Friday, January 9, 2026

DIO NEWS 09-01-2026

 राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात

15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

            अमरावती, दि. 9 (जिमाका) : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दि. 15 जानेवारी 2026  रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे.

            अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे.

                महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये अमरावतीसह बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याणडोंबिवली, भिवंडीनिजामपूर, मीराभाईंदर, वसई विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगलीमिरजकुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेडवाघाळा, परभणी, जालना, लातूर,  अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.

            मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

000000

 

खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1

सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा

अमरावती, दि. 09 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगारविषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधांसाठी  www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक व आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारे) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5 (1) व कलम 5 (2) अन्वये त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.

           डिसेंबर-2025 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यामातून लॉगिन करून ऑनलाईन सादर करावयाची आहे. ऑनलाईन ई-आर-1 सादर करतांना काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा. ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत जानेवारी-2026 आहे. ई-आर-1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या आस्थापनांवर विहित नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000


जिल्ह्यातील 80 शाळांमध्ये राबविणार 'शाळा सुरक्षा कार्यक्रम';

300 आपदा मित्र व सखी देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

अमरावती, दि. 9 ( जिमाका): जिल्ह्यातील नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा धोका लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रशिक्षित करण्यात आलेले 300 आपदा मित्र आणि आपदा सखी आता जिल्ह्यातील पूरप्रवण व धोकादायक भागातील 80 शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे थेट प्रशिक्षण देणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्यासाठी 300 आपदा मित्र व सखींची निवड करून त्यांना 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षित स्वयंसेवकांना शाळा सुरक्षा कार्यक्रम प्रभावीपणे राबविता यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच एक दिवसीय उजळणी प्रशिक्षणही देण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पूर, भूकंप, आग आणि वीज पडणे यांसारख्या संकटांच्या वेळी 'काय करावे आणि काय करू नये' याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रथमोपचार, शोध व बचाव साहित्याची ओळख, जखमींना उचलण्याच्या विविध पद्धती आणि आपत्ती काळातील शासनाची भूमिका या विषयावर प्रात्यक्षिकांसह जनजागृती केली जाणार आहे.

            जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. मान्सून कालावधीत आणि इतर आपत्तींमध्ये हे आपदा मित्र प्रशासनाला मोलाची मदत करत आहेत. या शालेय प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातही या स्वयंसेवकांची ओळख निर्माण होणार असून, आपत्तीच्या वेळी होणारी जीवितहानी टाळण्यासाठी मोठे मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि जिल्हा शोध व बचाव पथक उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे, कोणतेही मानधन न घेता हे आपदा मित्र समुदाय समन्वयक म्हणून सामाजिक बांधिलकीतून कार्य करत आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी दिली आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...