबत शपथ देण्यात आली.

0000000


DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...