जल जीवन मिशनअंतर्गत प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 





 

पाणी टंचाई व जल जीवन मिशन आढावा

टंचाई आराखडा 15कोटींचा

जल जीवन मिशनअंतर्गत प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

उदासीनता झटका; कुचराई खपवून घेणार नाही- पालकमंत्र्यांचा इशारा

 

अमरावती, दि. 15 : उन्हाळा लक्षात घेता जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई जाणवू नये याची पुरेपूर दक्षता घ्यावी व आराखड्यातील प्रस्तावित कामांना वेग द्यावा. जल जीवन मिशनमधील पाणीपुरवठा योजनांची कामे व प्रलंबित बाबी गतीने पूर्ण कराव्यात. कुठल्याही बाबतीत प्रशासकीय कुचराई खपवून घेणार नसल्याचा इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिला.

          संभाव्य पाणी टंचाई निवारण उपाययोजना व विविध जल योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, हरिभाऊ मोहोड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.

          टंचाई आराखड्यानुसार तालुकानिहाय आढावा, जलजीवन मिशन, 70 गावे पाणीपुरवठा, तिवसा नगर पाणीपुरवठा, 32 गावे पाणीपुरवठा, 105 गावे पाणीपुरवठा, शहानूर पाणीपुरवठा आदी विविध विषयांचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.

जिल्ह्यात गत मान्सूनमध्ये 96 टक्के पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे. मात्र, आवश्यक तिथे टंचाई निवारणासाठी 15 कोटी दोन लक्ष रुपये निधीचा आराखडा मंजूर करण्यात आला. त्यात आवश्यकता लक्षात घेऊन 922 पैकी 635 गावे समाविष्ट आहेत. उपविभागीय अधिका-यांकडून विहीर अधिग्रहण सुरू करण्यात येत आहे.

आराखड्यानुसार, 92 विंधनविहिरी, 221 नळ योजनांची विशेष दुरुस्ती, 56 तात्पुरती नळ योजना, 36 प्रगतीपथावरील योजना पूर्ण करणे, 43 टँकर पाणीपुरवठा व 474 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिली. आराखड्यातील प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण व्हावीत. या कामांचा वेळोवेळी आढावा घ्यावा. कुठेही टंचाई उद्भवता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

                             उदासीनता झटका

जल जीवन मिशनमध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत. प्राधिकरणाने कामाने वेग द्यावा. उदासीनता झटकावी. यावेळी यापूर्वीही आढावा घेतला आहे. मात्र, अद्यापही कामांना गती आल्याचे दिसत नाही. कामात कुचराई खपवून घेणार नाही, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

 

 

 ज्या गावांचा पाणीपुरवठा योजनेत समावेश आहे, तिथे चार- सहा दिवसांआड पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रकरणात स्वतंत्रपणे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा. आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करा, मात्र सर्व गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा होईल याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

गावपातळीवर पाणीपट्टी वसुलीची कामे नियमितपणे पूर्ण व्हावीत. अभियंत्यांच्या रिक्त पदांबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

जल जीवन मिशनमध्ये चांदूर बाजार तालुक्यातील 19 गावे, अचलपूरमधील 24 गावे, चांदुर बाजार-अमरावती-भातकुली-अचलपूर तालुक्यातील 105 गावे, अमरावतीत नांदगावपेठ व 33 गावे, अंजनगाव दर्यापूरमधील 144 योजनांची दुरुस्ती, चिखलदरा तालुक्यातील गौरखेडा व 35 गावे, शहापूर व तीन गावे व मोर्शीमधील 70 गावे योजनेचा समावेश आहे.

000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती