जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 8 (जिमाका): जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. लोकसहभागातून हे रस्ते होणार असून याकामासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे. यासाठी लोकसहभागातून पांदण रस्ते बांधण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून 5 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. ही योजना लोकसहभाग आणि शासकीय निधीच्या संयुक्त विद्यमाने राबविली जाणार आहे. योजनेसाठी प्रति किलोमीटर 9 लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. यातील 7.5 लाख रुपयांचा निधी शासन देणार असून उर्वरित 1.5 लाख रुपये लोकसहभागातून द्यावे लागणार आहेत.
या योजनेचा पथदर्शी प्रकल्प अंजनगाव सुजी तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या तालुक्यात 20 किलोमीटर, तर इतर सहा तालुक्यात प्रत्येकी पाच किलोमीटरप्रमाणे 30 किलोमीटरचे पांदण रस्ते बांधण्यात येणार आहे. या कामासाठी लोकजागर या संस्थेची निवड करण्यात आली आहे. योजनेमुळे शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर होऊन शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत नेणे अधिक सुलभ होणार आहे.
शेतरस्ते मोकळे करणे आणि जल पुनर्भरणासाठी हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात बारामाही शेत रस्ते तयार करण्यात येणार आहे. पाणंद रस्त्यांसाठी पाच किलोमीटरच्या आतील नदी व नाल्यांमधील गाळ व साहित्याचा वापर केला जाणार आहे. हे साहित्य स्वयंसेवी संस्थांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे जलस्त्रोतांचे खोलीकरण होऊन पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
000000
राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहानिमित्त 12 ते 19 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम
अमरावती, दि. 8 (जिमाका): स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात दि. 12 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत 'राष्ट्रीय युवा दिन' व 'युवा सप्ताहाचे' आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि स्थानिक विविध शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
युवकांचा सर्वांगीण विकास करणे आणि त्यांना राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी उद्युक्त करणे, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी सांगितले.
युवा सप्ताहाची सुरुवात 12 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे उद्घाटन होईल. त्यानंतर सलग सात दिवस विविध स्पर्धा व उपक्रम राबविले जातील. शिवाजी हायस्कूल येथे 13 जानेवारी रोजी निबंध व चित्रकला स्पर्धा, 14 जानेवारी रोजी प्रेमकिशोर सिकची विद्यालयात पर्यावरण मार्गदर्शन, तर 15 जानेवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबविले जाईल.
मणिबाई गुजराती हायस्कूल येथे 16 जानेवारी रोजी तज्ज्ञ व्यक्तींचे अनुभव कथन, 17 जानेवारी रोजी श्री गणेशदास राठी महाविद्यालयात वकृत्व स्पर्धा आणि 18 जानेवारी रोजी आजनिय व विनर ॲकेडमीमध्ये पर्यावरण विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. या महोत्सवाचा समारोप 19 जानेवारी रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे. या सर्व उपक्रमांत जिल्ह्यातील युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी श्रीमती त्रिवेणी बांते (क्रीडा अधिकारी) यांच्याशी संपर्क साधवा.
00000
खेलो इंडिया ट्रायबल गेम्स: 13 जानेवारीला अमरावतीत निवड चाचणी
अमरावती, दि. 8 (जिमाका): केंद्र शासनाच्या निर्देशानुसार छत्तीसगड राज्यामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या 'पहिली खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2025-26' साठी महाराष्ट्र राज्यस्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेअंतर्गत फुटबॉल, हॉकी, आर्चरी, ॲथलेटिक्स, जलतरण, वेटलिफ्टिंग व कुस्ती या खेळांचा समावेश असून ही स्पर्धा खुल्या वयोगटात पार पडणार आहे. अमरावती येथील जिल्हा क्रीडा संकुल, तपोवन गेट येथे दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी आर्चरी, कुस्ती व वेटलिफ्टिंग या तीन खेळांच्या निवड चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
या राज्यस्तरीय निवड चाचणीमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी 12 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे उपस्थित राहून आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. सहभागी होणाऱ्या खेळाडूंना अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) आणि मूळ आधार कार्ड ही कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. या निवड चाचणीतून पात्र ठरणारे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणीसाठी पात्र ठरतील, ज्यातून अंतिम भारतीय ट्रायबल गेम्ससाठी संघाची निवड केली जाईल.
वैयक्तिक खेळ प्रकारात आर्चरीसाठी प्रथम 3, तर कुस्ती व वेटलिफ्टिंगसाठी प्रथम 2 खेळाडूंची निवड राष्ट्रीय चाचणीसाठी केली जाणार आहे. खेळाडूंनी स्वतःच्या खर्चाने व जोखमीवर या चाचणीत सहभागी व्हायचे असून, प्रशासनामार्फत केवळ निवास व भोजनाची व्यवस्था केली जाईल. तरी अमरावती विभागासह राज्यातील जास्तीत-जास्त अनुसूचित जमातीच्या खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी स्वप्नील चांदेकर (९४०४३७९६७७), श्रीमती त्रिवेणी चौधरी (९९७५५९०२३२) किंवा शेख सलीम (९६५७२७७४५७) यांच्याशी संपर्क साधावा.
00000
अमरावती महानगरपालिका, अमरावती
जनसंपर्क विभाग
प्रसिद्धीपत्रक
अमरावती, दि. 08 (जिमाका): अमरावती महानगरपालिका निवडणूक 2025-26 : झोन क्र.1 ते 7 येथे ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रियेला सुरुवात; मा.मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. भरत एन. बस्तेवाड, मा.निवडणूक निरीक्षक अनिल खंडागळे यांची पाहणी
अमरावती प्रतिनिधी,
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने झोन क्र.1 ते 7 येथे स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षामध्ये आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ई.व्ही.एम.) मधील बॅलेट युनिट (BU) व कंट्रोल युनिट (CU) यांची सिलींग प्रक्रिया अधिकृतरित्या सुरु करण्यात आली.
सदर सिलींग प्रक्रिया ही भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यंत काटेकोरपणे राबविण्यात आली. ई.व्ही.एम. यंत्रांची सुरक्षितता, गोपनीयता तसेच निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अबाधित राहावा, या दृष्टीने सर्व नियम व प्रक्रिया पाळण्यात आल्या.
या महत्वपूर्ण प्रसंगी मा. डॉ. भरत एन. बस्तेवाड (भा.प्र.से.), आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), नागपूर तथा मुख्य निवडणूक निरीक्षक व मा.अनिल खंडागळे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक यांनी सुरक्षा कक्षास भेट देऊन प्रत्यक्ष सिलींग प्रक्रियेची पाहणी केली. त्यांनी ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियमानुसार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया कोणत्याही त्रुटीशिवाय पार पाडण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी संबंधित झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, कर्मचारी वर्ग, सुरक्षा यंत्रणा तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. सुरक्षा कक्षामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, 24 तास पोलीस बंदोबस्त व प्रवेश-नियंत्रण व्यवस्था ठेवण्यात आली असून ई.व्ही.एम. यंत्रांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे.
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक ही मुक्त, निष्पक्ष व शांततेच्या वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासनामार्फत सर्व स्तरांवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आले.
000000

No comments:
Post a Comment