साथींवर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी सक्षम आरोग्ययंत्रणा उभारावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 













कोविड तपासणी व जनजागृती व्हॅनचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

साथींवर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी सक्षम आरोग्ययंत्रणा उभारावी

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

          अमरावती, दि. 12 : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला आलेल्या अडचणी, नव्याने उभाराव्या लागलेल्या बाबी आदींचा अभ्यास करून यापुढे साथींच्या नियंत्रणासाठी सुसज्ज कायमस्वरूपी यंत्रणा उभी राहण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिल रोहणकर आदी उपस्थित होते.

शहरांबरोबरच ग्रामीण आरोग्य यंत्रणाही बळकट करा

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, साथीची तीव्रता, त्यापासून होणारी हानी रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. चाचणी, उपचार, मार्गदर्शन, लोकशिक्षण याबाबत कायमस्वरूपी यंत्रणा सर्वत्र उभी राहिली पाहिजे. यात ग्रामीण आरोग्य यंत्रणाही बळकट व्हावी. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्ययावत सुविधा उभाराव्यात. चाचणी प्रयोगशाळांचेही अद्ययावतीकरण व्हावे.

 

उपचारानंतरही दक्षता महत्वाची

 

 कोरोनाबाधितांवर उपचारानंतर ते बरे झाल्यावर घरी सोडण्यात येते. मात्र, उपचारानंतरही काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. त्यामुळे त्यांच्या दक्षता, समुपदेशनासाठी यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. याबाबत बरे झालेल्या रूग्णांनी घ्यावयाची काळजी, फिजिओथेरपी, मेडिटेशन याबाबत स्वतंत्र सुविधा दिली जाईल, असे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.

             कोरोना प्रतिबंधासाठी तपासण्यांची संख्या वाढवावी. त्याचप्रमाणे, लसीकरणाचा विस्तारही होणे आवश्यक आहे. व्यक्तीला आपल्या चाचणीचे निष्कर्ष वेळेत कळावेत, यासाठी एसएमएस सुविधा सुरू केली आहे. मात्र, ती खंडित होता कामा नये. लसीकरणाबाबत नोंदणी केलेल्या व्यक्तींना जाणा-या संदेशातही अचूकता व स्पष्टता नसल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. असे होता कामा नये. संपर्क यंत्रणा सुरळीत, सुस्पष्ट, जलद व अचूक असावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी आज दिले.

 

कोविड तपासणी व जनजागृती व्हॅनचा शुभारंभ

 

            कोविड-19 बाबत तपासणी करणे, आवश्यकता वाटल्यास नमुने घेणे व संबधितांना उपचार मिळवून देणे यासाठी कोविड तपासणी व जनजागृती व्हॅनचा शुभारंभही पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाला.

            ठिकठिकाणी जाऊन जनजागृती करणे, संशयितांचे नमुने घेणे व त्यांना उपचार मिळवून देणे यासाठी ही व्हॅन सर्वदूर फिरेल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी दिली. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्रिसूत्रीच्या प्रसाराचे कामही व्हॅनमधील नियुक्त मनुष्यबळाकडून केले जाईल, असे डॉ. निकम यांनी सांगितले.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती