दिव्यांग लाभार्थ्यांना ह्यातीचे प्रमाणपत्र काढण्याचे आवाहन
अमरावती, दि. 22 (जिमाका) : दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. हे वाढीव अनुदान प्राप्त झाले नसल्यास ह्यातीचे प्रमाणपत्र काढून पोर्टलवर अपडेट करावे लागणार आहे. त्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी ह्यातीचे प्रमाणपत्र काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात 1 हजार रूपयांची वाढ करून 2 हजार 500 रूपये इतके अनुदान डीबीटीद्वारे देण्यात येत आहे. यासाठी लाभार्थ्यांचे ऑनलाईन यूडीआयडी कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना अद्यापही वाढीव अनुदान प्राप्त झाले नाही, त्यांनी आपले यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड आणि आधार लिंक असलेल्या बॅंक पासबुकची प्रत तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेत सादर करावी.
शासनाकडून केंद्र, पुरस्कृत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ, वीर पत्नी व दिव्यांग योजनांच्या लाभार्थ्यांना दरवर्षी ह्यातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. योजनेतील लाभार्थ्यांना ह्यातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाकडून आधार आधारीत जीवन प्रमाणपत्र प्रणाली विकसित केली आहे. ह्यातीच्या प्रमाणपत्राअभावी शासनाकडून लाभार्थ्यांचा लाभ मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना ॲपद्वारे डिजीटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच ऑनलाईन ह्यातीचे प्रमाणपत्र जनरेट करावयाचे आहे. सदर प्रमाणपत्र एनएसएपी पोर्टलवर अपडेट होणार आहे.
तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात येथे ऑनलाईन ह्यातीचे प्रमाणपत्र जनरेट करण्यात येत आहे. याशिवाय ॲडरॉईड मोबाईमध्ये ॲपद्वारे नि:शुल्क डीएलसी जनरेट करू शकता येणार आहे. त्यामुळे केंद्र पुरस्कृत योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन ह्यातीचे प्रमाणपत्र काढावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.
0000000
ग्रंथभेट योजनेसाठी प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 22 (जिमाका): राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत 52 व्या ग्रंथभेट योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी सन - 2025 या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या वतीने समान निधी 'ग्रंथभेट' योजनेंतर्गत सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करुन राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येतात.
या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रंथांची निवड करणे, तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरुन प्रसिद्ध होणाऱ्या 'शासनमान्य ग्रंथ निवडयादी' मध्ये समावेश होण्यासाठी सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामुल्य प्रत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे दि. 28 फेब्रुवारी, 2026 पर्यंत सादर करावी लागणार आहे. या योजनेसाठी सन 2025 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.
मुद्रण व नोंदणी अधिनियम, 1867 नुसार मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम, 1954 अन्वये प्रकाशकाने सदर ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे व शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. सदर ग्रंथ पोहोचल्याची पोच पावती संबंधीत ग्रंथालयांकडून घ्यावी. ग्रंथालय संचालनालयास संबंधित ग्रंथ पाठविताना वरीलप्रमाणे ग्रंथ पाठविल्याची पोच पावती ग्रंथांसोबत टपालामार्फत किंवा समक्ष पाठविण्यात यावी. तसेच सर्व लेखक, प्रकाशक यांनी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक यांनी केले आहे.
00000
जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन उत्साहात
अमरावती, दि. 22 (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी प्रकल्पांतर्गत मेळघाट हाट येथे जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन यशस्वीरीत्या पार पडले. स्वयंसहाय्य महिला बचतगटांच्या उत्पादीत उत्पादनांना बाजारपेठ व योग्य दर मिळावा, तसेच विक्रीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी संमेलन घेण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, विभागीय सल्लागार केशव पवार, युनिवर्स एक्स्पोर्ट दुबईचे संचालक प्रवीण वानखडे, स्मार्टचे नोडल अधिकारी विवेक टेकाडे, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार पवन देशमुख, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखेडे, जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, वर्षा खोब्रागडे, बाळासाहेब झिंझाडे, सहा जिल्हा समन्वय अधिकारी रामगोपाल साहू आदी उपस्थित होते.
डॉ. रंजन वानखेडे यानी मेळघाटमधील कॉफी, मध, खवा, कुटकी व इतर स्थानिक उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळावी. त्यांची विक्री वाढावी, हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. मध्यस्थी टाळून थेट विक्रीला प्राधान्य देणे खरेदीदार-विक्रेत्यांमध्ये थेट संवाद व दीर्घकालीन व्यावसायिक व्यवहार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी सर्व खरेदीदारांनी मेळघाटमधील महिला बचतगटांची उत्पादने पाहून थेट करार करावेत, असे आवाहन केले.
वर्षा खोब्रागडे यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश घ्यार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी परिवर्तन व एकता लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचारी, मेळघाट हाट येथील कर्मचारी, माविम जिल्हा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. या संमेलनात नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, हिंगोली, बुलढाणा, वाशीम आदी जिल्ह्यातील खरेदीदार आणि विक्रेते सहभागी झाले.
00000
योजनांच्या लाभार्थ्यांनी आधार लिंक करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 22 (जिमाका) : शासनातर्फे विविध लाभाच्या योजना राबविण्यात येते. यासाठी आधार लिंक आणि सिडींग करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकास्तरावर प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे. योजनांच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी आधार लिंक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वीर पत्नी व इंदिरा गांधी राष्ट्रीय वीर पत्नी योजना लाभार्थ्यांनी योजनेतील लाभ सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आधार कार्ड, बॅंक पासबुकची झेरॉक्स प्रत आणि संपर्क क्रमांक सादर करावे लागणार आहे. तसेच आधार लिंकिंग आणि सिंडींग करणे आवश्यक आहे.
कागदपत्रे सादर करण्यासाठी लाभार्थ्यांनी वेळापत्रकानुसार संबंधित महानगर पालिका झोन कार्यालयात संगणक चालक अमोल कडुकार, संपर्क क्रमांक 8806326701 यांच्याशी संपर्क साधावा. महानगर पालिका प्रभागानुसार सकाळी 11 ते 5 या वेळात रामपुरी कॅम्प प्रभाग 1 येथे दि. 27 व 28 जानेवारी, राजापेठ प्रभाग 2 येथे दि. 29 व 30 जानेवारी, दस्तुरनगर प्रभाग 3 येथे दि. 2 व 3 फेब्रुवारी, बडनेरा प्रभाग 4 येथे दि. 4 व 5 फेब्रुवारी, भाजी बाजार प्रभाग 5 येथे दि. 6 व 9 फेब्रुवारी 2026 राहील.
कागदपत्रे व आधार लिंकिंग, सिंडींग प्रक्रिया वेळेत पुर्ण झाली नसल्यास लाभ मिळण्यास अडचण झाल्यास तयाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यावर राहणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन संगायो अमरावती शहरच्या तहसिलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी केले आहे.
0000000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment