आमझरी येथे 'मधाचे गाव' योजनेअंतर्गत
आदिवासी महिलांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण
अमरावती, दि. 21 (जिमाका): महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या 'मधाचे गाव' योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आमझरी येथील स्थानिक आदिवासी महिलांना सातेरी मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
साधनसंपत्ती आणि मुबलक फुलोरा असलेल्या या भागात मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे रक्षण करणे, मध व त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांची विक्री व्यवस्था करणे आणि मधुपर्यटनाच्या माध्यमातून गावाला स्वयंपूर्ण बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या 10 गावांमध्ये आमझरीचा समावेश असून,सध्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
सद्यस्थितीत गावातील 21 महिलांना प्रशिक्षण दिले जात असून, भविष्यात गावातील प्रत्येक घरातील किमान एका सदस्याला प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये मधमाशांच्या जाती, निसर्गातील आग्या मधमाशांच्या वसाहतींपासून शास्त्रोक्त पद्धतीने मध संकलन, मध उद्योगातील उप-उत्पादने आणि मधुमक्षिका पालनाचे तांत्रिक ज्ञान दिले जात आहे. यासोबतच गावात प्रशिक्षणासह मधपेट्यांचे वाटप, मधुबनाची स्थापना, सामुहिक सुविधा केंद्र आणि माहिती दालनाची निर्मिती करण्यात येत आहे, ज्यामुळे हे गाव मध उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी दिली आहे.
00000
कृत्रिम वाळूच्या निर्मितीसाठी परवाना प्रक्रिया;
संस्था, व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 21 (जिमाका): नैसर्गिक वाळूला एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) पर्याय म्हणून कृत्रिम वाळू धोरणाच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत असलेले मंजूर खाणपट्टाधारक, तात्पुरता परवानाधारक व कोणत्याही प्रकाराचा खाणपट्टा नसलेले, परंतु एम-सॅण्ड युनिट स्थापन करून कृत्रिम वाळूची निर्मिती करू इच्छित व्यक्ती, संस्था यांनी कागदपंत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
या अर्जासोबत गट नंबर, नकाशा, सातबारा उतारा, वैयक्तिक अर्ज, असल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, संस्थेचा अर्ज, असल्यास संस्थेबाबतची कागदपत्रे, अर्ज फी रक्कम 500 रूपये, तसेच एम-सॅण्ड युनिट ज्या ठिकाणी स्थापन करावयाचे आहे, त्या ठिकाणचे महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडील कॉन्सेंट टू एस्टॅब्लिश व कॉन्सेंट टू ऑपरेटबाबतचे प्रमाणपत्र, 100 टक्के एम-सॅण्ड युनिट उत्पादित करण्याबाबतचे 100 रूपयाच्या स्टॅम्पपेरवरील हमीपत्र, तसेच एम-सॅण्ड उत्पादित करण्यासाठी दगड कोणत्या खाणपट्टातून किंवा इतर स्त्रोतांतून आणण्यात येणार आहे, त्या खाणपट्टाच्या अथवा स्त्रोतांचा तपशील, एम-सॅण्ड युनिट बसविण्यात येणार आहे. अशा क्षेत्राबाबत संबंधित नियोजित प्राधिकरणाकडून त्याबाबतचा वापर अनुज्ञेय आहे किंवा कसे याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, आवश्यक त्याठिकाणी अकृषिक परवानगी आदेश, तसेच उद्योग आधार नोंदणी असणारे प्रमाणपत्र व व्यापारी परवाना घेणे बंधनकारक आहे. ज्या व्यक्ती, संस्था यांना हेतुपत्र देण्यात आले आहे. अशांना महसूल व वनविभाच्या निर्णयामधील औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, व्याज अनुदान, विद्युत शुल्कातून सूट व वीज दर अनुदान राहील. गुंतवणूक प्रोत्साहन अनुज्ञेय असेल. रॉयल्टी प्रतिब्रास 400 रूपये सवलत 200 रूपये प्रतिब्रास दराची तरतूद आहे.
शंभर टक्के एम-सॅण्ड कृत्रिम वाळू उत्पादित करून इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था यांनी, तसेच यापूर्वी संबंधित एम-सॅण्ड उत्पादन करणाऱ्या युनिटधारकाने महाखनिज या संगणक प्रणालीवर अर्ज केला असल्यास त्यांनी पुन्हा नव्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. याबाबत काही अडचणी अथवा शंका असलेस गौणखजिन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात
79 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड
अमरावती, दि. 21 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती कार्यालयाच्या आवारात 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या'चे (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्ह्यातील उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रोजगार मेळाव्यात एकूण 100 रिक्त पदांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन 274 उमेदवारांनी सहभाग नोंदवून त्यापैकी 249 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती दिल्या व मुलाखती दिलेल्या उमेदवारापैकी 79 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या मेळाव्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, अभिषेक ठाकरे उपस्थित होते. या मेळाव्यात नामांकित खासगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. यामध्ये जाधव गियर लि. चे विलास नाईक, प्लास्टी सर्ज प्रा. लि. चे संचालक श्री. डागा व श्रीमती पद्मिनी साहू, स्पंदन फायनान्सच्या केयुरी देशमुख, सनलाईट सोलरचे अक्षय वाळके, श्रीराम फायनान्सचे अजय बोंडे, विविक्सा प्रा. लि. चे उज्ज्वल बंग, रेडियंट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. श्रीमती अग्रवाल आणि सहयोग मल्टी बँकचे श्री. गुप्ता या उद्योजकांनी उपस्थित राहून निवड प्रक्रिया पार पाडली. तसेच त्यांनी उपस्थित उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन विविध पदांवर प्राथामिक निवड केली.
कार्यक्रमाचे संचालन आकाश येवले यांनी तर आभार कृपा अर्गुलेवर यांनी मानले.
000000
प्रजासक्ताकदिनी देशभक्तीपर गीतांवर आधारित सामुहिक कवायत
अमरावती, दि. 21 (जिमाका): प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2026 रोजी देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांचे सामुहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर एकुण चार शाळा एकत्रित कवायत परेड मैदान, अमरावती येथे होणार असून या कवायतीसाठी 1 हजार 500 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये प्रत्येक शाळेमधून व सामुहिकरित्या प्रत्येक तालुक्यातील तीन शाळा एकत्र येवून शाळेच्या मैदानावर देशभक्तीपर गीतांवर आधारित सामुहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यासाठी दीड महिन्यांपासून शाळास्तरावर कवायत सराव सुरु आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेकडून बिस्कीट, केळी आणि पाणी वाटप होणार आहे. याबाबत गट शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांना सुचित करण्यात आले असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.
0000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment