जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते’ योजनेच्या
निविदा प्रक्रियेला सुरवात
अमरावती, दि. 13 (जिमाका): ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची शेतात ये-जा करण्याची अडचण दूर करण्यासाठी आणि शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना'अमरावती जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारामाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज असून, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले.
या योजनेअंतर्गत गाव नकाशावरील अतिक्रमित झालेले शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करून त्या ठिकाणी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते तयार करण्यात येणार आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी इच्छुक कंत्राटदारांकडून दि. 14 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदा प्रक्रियेची जबाबदारी कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अमरावती यांच्या कार्यालयाकडे सोपवण्यात आली असून, प्राप्त झालेल्या निविदा 27 जानेवारी 2026 रोजी उघडण्यात येतील.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, कामाचा दर्जा राखण्यासाठी आणि वेळेत रस्ते पूर्ण करण्यासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय जिल्हास्तरावर मशिनरीचे (अर्थमुव्हर उत्खनन यंत्रसामुग्री) प्रति तास दर निश्चित केले जाणार आहेत. यामध्ये खोदकाम यंत्रे, माती-मुरुम वाहतूक आणि रोड रोलरचा समावेश असून, डिझेलसह दरांचे कंत्राटदार पॅनल तयार केले जाणार आहे. या प्रशिक्षण वर्गाला उपजिल्हाधिकारी (महसूल व रोहयो), कार्यकारी अभियंता (सा.बां. विभाग व जि.प.), उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
000000
चारा टंचाईवर मात करण्यासाठी मासोद येथे काटेविरहित 'कॅक्टस' लागवडीचा अभिनव उपक्रम
अमरावती, दि. 13 (जिमाका): जिल्ह्यातील ग्रामपंचायत मासोद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेमध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत काटेविरहित ‘कॅक्टस’ (निवडुंग) या चारा उपयोगी प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. पशुधनासाठी जाणवणारी चारा टंचाई दूर करणे आणि पडिक जमिनीचा सुयोग्य वापर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी निलेश ठोंबरे, पशुवैद्यकीय अधिकारी, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी भालचंद्र गावंडे, प्रवीण गुल्हाने व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कॅक्टस ही प्रजाती अत्यंत कमी पाण्यात, डोंगराळ भागात आणि निकृष्ट जमिनीत जिथे इतर फळझाडे येऊ शकत नाहीत, तिथेही जोमाने वाढते. तसेच ही लागवड भूजल पातळी वाढविण्यासही मदत करते. याप्रसंगी निलेश हेलोंडे पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महाराष्ट्रात उन्हाळ्यात जाणवणारी चारा टंचाई दूर करण्यासाठी काटेविरहित कॅक्टस ही एक क्रांतिकारी वनस्पती ठरू शकते. ही केवळ लागवड नसून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. ज्या जमिनीवर काहीही उगवत नाही, अशा पडीक जमिनीत कॅक्टस लावून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवता येतो. कॅक्टसमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने जनावरांची पाण्याची गरजही काही प्रमाणात भागते. या प्रजातीची लागवड प्रत्येक गावात करणे ही काळाची गरज असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल.
यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी कॅक्टसच्या चारा गुणधर्मांबाबत माहिती दिली. यामध्ये तंतूमय पदार्थ आणि पाण्याचे योग्य प्रमाण असल्याने जनावरांच्या आरोग्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते. चारा टंचाईच्या काळात हा एक स्वस्त आणि शाश्वत पर्याय आहे. विशेष म्हणजे, 3 किलो कॅक्टसपासून 3.38 स्क्वेअर फूट लेदर तयार होते, ज्याचा वापर जोडे, चप्पल आणि बॅग तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
000000
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ऐतिहासिक टप्पा; वर्षभरात 10 हजारांहून अधिक रक्त पिशव्यांचे संकलन
अमरावती, दि. 13 (जिमाका): रक्तकेंद्र व रक्त घटक विलगीकरण केंद्र, अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय विभागाने रुग्णसेवेमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सन 2025 या वर्षात शासकीय रक्तकेंद्र अमरावती यांनी 10 हजार 190 रक्त पिशव्यांचे संकलन केले असून, गेल्या चार वर्षात या रक्तकेंद्राने 40 हजारांहून अधिक रक्त पिशव्यांचे संकलन करून हजारो रुग्णांना जीवनदान दिले आहे. या वर्षात शासकीय रक्तकेंद्राने एकूण 227 रक्तदान शिबिरे यशस्वीपणे पार पाडली असून, यामुळे सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफेलिया तसेच जटिल शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी असल्यामुळे हे केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, क्षय रुग्णालय आणि अच्च्युत महाराज रुग्णालयासोबतच जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये व सहा रक्त साठवणूक केंद्रांना नियमित रक्तपुरवठा करीत असते. जिल्ह्यालगतच्या मेळघाट येथील आदिवासी बांधव, गर्भवती माता, लहान बालके तसेच चिखलदरा व धारणी येथील रुग्णांनाही येथून मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा केला जातो. विशेषतः सिकलसेल आणि ॲनिमियाग्रस्त रुग्णांना दर पंधरा दिवसांनी रक्ताची गरज भासते, त्यांच्यासाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत आहे.
खासदार 365 दिवस रक्तदान मोहिमेअंतर्गत राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आणि रक्त केंद्र प्रमुख डॉ. आशिष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य करण्यात आले असून अविरत सुरु आहे. जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे आणि समुपदेशक योगेश पानझाडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे व संपूर्ण अधिकारी-कर्मचारी चमूच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा करणे शक्य होत आहे. रक्ताची ही गरज निरंतर असल्याने जास्तीत जास्त सामाजिक संस्था, महाविद्यालये आणि तरुण मंडळांनी रक्तदान शिबिरांसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार व रक्त केंद्रप्रमुख डॉ. आशिष वाघमारे यांनी केले आहे.
000000
अमरावती जिल्हा प्रशासनाचा संकल्प : 'बालविवाह मुक्त भारत' अभियानांतर्गत ऑनलाइन शपथ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 13 ( जिमाका): बालविवाहासारखी सामाजिक कुप्रथा मुळापासून नष्ट करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने 'बालविवाह मुक्त भारत' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून अमरावती जिल्हा प्रशासनाने 'बालविवाह मुक्त अमरावती जिल्हा अभियान' हाती घेतले असून, याअंतर्गत प्रत्येक नागरिकाने ऑनलाइन शपथ घेऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केले आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणाऱ्या नागरिकांना केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र मिळणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून नागरिकांनी खालील पायऱ्यांचे अनुसरण करून आपले प्रमाणपत्र मिळवावे.
गुगलवर जाऊन stopchildmarriage.wcd.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा. 'Login' वर क्लिक करून 'Take Pledge' (टेक प्लेज) हा पर्याय निवडावा. आपली वैयक्तिक माहिती भरून सबमिट केल्यावर बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा पडद्यावर दिसेल. 'मी प्रतिज्ञा घेतली' या बटणावर क्लिक करताच आपले डिजिटल प्रमाणपत्र डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.
बालविवाहामुळे मुलींचे शिक्षण थांबते आणि त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. समाजातील प्रत्येक घटकाने या अनिष्ट प्रथेविरोधात एकत्र येणे गरजेचे आहे. ‘तुमची एक शपथ म्हणजे एका मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे,’ अशा शब्दांत प्रशासनाने या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने या मोहिमेचा प्रचार ग्रामीण भागापर्यंत केला जात असून, अमरावती जिल्ह्याला बालविवाह मुक्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या ऑनलाइन शपथ अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
0000000
--
परिवहनेत्तर ( दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन
वाहन मालिका सुरू करण्याबाबत आवाहन
अमरावती, दि. 13 (जिमाका): परिवहनेत्तर ( दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी सोमवार, दि. 19 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्प ब्रांच, ट्रेझरी ब्रांच कोड नं 003866 साठी देय असावा.
एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील, त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी दि. 19 जोनवारी 2026 रोजी 4 वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांकासाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशाच अर्जदारांनी दि. 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करून खिडकी क्रमांक -25 वर जमा करावे.
एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सीलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्टधारकांनी दि. 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकारपत्रासह हजर रहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल, त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
00000
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक मतमोजणी असल्यामुळे
15 व 16 जानेवारीला वाहतुकीमध्ये अंशत: बदल
अमरावती, दि. 13 (जिमाका): महानगरपालिका अमरावती सार्वत्रिक निवडणूक-2026 मतमोजणी दि. 16 जानेवारी 2026 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख, क्रीडा व वाणिज्य संकुल, महानगरपालिका, नवसारी, अमरावती येथे सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार आहे. तत्पुर्वी दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर मतदान केंद्रावरील इव्हीम मशीन, कंट्रोल युनीट, व्हीव्हीपॅट इत्यादी सामुग्री घेवून येणाऱ्या वाहनांची वर्दळ मतमोजणी केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात राहणार आहे. तसेच दि. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रियेसाठी सकाळी 8 वाजेपासून संबंधित अधिकारी, उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी महानगरपालिका क्रीडा संकुल, नवसारी, अमरावती परिसरात मतमोजणीसाठी दाखल होतील.
मतमोजणी प्रक्रीयेसाठी मोठ्या संख्येने येणार शासकीय व खाजगी नागरिक यांची व वाहनांची वर्दळ लक्षात घेता मतदान केंद्र परिसरात वाहतुक कोंडी, अपघात यासारखा प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. सर्व सामान्य नागरिकांचे जीवित रक्षण व कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरासमोरील मार्गावरील वाहतुक बंद करून इतर मार्गाने वळविण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी मुंबई पोलीस कायदा तसेच मोटर वाहन कायदा अन्वये हा आदेश जारी केला आहे.
प्रवेश बंदी मार्ग- कठोरा ते छत्रपती संभाजी राजे चौक राजपूत धाबा चौक पर्यंत. कालावधी- गुरूवार दि. 15 जानेवारी 2026 चे रात्री 10 वाजेपासून शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 चे संपूर्ण मतमोजणी प्रक्रीया संपेपर्यंत राहील. याला पर्यायी मार्ग- पंचवटीकडून नवसारीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी कठोरा नाका रंगोली लॉन-कठोरा जकात नाका या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
राजपूत धाबाकडून पंचवटीकडे येणाऱ्या सर्व वाहनांनी पर्यायी मार्ग-राजपूत धाबा-रिंगरोड-पोटेपाटील चौक-कठोरा नाका फक्त किंवा राजपूत धाबा-रिंगरोड-पोटे पाटील चौक- रहाटगाव टी पॉईटं या मार्गाचा अवलंब करावा.
अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतुकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.
00000



.jpeg)


No comments:
Post a Comment