Sunday, March 14, 2021

 







 

कोविड योद्धा उषाताई पुंड यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

शासन करोना लढवय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. १४: कोरोनाविरुद्धच्या लढाईत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोठे आहे. आपल्या प्राणांची बाजी लावून गत एक वर्षांपासून लढवय्या वृत्तीने सेविका कार्यरत आहेत. याच लढाईत शहीद झालेल्या उषाताई पुंड यांचे देशासाठी व समाजासाठीचे योगदान अमूल्य आहे. शासन कोरोना लढवय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

 

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत कोविड योद्धा रामा येथील दिवंगत अंगणवाडी सेविका उषाताई पुंड यांच्या कुटूंबियांना शासनातर्फे ५० लाख रुपयांची मदत पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाद्वारे देण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

प्रारंभी पालकमंत्री यांनी दिवंगत उषाताई पुंड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी पुंड कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना दिलासा दिला.

 

पालकमंत्री म्हणाल्या की, आशा व अंगणवाडी सेविकांनी कोरोना काळात मोलाचे योगदान दिले व देतही आहेत. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पुंड यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. मी स्वतःही एक कुटूंबीय म्हणून या सर्वांसोबत राहीन.

 

एकात्मिक बालविकास योजनेत कोरोनाकाळात सेवारत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांचे निधन झाल्यास सहाय्य दिले जाते. या काळात हौतात्म्य आलेल्या सर्व सेविकांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.उपस्थित आशा सेविका, पर्यवेक्षक यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

 

०००

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...