पंचायत समित्या बांधकाम व उपकामांसाठी जिल्ह्याला पावणेतीन कोटी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी शासन कटिबद्ध असल्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

पंचायत समित्या बांधकाम व उपकामांसाठी जिल्ह्याला पावणेतीन कोटी

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 4 : जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या बांधकाम, उपकामे व फर्निचरसाठी शासनाकडून सुमारे पावणेतीन कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्ह्यात रस्ते, इमारती आदी पायाभूत सुविधांची अनेक कामे सुरू असून, आणखीही आवश्यक कामे नव्याने हाती घेण्यात येतील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

शासनाकडून तिवसा पंचायत समितीच्या इमारतीसंबंधी आवश्यक उर्वरित कामांसाठी 14 लाख, मोर्शी पं. स. साठी 75.57 लाख, अंजनगाव सुर्जी पं. स. साठी 95 लाख, नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या उपकामांसाठी 20 लाख व फर्निचरसाठी 25 लाख, तसेच चांदूर बाजार पं. स.च्या उपकामांसाठी 45 लाख रूपये निधी वितरीत केला आहे. तसा शासन निर्णय ग्रामविकास विभागाकडून निर्गमित झाला आहे. पंचायत समित्यांसह इतरही विविध प्रशासकीय इमारतींच्या निर्मितीसाठी निधी मिळण्याबाबत पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी पाठपुरावा करून जिल्ह्याला निधी मिळवून दिला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, रस्ते, सार्वजनिक इमारती, पाणीपुरवठा व विविध पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यासाठी जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. जिल्ह्यातील अपूर्ण कामे पूर्णत्वास नेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा होत आहे. केवळ नागरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पंचायत समितीच्या इमारती व उपकामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. प्रशासनानेही प्रक्रियेला गती देत विहित मुदतीत कामे पूर्ण करावी. कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत. यानंतरही इतर आवश्यक कामांबाबत वेळोवेळी आढावा घेऊन वेळेत प्रस्ताव द्यावेत, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

            000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती