Monday, January 5, 2026

DIO NEWS 05-01-2026



 हिवारा शाखा कार्यालयात डाक चौपाल कार्यक्रम संपन्न

अमरावती, दि. 05 (जिमाका): अमरावती विभागातील हिवारा शाखा कार्यालयात डाक चौपाल कार्यक्रम एसएसपीओ पांडुरंग गेडाम यांच्या  मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रॅली काढण्यात आली. गावकऱ्यांनी रॅलीचे उत्साहात स्वागत केले. हिवाराच्या सरपंच मीनाताई सोळंके उपस्थित होत्या. आरपीएलआय आणि विविध डाक योजनांवरील माहितीपूर्ण सत्रांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. त्यानंतर खेळ आणि परस्परसंवादामध्ये समुदायाची सक्रिय सहभागिता दिसून आली. या कार्यक्रमामुळे सार्वजनिक जाणीव, विश्वास आणि डाक सेवांसह सहभाग वाढविण्यास मदत झाली, ज्यामुळे समुदाय विकासासाठी डाक विभागाचे समर्पण दिसून आले.

डाक चौपाल कार्यक्रमाचे महत्त्व

डाक चौपाल कार्यक्रम हे डाक विभागाच्या विविध योजना आणि सेवांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांशी जोडण्यासाठी निर्माण केलेले आहे. या कार्यक्रमामधून, डाक विभाग लोकांना त्यांच्या जीवनातील आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्य याबाबत शिक्षित करण्याचा प्रयत्न करतो. डाक चौपाल कार्यक्रमात सहभागी होऊन, लोक विविध डाक योजनांचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांच्या समस्या सोडवू शकतात.

डाक चौपाल कार्यक्रमाचे लाभ

डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळते, आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्य याबाबत शिक्षण मिळते. लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यात मदत मिळते शिवाय समुदायातील सहभाग आणि परस्परसंवाद वाढतो.

00000

जिल्हास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेला 8 जानेवारीपासून सुरवात

            अमरावती, दि. 05 (जिमाका): जिल्हास्तरीय विद्यार्थी स्पर्धा 2025-26 चे आयोजन दि. 8 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. या क्रीडा महोत्सवात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे जवळपास 2 हजार 500 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित राहणार आहे. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दि. 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

00000

 राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ

            अमरावती, दि. 05 (जिमाका): देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2025-26 साठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. तथापि शैक्षणिक संस्थामधील सन 2025-26 मधील प्रवेश प्रक्रीया अद्याप पूर्ण झालेली नाही. यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रासह दि. 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in ताज्या घडामोडी या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज विहित नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण आणि विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी कळविले आहे.

00000

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे

उद्घाटन संपन्न

अमरावती, दि. 05 (जिमाका): आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा सन 2025-26 चा उद्‌घाटन सोहळा आज संपन्न झाला. या स्पर्धेचे उद्‌घाटन राज्य माहिती आयोग आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडाध्वजाचे ध्वजारोहण करुन क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली.

आदिवासी विकास अपर आयुक्त आयुषी सिंह, नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन, झेनिच चंद्र दोनथुला, सिद्धार्थ शुकना तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आदिवासी कला व संस्कृतीचे दर्शन घडविणारी भव्य हस्तकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या दालनांमध्ये अमरावती विभागातील धारणी, अकोला, पुसद, कळमनुरी, किनवट तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, धारणी यांनी सहभाग नोंदविला. याशिवाय नागपूर विभागातील देवरी प्रकल्पातील चिमुकल्यांनी तयार केलेल्या विविध कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले. या हस्तकला दालनांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

उद्‌घाटन समारोपाच्या कार्यक्रमात अमरावती विभाग विरुद्ध नाशिक विभाग यांच्यातील हॉलीबॉल सामना अत्यंत चुरशीचा झाला. पहिल्या सेटमध्ये अमरावती संघाने 25 गुण, तर प्रतिस्पर्धी संघाने 20 गुण मिळविले. दुसऱ्या सेटमध्ये अमरावती संघाने 25 गुण, तर प्रतिस्पर्धी संघाने 18 गुण प्राप्त केले. उत्कृष्ट सांघिक खेळ व दमदार कामगिरीच्या जोरावर अमरावती विभागाचा संघ विजयी ठरला.

संपूर्ण कार्यक्रमातून आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्य, सांघिक भावना, शिस्त तसेच आदिवासी हस्तकलेचा समृद्ध वारसा अधोरेखित झाला.

0000000

जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

समृद्धी शेत पांदन रस्ते व जल पुनर्भरण योजनेची अंमलबजावणी सुरू

अमरावती, दि. 5 ( जिमाका): जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या दळणवळणाची समस्या सोडविण्यासाठी आणि पाणी साठा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्ह्यात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समृद्धी शेत पांदन रस्ते व जल पुनर्भरण योजना' राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये बारामाही शेत रस्ते तयार करण्यात येणार असून, यासाठी स्थानिक नदी व नाल्यांमधील गाळ व साहित्याचा वापर केला जाणार आहे, यामुळे जलस्त्रोतांचे खोलीकरण होऊन पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

योजना लोकसहभाग आणि शासकीय निधीच्या संयुक्त विद्यमाने राबविली जाणार आहे. योजनेसाठी प्रति किलोमीटर 9 लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला असून, त्यापैकी 7.5 लाख रुपये शासन देणार आहे, तर उर्वरित 1.5 लाख रुपये संबंधित अशासकीय संस्थेला लोकसहभागातून उभे करावे लागणार आहेत. या कामासाठी रस्ते बांधणीचा अनुभव असलेल्या सेवाभावी संस्थांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड झालेल्या संस्थांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय सामंजस्य करार करणार आहे. या योजनेमुळे शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर होऊन शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत नेणे अधिक सुलभ होईल, असे उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी कळविले आहे.

000000


 

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...