कुटुंबातील ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 














पालकमंत्र्यांनीही घेतली कोरोना प्रतिबंधक लस

कुटुंबातील ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी तरूणांनी पुढाकार घ्यावा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 11 : कोरोना प्रतिबंधक लसीच्या रूपाने संरक्षणाचे कवच उपलब्ध झाले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईला यामुळे बळ मिळाले आहे. ही लस सर्वांपर्यंत पोहोचणार असून, सध्याच्या टप्प्यात ज्येष्ठांचे लसीकरण होत आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित असून, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. तरूणांनीही आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज जिल्हा रूग्णालयाच्या नर्सिंग स्कूलमधील लसीकरण केंद्रात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख,  काँग्रेसचे किशोर बोरकर, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, पालकमंत्र्यांचे ओएसडी प्रमोद कापडे यांच्यासह स्टाफमधील इतरांचेही लसीकरण झाले. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी यावेळी उपस्थित होते.  

पालकमंत्री ॲड. श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना प्रतिबंधासाठी लस आल्याने मोठी उपलब्धी झाली आहे. प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी चालू टप्प्यात ज्येष्ठांचे लसीकरण होत आहे. त्याचबरोबर, इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून 27 ठिकाणी विनामूल्य लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याशिवाय, खासगी रूग्णालयातही अडीचशे रूपये भरून लसीकरण करता येते.

ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. लसीमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊन संरक्षक कवच प्राप्त होते. त्यामुळे कुठलीही शंका न ठेवता सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. तरूणांनीही आपले मातापिता व कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

लसीकरणाच्या विस्तारासाठी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी. ग्रामीण भागात केंद्रे सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी ठेवावी, असे निर्देशही त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

 

लस उपलब्ध झाली असून, ती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. दरम्यान, साथीच्या नियंत्रणासाठी कोरोना प्रतिबंधक दक्षता त्रिसूत्रीचे पालन होणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर नियमित करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना प्रतिबंधक उपचार करणा-या खासगी रूग्णालयांना शासनाकडून उपचाराबाबत दर निश्चित करून दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. ही नफा कमावण्याची नव्हे, तर सेवेची वेळ आहे, याचे भान ठेवावे. नियमभंग करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

                        

लसीकरण केंद्रे

 

अमरावती शहरात इर्विनमधील परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र व ज्येष्ठ नागरिक वॉर्ड, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, बडनेरा येथील शहरी आरोग्य केंद्र, दस्तूरनगरचे मनपा क्लिनीक, मालटेकडीनजिक वसंत हॉल, दसरा मैदानावरील आयसोलेशन मनपा क्लिनीक, महेंद्र कॉलनीतील मनपा क्लिनीक, राजापेठेतील तखतमल होमिओपॅथी कॉलेज, डेंटल कॉलेज, नागपुरीगेटजवळील मनपा हिंदी मुलांची शाळा, भाजीबाजारातील मनपा शाळा येथे लसीकरण केंद्रे सुरू आहेत.

त्याचप्रमाणे, तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालय येथेही केंद्रे असून, प्राथमिक आरोग्य केंद्रावरही सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी दिली.

त्याव्यतिरिक्त, खासगी रूग्णालयातील लसीकरण केंद्रांसाठी सुजाण कॅन्सर हॉस्पिटल, हायटेक मल्टिस्पेशालिटी, मातृछाया हॉस्पिटल, संकल्प हॉस्पिटल, आरोग्यम इन्स्टिट्यूट, बेस्ट हॉस्पिटल, डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल या रुग्णालयांनाही परवानगी देण्यात आली आहे व तिथेही लस उपलब्ध आहे, असेही डॉ. निकम म्हणाले.

 

00000

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती