Tuesday, March 16, 2021

 





संचारबंदीत आणखी शिथीलता

दुकानांची वेळ आता सकाळी 9 ते सायंकाळी 5

जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी

गुरूवारपासून होणार अंमलबजावणी

 

अमरावती, दि. 16  : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत आणखी काही शिथीलता आणून सर्व दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते 5 या वेळेत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा आदेश 18 मार्चला सकाळी 6 पासून अंमलात येईल. दरम्यान, आस्थापनांत काम करणा-या सर्वांनी कोविड-19 चाचणी करून तसे प्रमाणपत्र  पालिका किंवा पंचायतींकडे सादर न केल्यास दुकान सील करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 संचारबंदीत शिथीलता आणून दुकानांना परवानगी देणारा आदेश जिल्हाधिका-यांनी आज जारी केला. अमरावती महापालिकेचे क्षेत्र, तसेच जिल्ह्यातील इतर शहरी व ग्रामीण क्षेत्रात हा आदेश गुरुवारी सकाळी सहापासून लागू होईल. आरोग्य, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, बँका आदी अत्यावश्यक सेवा पूर्णपणे सुरू राहतील. इतर शासकीय कार्यालयात 25 टक्के किंवा किमान 25 व्यक्ती उपस्थित असाव्यात, असे आदेश आहेत.

सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझर आदी आवश्यक दक्षतेचे नियम दुकानदारांकडून पाळले जात नसतील, तर पाच दिवस दुकान सील व आठ हजार रूपये दंड ठोठावण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. त्यासाठी दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज वेळोवेळी तपासण्यात येणार आहे. सर्व आस्थापनाधारकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

                        लॉजिंग क्षमता वाढवली  

 लॉजिंग व्यावसायिकांना त्याच्या लॉजच्या क्षमतेच्या 33 टक्के मर्यादेत व्यवसाय चालवता येईल. मात्र, ग्राहकांना त्यांच्या कक्षात जेवणाची व्यवस्था करावी. खाद्यपदार्थ सीलबंद असावेत. नियमभंग केल्यास लॉजला पाच दिवस सील व 15 हजार रूपये दंड ठोठावण्यात येईल. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येईल.

उपाहारगृहांनाही 33 टक्क्यांची मुभा

सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स, खाद्यगृहे खानपानासाठी प्रत्यक्ष सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 6 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. उपाहारगृहे आणि खाद्यगृहांना त्यांच्या आसनक्षमतेच्या 33 टक्के मर्यादेत ग्राहक स्वीकारता येतील. उपाहारगृहे किंवा हॉटेलमध्ये लग्न किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या समारंभासाठी परवानगी नाही.

 

 

प्रमाणपत्र न दिल्यास ‘सील’ लावणार

 सर्व दुकानदार किंवा आस्थापनाधारकांनी   सर्व कर्मचा-यांचे कोविड-19 ची चाचणी करून प्रमाणपत्र महापालिका किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे द्यावे. हा चाचणी अहवाल दि. 15 जानेवारी ते 30 मार्चदरम्यानचा असावा. सदर प्रमाणपत्र आस्थापनेने स्थानिक स्वराज्य संस्थेला न दिल्यास ही आस्थापना किंवा दुकान सील करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आदेशात नमूद आहे.

   ‘नो मास्क- नो एन्ट्री’ पद्धत राबविणे दुकानांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसे फलकही प्रत्येक ठिकाणी लावण्याचे निर्देश आहेत. ग्राहकांनीही खरेदीसाठी घराजवळच्या दुकानांची निवड करून लांबचा प्रवास शक्यतो टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लग्नात वाजंत्रीला परवानगी

लग्नसमारंभासाठी आता 25 व्यक्तींना उपस्थित राहता येईल. त्याचप्रमाणे, वाजंत्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार बँड पथकांना फक्त विवाहस्थळीच वाद्य वाजविण्याची परवानगी आहे. मात्र, बँड पथक हे केवळ पाचजणांचे असावे व प्रत्येकाची चाचणी झालेली असणे बंधनकारक आहे.

वधू किंवा वर यांचे घर किंवा घराच्या परिसरात लग्नसमारंभ आयोजित करता येईल. तिथे सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर न झाल्यास आयोजकाला 20 हजार रूपये दंड ठोठावण्यात येईल. लग्नाच्या आयोजनाची परवानगी देण्यासाठी महापालिका क्षेत्रात पालिका आयुक्तांना, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिका-यांना व इतर ग्रामीण क्षेत्रात तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

वाहतुकीबाबतच्या तरतुदी कायम

मालवाहतूक व वाहतुकीला निर्बंध नाहीत. तथापि, चारचाकी गाडीत चालकाव्यतिरिक्त 3 प्रवासी, तर तीनचाकी गाडीत (ऑटोरिक्षा) चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, तर दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह 2 प्रवाश्यांना प्रवासाची परवानगी आहे.

ठोक भाजीमंडईत पहाटे 2 ते सकाळी 7 या कालावधीत व्यवहार होतील, मात्र, तिथे किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश असेल.  

                                                शाळा- महाविद्यालये बंदच

 महापालिका, तसेच इतर शहरी व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद राहतील. खासगी शिकवण्या, कोचिंग क्लासेसला सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत परवानगी आहे. मात्र, प्रत्येक बॅचमध्ये केवळ 7 विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या आसनात किमान सहा फुटांचे अंतर, तसेच दोन बॅचमध्ये एक तासांचे अंतर असणे गरजेचे आहे. दोन बॅचच्या मधल्या कालावधीत निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे.

 

                                                व्यायामशाळांना मुभा; थिएटरे बंद

सर्व चित्रपटगृहे व बहुविध चित्रपटगृहे, तरणतलाव, करमणूक उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षागृहे, सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, स्नेहसंमेलने बंद राहतील. व्यायामशाळा व योग प्रशिक्षण केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. अशा केंद्रांत एका बॅचमध्ये केवळ सात व्यक्ती, त्यांच्यात सहा फुटांचे अंतर, दोन बॅचमध्ये एक तासांचे अंतर व मधल्या वेळेत निर्जंतुकीकरण बंधनकारक आहे.

                                00000

  

 

 

बोर्डीनाला मध्यम प्रकल्पाच्या कामांना गती; धरणाचे काम अंतिम टप्प्यात

जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते घळभरणी शुभारंभ

वाहिन्यांसाठी निधी प्राप्त; जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

 

 अमरावती, दि. 16 : चांदूर बाजार तालुक्यातील बोर्डीनाला मध्यम प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व पर्यावरण मान्यता प्राप्त झाल्या असून, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. बोरगाव मोहणा गावालगत बांधकाम सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या घळभरणी कामाचा शुभारंभ जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते नुकताच झाला.

            बोरगाव मोहणा येथील सरपंच अमोल ठाकरे, उपसरपंच गौतम बोदुळे, सौरभ ठाकरे, कार्यकारी जलसंपदा अभियंता सु. गो. राठी, उपविभागीय अभियंता नि. शे. मावळे, उपविभागीय अभियंता प्रणिता गोतमारे, शाखा अभियंता मि. श्री. खंडारे, कंत्राटदार प्रतिनिधी राजेश सरकटे आदी यावेळी उपस्थित होते.

            प्रकल्पाची मंजूर सुधारित प्रशासकीय मान्यता 515 कोटी 96 लक्ष असून, प्रकल्पावर आतापर्यंत 333 कोटी 73 लक्ष खर्च झाला आहे. प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून, बंदनलिकेद्वारे 3 हजार 145 हेक्टर सिंचन कामाची निविदा निश्चितीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. धरणासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व पर्यावरण मान्यता प्राप्त झाली आहे. त्याशिवाय, वाहिन्यांच्या कामांसाठी 50 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धरणाची विविध कामे सुरळीत होणार आहेत. प्रकल्पाचे काम जून 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार कामांना तातडीने चालना देऊन विहित मुदतीत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे करावीत, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.

            यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी अधिकारी व नागरिकांशी चर्चा करून कामांतील अडचणी व आवश्यक बाबींची माहिती घेतली व प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. प्रकल्पासाठी विविध मान्यता व निधी प्राप्त झाल्यामुळे अनेक दिवसांपासून थांबलेल्या कामांना चालना मिळणार आहे.

                        000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...