राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची
‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान”
अमरावती, दि. 20 (जिमाका): राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अमरावती डाक विभागातर्फे ‘नन्ही मुस्कान, बडी उडान’ विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेत 10 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी ‘सुकन्या समृद्धी खाते’ उघडण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील डाक अधिकारी, कर्मचारी शाळा, अंगणवाडी तसेच घरोघरी जाऊन मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनजागृती करीत आहेत. मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी सुकन्या समृद्धी खाते हा एक महत्त्वाचा उपक्रम असून पालकांनी मुलीचे खाते उघडून त्यांच्या भविष्यासाठी भरीव पाऊल उचलावे, असे आवाहन प्रवर अधिक्षक डाकघर यांनी केले आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मुलींचे शिक्षण व आर्थिक सक्षमीकरणासाठी जागरूकता निर्माण करण्याचा डाक विभागाचा मानस आहे. तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या ध्येयाला बल देणाऱ्या या योजनेचा लाभ घ्यावा, मुलींच्या स्वप्नांना पंख द्यावेत, असे आवाहन डाकघरचे प्रवर अधीक्षक पी. ए. गेडाम यांनी केले आहे.
000000
माजी सैनिक, वीर पत्नींची माहिती पाठविण्याचे आवाहन
अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यातील माजी सैनिक व्याख्येत येत नसलेले, तसेच सैन्यातील निवृत्तीवेतन मिळत नसलेले माजी सैनिक, वीर पत्नी, 65 वर्षे वयावरील माजी सैनिक, वीर पत्नी यांची माहिती दि. 31 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.
000000
विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपत्ती प्रवण शाळांमधील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आपत्ती प्रवण भागातील शाळेमध्ये शाळा सुरक्षा कार्यक्रम घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील आपत्तीचे प्रमाण पाहता जीवित हानी टाळण्यासाठी, तसेच आपत्तीची घटना घडल्यास आपत्तीची तीव्रता कमी करण्याकरीता पूर, आग, वीज, भूकंप, रस्ता अपघात यासारख्या घटनांमध्ये काय करावे आणि काय करू नये, याविषयी जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपदा मित्र आणि अपदा सखी, समुदाय स्वयंसेवक हे प्रशिक्षक म्हणून कार्य करीत आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रशिक्षणात प्रथमोपचार आपत्तीमध्ये उचल पद्धती, आपत्ती म्हणजे काय, आपत्तीमध्ये शासनाची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण हे निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनात होत असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाळांमधील कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे. या प्रशिक्षणाला शिक्षकांचे सहकार्य मिळत आहे. तसेच तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हा शोध व बचाव पथक उपस्थित राहत आहेत.
00000
मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या परीक्षेस सुरवात
अमरावती, दि. 20 (जिमाका) : अमरावती येथे कार्यरत देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या पहिल्या परीक्षेस सोमवार, दि. 19 जानेवारीपासून सुरूवात झाली आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेनंतरच्या या पहिल्याच परीक्षा असल्याने विद्यार्थी आणि व्यवस्थापनामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पहिलेच वर्ष असल्याने विद्यापीठाने चार अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यात कला स्नातक (बी.ए.) भाषा व लिपीशास्त्र, प्रादर्शिक कला स्नातक (बी.पी.ए. नाटक), स्नातकोत्तर मराठी (अभिजात भाषा) आणि स्नातकोत्तर मानसशास्त्र या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापिठाचे पहिलेच वर्ष असतानाही 49 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. अभ्यागत प्राध्यापकांच्या सहकार्याने प्रथम सत्राचे वर्ग सुरू करण्यात आले. कालपासून या सर्व चार अभ्यासक्रमांच्या पहिल्या सत्राची परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली आहे. याचा विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यापीठाचा प्रारंभ असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक होती, परंतु विद्यापीठ व्यवस्थापनाने तज्ज्ञ अभ्यागत प्राध्यापकांना निमंत्रित करून त्यांच्याकडून अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थीवर्ग सुखावला असून विद्यापीठाबद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे.
अनेक अडचणी असतानाही विद्यापीठाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच या चार अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली. विद्यार्थ्यांनी उत्तम प्रवेशास प्रतिसाद दिला. अभ्यासकांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची मांडणी केली असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकाळात या अभ्यासक्रमांचा निश्चितच उपयोग होणार आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी नवे अभ्यासक्रम विद्यापीठ सुरू करणार असल्याचे विद्यापीठाच्या कला व साहित्य प्रशालेचे अधिष्ठाता व प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. कोमल ठाकरे यांनी सांगितले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment