जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद जयंती साजरी
अमरावती, दि. 12 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, दुर्गा देवळे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, माहिती तंत्रज्ञान अधिकारी मनिषकुमार, जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चाफले आदी उपस्थित होते. उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000
शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 12 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 163 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 13 जानेवारी ते दि. 2 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.
000000
महानगरपालिका क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी
*कामगार उपायुक्तांचे आवाहन
अमरावती, दि. 12 (जिमाका): आपल्या देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 अंतर्गत येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कामगार मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे आवाहन कामगार उप आयुक्त च. अ. राऊत यांनी केले आहे.
लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार, मतदानाच्या दिवशी मतदारांना सुट्टी मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. मात्र, अनेक संस्था किंवा आस्थापना आपल्या कामगारांना सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. ही बाब लोकशाहीसाठी घातक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने यावेळी कडक आदेश निर्गमित केले आहेत.
हे आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी कंपन्या, कारखाने, सर्व प्रकारची दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स आणि मॉल्स यांना लागू राहतील. जे कामगार निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत आहेत, पण त्यांचे नाव मतदार यादीत आहे, त्यांनाही ही सुट्टी लागू असेल. अपवादात्मक परिस्थितीत, जिथे कामाच्या स्वरूपामुळे पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नाही, अशा ठिकाणी कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे मालकांना बंधनकारक असेल. जर कोणत्याही मालकाने किंवा व्यवस्थापनाने या सूचनांचे पालन केले नाही किंवा कामगारांना मतदानापासून वंचित ठेवले, तर तक्रार प्राप्त होताच संबंधित आस्थापनेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी या सवलतीचा लाभ घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
0000
तृतीयपंथीयांना तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाईन
अमरावती, दि. 12 (जिमाका) : तृतीयपंथीयांना तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्काचे संरक्षण कायदा 2019 व नियम 2020 संपूर्ण देशात लागू झाला आहे. त्याअनुषंगाने तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींसाठी केंद्र शासनातर्फे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथीयांसाठी 14427 हा राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक जाहिर करण्यात आला आहे. या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे तृतीयपंथीय व्यक्तींना योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया संबंधित मार्गदर्शन, अडचणीचे निराकरण, तसेच तक्रारी नोंदविण्यासाठी केंद्र शासनाची तृतीयपंथीय हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment