जिल्हाधिका-यांकडून ‘इर्विनची’ पाहणी

रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरवाव्या

-         जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Ø  जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

अमरावती, दि. 23 : जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना दर्जेदार सुविधा पुरविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात नेत्र प्रत्यारोपणासाठी स्थापित सुविधेचा गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

जिल्हाधिका-यांनी आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अतुल नरवणे, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, उपचारप्रणाली व यंत्रणा अद्ययावत करण्याबरोबरच रुग्णालयांत स्वच्छता व आवश्यक तिथे इमारतीची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात यावी. रुग्णालयांत दुर्धर आजारावर, तसेच अनेक महत्वाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडतात. याबाबत संबंधितांना माहिती दिली पाहिजे. यावेळी काही रुग्णांशी श्री. नवाल यांनी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.      

रुग्णालयातील स्वच्छतागृहे, सर्व वार्डातील दारे खिडक्यांची तातडीने दुरुस्ती करुन घ्यावी. स्वच्छ पेयजलासह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. 

                                      नेत्र तपासणी कक्षाला भेट

मरणोत्तर नेत्रदान प्रक्रियेतून प्रा्रप्त कॉर्निया संग्रहित करुन गरजू रुग्णांना तो प्रत्यारोपित करण्यासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज कक्षाची उभारणी जिल्हा रूग्णालयात करण्यात आली आहे. तेथील उपकरणांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

लवकरात लवकर शस्त्रक्रियेने उपचार सुरु करता यावे यासाठी परवाना मिळण्याबाबत पाठपुरावा करावा, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेबरोबरच इतर सर्व नेत्र शस्त्रक्रिया सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागात करण्यात येतात याबाबत सामान्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यात यावी असे निर्देश त्यांनी नेत्रविभागाच्या डॉ. सोनोने यांना दिले.

                                                   नुसते फलक नको, वेळोवेळी तपासणीही करा

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावाही जिल्हाधिका-यांनी बैठकीद्वारे घेतला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 75 शाळांमध्ये यलो लाईन कॅम्पेन राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शाळेच्या 100 मीटर परिसरात पिवळ्या रंगाचा पट्टा मारुन तंबाखू विक्री, खरेदी ,सेवन प्रतिबंधित क्षेत्र याबाबत विहित माध्यमाद्वारे अधोरेखित करावे. शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्याबाबत शिक्षण विभागास सूचित करण्यात यावे मात्र, या क्षेत्रात नुसते फलक लावून उपयोग होणार नाही. या प्रतिबंधित क्षेत्राची आणि शाळेच्या परिसराची संबंधितांनी वेळोवेळी पाहणीही करावी, असे निर्देश श्री. नवाल यांनी दिले.

कोराना योध्दांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना कालावधीमध्ये एचआयव्ही/एड्स क्षेत्रासह कोव्हिड-19 संदर्भात उत्कृष्ट आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनिल पिंजरकर, रक्तपेढी तज्ञ सचिन काकडे, औषधनिर्माता ब्रम्हानंद सावकर यांचा कोरोना योध्दा म्हणून स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षण विभाग ए. एन. रामटेके, डॉ. रामदास देवघरे, डॉ. मंगेश गुजर,  उध्दव जुकरे, पवन दारोकर, प्रकाश शेगोकार आदी उपस्थित होते. 

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती