जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितरित्या योगदान द्यावे
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 6 (जिमाका): जिल्ह्यातील समस्या जाणून त्यावर विविध विभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्हा वॉर रूमच्या माध्यमातून प्राधान्याचे क्षेत्र निवडून त्यात विकास घडवून आणल्या जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन आणि इतर क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितरित्या योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जिल्हा वॉर रूमची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली. बैठकीत चिखलदरा पसिरातील पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला. वनविभागातर्फे करण्यात आलेल्या विविध कामांमुळे पर्यटक आकर्षित होण्यास मदत झाली आहे. ॲडव्हेंचर पार्कमुळे पर्यटकांना साहसी खेळांची सुविधा निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास करताना चिखलदरा केंद्रबिंदू ठेवण्यात यावा. यासाठी प्रत्येक विभागाने कार्य करावे. चिखलदराच्या विकासासाठी आयसीआयसीआय फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यांनी या क्षेत्रात कोणती कामे करावीत, याचा आराखडा तयार करावा. पर्यटन विभागातर्फे ‘आई’ योजना राबविण्यात येत आहे. याचा लाभ चिखलदरा परिसरात देण्यात यावा.
गाविलगड किल्ल्याचा परिसर पुरातत्व विभागाकडे आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांसाठी रस्ते आणि दिशादर्शक फलक लावण्याचे काम पुरातत्व विभागाने करावे. आमझरी गाव मधाचे गाव म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यासोबतच गावातील युवकांना मधपालनाचे प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची मदत घ्यावी. गावाचे मध संकल्पना ठेऊन सुशोभिकरण करण्यात यावे. पर्यटकांसाठी होम स्टेसाठी एकत्रितरित्या राहण्याची सोय केल्यास त्याचा लाभ होणार आहे. मेळघाटातील 22 गावांतील विजेच्या प्रश्नासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. सुरवातीला बफरमधील 15 गावांवर लक्ष केंद्रीत करावे.
पीएम मित्रा पार्कमध्ये वीज केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी. उद्योग भवनातील जागा आयटी पार्कलाच देण्यात यावी. सिट्रस इस्टेटचा आढावा घेण्यात यावा. याठिकाणी टिश्यू कल्चरची सुविधा दिल्यास शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. बाजार समितीमध्ये कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा. तसेच पोलिसांची मदत घेऊन इतवारा येथील उड्डाणपुलाचे काम करण्यात यावे. रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापिठाने जमिन संपादन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
000000
शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचतगटांना संधी;
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आर्थिक सहाय्यासाठी आवाहन
अमरावती, दि. 6 जानेवारी ( जिमाका ): नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-2 अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील कृषी व्यवसायांना मोठी चालना मिळणार आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात जिल्ह्यातील 454 गावांची निवड करण्यात आली असून, विविध मूल्यसाखळी आधारित उपक्रम आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी शासनाकडून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना हवामान अनुकूल शेतीसाठी सक्षम करणे आणि शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे हा आहे.
प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला स्वयंसहाय्यता गट, प्रभाग संघ आणि ग्रामसभांना विविध उपक्रमांसाठी 60 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. विशेषतः शेतीकामात भासणारी मजूरांची टंचाई लक्षात घेता, महिला बचत गटांमार्फत 'गावस्तरीय कृषी अवजारे बँक' स्थापन करण्यासाठी 24 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान उपलब्ध आहे. तसेच, गोदाम उभारणी, शीतगृह, प्रक्रिया युनिट्स (दाल मिल, तेल गाळप, फळ प्रक्रिया इ.) आणि निंबोळी अर्क युनिट यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी प्रकल्प खर्चाच्या 60 टक्क्यांपर्यंत, म्हणजेच कमाल 60 लाख रुपयांपर्यंत बँक एंडेड अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे किमान 250 सभासद असणे आणि त्यांची वार्षिक उलाढाल प्रकल्प रकमेच्या 5 टक्क्यांपर्यंत असणे अनिवार्य आहे. तसेच, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांसाठी बँकेचे कर्ज मंजूर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. इच्छुक संस्थांनी प्रकल्पाच्या अधिकृत डीबीटी पोर्टलवर (https://dbt-ndksp.mahapocra.
0000000
प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी कृषी पुरस्कारांसाठी
31 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 6 (जिमाका): कृषी विभागामार्फत जिल्ह्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या संस्था, शेतकरी यांच्याकडून सन 2025 साठी विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी कृषी पुरस्कराचे प्रस्ताव दि. 31 जानेवारी 2026 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात सादर करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार (पुरस्कार स्वरूप : 3 लाख रूपये रोख व स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार), वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, कृषीभूषण सेंद्रीय पुरस्कार ( 2 लाख रूपये रोख व स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार), वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार ( 1 लाख 20 हजार रूपये रोख व स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार), उद्यान पंडीत पुरस्कार ( 1 लाख रुपये रोख व स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार,), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (सर्वसाधारण व आदिवासी गट) ( 44 हजार रूपये रोख व स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार), युवा शेतकरी पुरस्कार (वयोमर्यादा कमाल 40 वर्षे) (रूपये 1 लाख 20 हजार रूपये रोख व स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार )असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कृषी क्षेत्रात शेती, फळबाग, कृषी संलग्न क्षेत्रात व प्रसारमाध्यमे संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्था पुरस्कारासाठी पात्र असतील. शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावावर शेती असावी व शेती हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय असावा. कृषी क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणारा व अधिक नफा मिळविणारा असावा. कृषि पदवी, पदविका, पदव्युत्तर शिक्षण असल्यास प्राधान्य राहील. प्रस्ताव सादरकर्ता हा शासकीय, निमशासकीय किंवा सेवानिवृत्त अधिकारी नसावा. कृषी भूषण सेंद्रीयसाठी सेंद्रीय मालाचे पीजीएस प्रामणीकरण केलेले असावे. जिल्हा पोलीस अधिक्षक यांचा सन 2025 चा चारित्र्य पडताळणीचा दाखला असावा. प्रस्तावासोबत अद्यावत 7/12, 8अ सादर करणे आवश्यक आहे. दि. 28 जुलै 2025 च्या मार्गदर्शक सूचना नुसार विहीत प्रपत्रात आवश्यक त्या पुराव्यासह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या वेबसाईटवर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. प्रस्ताव तीन प्रतीत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. प्रस्ताव सादरकर्ता अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000
जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा
अमरावती, दि. 6 (जिमाका) : पत्रकार दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार ‘दर्पणकार’आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. त्यामुळे 6 जानेवारी हा दिवस ‘पत्रकार दिन’ किंवा ‘दर्पण दिन’ म्हणून साजरा केला जातो.
यावेळी माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, वरिष्ठ लिपीक मनोज थोरात, योगेश गावंडे, लिपीक कोमल भगत सहायक छायाचित्रकार सागर राणे, वाहन चालक स्वप्नील महल्ले, संदेश वाहक राजश्री चौरपगार, प्रतिक वानखडे आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment