जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
'एक दिवस सैनिकासाठी' अभियानाला सुरवात
अमरावती, दि. 7 (जिमाका): देशसेवेतून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी 'एक दिवस सैनिकांसाठी' हे अभिनव अभियान सुरू केले आहे. 23 डिसेंबर 2025 रोजी ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमात दिलेल्या आश्वासनानुसार, दर महिन्याचा पहिला मंगळवार हा माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आला असून, त्याअंतर्गत काल 6 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या विशेष दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी (भातकुली) दादासाहेब दराडे, उपविभागीय अधिकारी (दर्यापूर) राजेश्वर हाडे, अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे, तहसीलदार अश्विनी जाधव (नांदगाव खंडेश्वर), तहसीलदार रवींद्र कानझडे (दर्यापूर) आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
या अभियानादरम्यान माजी सैनिकांच्या जमिनीचे प्रलंबित वाद, शेतीमध्ये जाण्यासाठी रस्त्यांची अडचण आणि माजी सैनिक विश्रामगृहाच्या बांधकामाशी संबंधित तांत्रिक विषयांवर चर्चा करण्यात आली. महसूल अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून अनेक प्रकरणांमध्ये जागीच मार्ग काढला, तर काही जटिल प्रकरणांमध्ये कालमर्यादा निश्चित करून ती सोडवण्याचे निर्देश दिले. या उपक्रमात मोठ्या संख्येने वीर माता, वीर पत्नी आणि माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पुढाकारामुळे प्रशासकीय दप्तरदिरंगाई दूर होऊन सैनिकांच्या प्रश्नांना न्याय मिळत असल्याबद्दल माजी सैनिक समुदायाने समाधान व्यक्त केले आहे.
000000
समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी पाच दिवस वाहतुकीत बदल
अमरावती, दि. 7 ( जिमाका): हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात येत आहे की, अमरावती जिल्ह्यातील महामार्गाच्या पट्ट्यात 9 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 या पाच दिवसांच्या कालावधीत वाहतूक तात्पुरती थांबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 'हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे काम एकूण 10 टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.
जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या कि.मी. 90+500 ते कि.मी. 150+300 या दरम्यान ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. या कामाच्या प्रत्येक टप्प्यादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवली जाईल. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर त्या वाहिनीवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या तांत्रिक कामामुळे प्रवाशांचा काही काळ खोळंबा होण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेनुसार करावे आणि महामार्गावरील कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
00000
.jpg)
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment