Wednesday, September 3, 2025

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

 

गडांचा राजा : राजगड

 

सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीतील पहिला भक्कम पाया या गडाने घातला. तब्बल पंचवीस वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाने अनेक ऐतिहासिक घटना, शौर्यगाथा, राजकीय निर्णय आणि युद्धांचा साक्षीदार होण्याचा मान मिळवला. मराठ्यांच्या पराक्रमाला व स्वराज्याच्या कर्तृत्वाला दिशा देणारा हा गड, केवळ एक किल्ला नसून स्वराज्याच्या आत्म्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे.

 

राजगड किल्ल्यावर पोहोचण्याचा प्रवास रोमांचकारी आहे. दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटा, खडतर चढण आणि सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्याचा आनंद यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरतो. गडावर पोहोचल्यानंतर दिसणारे विस्तीर्ण पर्वत आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य थकवा दूर करून मन भारावून टाकते. इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम राजगडावर अनुभवता येतो. हा किल्ला केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे दार आहे. इथली शांतता, प्राचीन वास्तू आणि डोंगरमाथ्यावर वाहणारा गार वारा प्रत्येकाला पुन्हा-पुन्हा येथे येण्यासाठी प्रेरित करतो.

 

प्राचीन इतिहास

 

आजचा राजगड किल्ला मुळात "मुरुंबदेव" या नावाने ओळखला जात होता. विविध राजवटींच्या अखत्यारीत असताना या ठिकाणी फक्त बालेकिल्ल्याचा भाग अस्तित्वात होता. परंतु इ.स. १६४३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेताच त्याचे पुनर्निर्माण सुरू झाले. तेव्हाच या गडाला "राजगड" म्हणजेच गडांचा राजा हे साजेसे नाव लाभले आणि स्वराज्याची राजधानी म्हणून तो घोषित करण्यात आला.

 

या गडावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. इथेच शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांचा जन्म झाला. त्यांची पत्नी सईबाई यांचे याच ठिकाणी दुःखद निधन झाले. १६६४ मध्ये सूरत लुटल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचे संरक्षण याच गडावर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक महत्त्वाच्या लढायांची रणनीती राजगडावर आखली. भक्कम तटबंदी, मजबूत बुरुज आणि चतुराईने बांधलेल्या रचना यामुळे हा किल्ला अभेद्य बनला. मुघल आणि आदिलशाही सैन्याने कित्येक वेळा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला.

 

आजही राजगड हा इतिहास, साहस आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे. पर्यटनासाठी हा किल्ला एक उत्तम ठिकाण आहे. किल्ल्यावरील सुवेळा माची, संजीवनी माची आणि बालेकिल्ला ही विशेष आकर्षणाची ठिकाणे. राजगडावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि धुके भरलेले निसर्गदृश्य मन मोहून टाकतात. इतिहासप्रेमी, साहसिक पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी राजगड एक अनोखा अनुभव देणारे ठिकाण आहे.

 

नैसर्गिक रचना आणि संरक्षण व्यवस्था

 

राजगड किल्ला मध्ययुगीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे. सुमारे ४० किलोमीटर परिघ असलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १३७६ मीटर आहे. भक्कम तटबंदी आणि सुयोग्य रचना यामुळे हा किल्ला संरक्षण आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.

 

या किल्ल्याचा मध्यभाग पद्मावती माची म्हणून ओळखला जातो. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते. पद्मावती देवीचे मंदिर, पद्मावती तलाव आणि राजवाड्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. ही माची केवळ निवासासाठीच नव्हे, तर सैन्याच्या हालचालींसाठीही अत्यंत महत्त्वाची होती.

 

किल्ल्याच्या पश्चिमेला संजीवनी माची आहे. येथे तीन स्तरांमध्ये बांधलेली तटबंदी आजही मराठ्यांच्या लढाऊ कौशल्याची साक्ष देते. शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही संरचना अत्यंत उपयुक्त ठरली. पूर्व बाजूला सुवेळा माची आहे. येथून दिसणारे निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. याच ठिकाणी नेढे नावाची मोठी नैसर्गिक दगडी कमान आहे. हा भूशास्त्रीय चमत्कार किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतो. बालेकिल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगेचे अप्रतिम दृश्य दिसते. पूर्वी येथे राजवाडा होता आणि याच ठिकाणी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असत.

 

राजगडाची भौगोलिक व लष्करी रचना अतिशय अद्वितीय आहे. किल्ला डोंगरांच्या उंचसखल उतारांवर बांधलेला असल्याने तो जिंकणे जवळजवळ अशक्य होते. एका सरळसरळ तटबंदीवर अवलंबून न राहता तीन प्रमुख माच्या – पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या गडाला त्रिसूत्री स्वरूपात जोडलेल्या आहेत. या प्रत्येक माचीचा आपापला वेगळा उपयोग होता :

 

•पद्मावती माची – गडाचे हृदय मानली जाणारी ही माची प्रशासनिक व निवासी केंद्र होती. येथे राजसदर, पद्मावती देवीचे मंदिर, महाराजांचे निवासस्थान, राणीवसा तसेच मंत्र्यांचे निवासस्थान यांचा समावेश होता. मोठमोठ्या पाण्याच्या टाक्यांमुळे या माचीवर वर्षभर पाणी उपलब्ध असे.

 

•संजीवनी माची – पश्चिमेकडे पसरलेली ही माची मजबूत तटबंदी, अर्धगोलाकार बुरुज आणि पहारेकऱ्यांसाठी सोयीस्कर स्थानांनी युक्त होती. संरक्षण आणि आक्रमण अशा दोन्ही दृष्टींनी ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असे.

 

•सुवेळा माची – पूर्वेकडे असलेली ही माची अरुंद व उग्र कड्यांवर पसरलेली आहे. येथे पाण्याची टाकी, पहारेकऱ्यांची ठाणी आणि गुप्त, अरुंद प्रवेशद्वार होते. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हे स्थान अनन्यसाधारण उपयोगी ठरत असे.

 

या तिन्ही माच्या एका ठिकाणी येऊन मिळतात – तो म्हणजे बालेकिल्ला. उंच मनोरे, भक्कम भिंती आणि विस्तीर्ण परिसरावर नजर ठेवणारा हा भाग म्हणजे गडाचा सर्वोच्च आणि अंतिम संरक्षणस्तर. गडाच्या प्रवेशासाठी पाली, गुंजवणे व अळू दरवाजा हे मार्ग वापरले जात. तसेच खडकात कोरलेल्या असंख्य टाक्यांमुळे पाणी व धान्यसाठा अखंड उपलब्ध राहावा याची काळजी घेण्यात आली होती.

 

गडाचे वैशिष्ट्य

 

राजगडाच्या बांधणीत केवळ संरक्षणाचा विचार केलेला नव्हता, तर राजकारण, प्रशासन, सैनिक व्यवस्थापन आणि दीर्घकालीन टिकाऊपणा या सर्व बाबी लक्षात घेऊन गड उभारण्यात आला. वळणावळणाच्या पायवाटा, धान्यकोठारे, पहारेकऱ्यांच्या चौक्या यामुळे गड एक परिपूर्ण राजधानी ठरला.

 

सांस्कृतिक वारसा

 

आजचा राजगड हा फक्त एक पुरातन अवशेष नाही, तर जिवंत वारशाचे प्रतीक आहे. येथे होणारे उत्सव गडाच्या ऐतिहासिक महत्त्वाची आठवण करून देतात. दिवाळीच्या वेळी होणारा दीपोत्सव संपूर्ण गडाला दिव्यांच्या उजेडात न्हाऊ घालतो. शिवजयंतीच्या दिवशी तर हजारो लोक गडावर जमतात. पारंपरिक वाद्ये, भाषणे, शिवचरित्रावर आधारित नाटिका यामुळे गड पुन्हा एकदा इतिहासाच्या सोनेरी क्षणात जगू लागतो.

 

जागतिक ओळख

 

इतिहास, वास्तुकला, युद्धतंत्र आणि सांस्कृतिक महत्त्व यांचा अनोखा संगम असलेला राजगड आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या मालिकेत समाविष्ट होऊन भारताचे आणि मराठ्यांचे वैभव जगभर पोचवत आहे. राजगड किल्ला केवळ ऐतिहासिक वारसा नाही, तर तो एक साहस, एक प्रवास आणि मराठ्यांच्या अदम्य शौर्याला वाहिलेली आदरांजली आहे. येथील प्रत्येक दगड भूतकाळाच्या कथा सांगतो. इतिहासप्रेमींना येथे मराठ्यांच्या विजयगाथांचा अनुभव येतो. ट्रेकिंगच्या चाहत्यांसाठी हा किल्ला एक रोमांचक आहे. निसर्गप्रेमींना येथे सह्याद्रीच्या भव्य सौंदर्याचे दर्शन होते. येथील शांतता आणि वारा मनाला ताजेतवाने करतो.

 

राजगड महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि पराक्रमाचे साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. येथे आल्यावर प्रत्येक क्षण संस्मरणीय वाटतो. एकदा का तुम्ही येथे पोहोचलात, तर हा प्रवास केवळ एक ट्रेक राहणार नाही, तर तो एक ऐतिहासिक अनुभव बनून हृदयात कोरला जाईल. राजगड तुमची वाट पाहतो आहे, चला निघा गडांच्या राजाला भेट द्यायला!

 

संजय डी.ओरके

विभागीय संपर्क अधिकारी,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालय, मुंबई

00000

DIO NEWS AMRAVATI 03-09-2025

 









उद्योगांसाठी कर्ज योजनेचे अर्ज तातडीने निकाली काढावेत

-         जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

अमरावती, दि. 3 : केंद्र आणि राज्य शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहे. यासाठी उद्योजकांनी केलेल्या अर्जावर शाखा स्तरावर कार्यवाही झाल्यानंतर तातडीने कर्ज मंजुर करावेत, तसेच कर्जाची रक्कम उद्योजकांनी उचल करावी, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी आज अमरावती येथील भारतीय स्टेट बँकेच्या एमएसएमई शाखेला भेट देऊन कर्ज प्रकरण मंजुरीच्या प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, शाखा व्यवस्थापक ललीत त्रिपाठी, रवीकुमार दालू आदी उपस्थित होते.

 

एमएसएमई शाखेतून पीएमईजीपी, सीएमईजीपी, कृषी, खादी ग्रामोद्योग आदी योजनांचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येतात. कर्ज मागणी आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी. कर्ज प्रकरणांच्या प्रस्तावांची शाखा स्तरावर छाननी करावी करावी. केवळ प्रस्ताव मंजुरीसाठी बँकांनी प्रस्ताव एमएसएमई शाखेकडे पाठवावे. प्रामुख्याने एसबीआयकडे प्रलंबित प्रकरणांची संख्या अधिक असल्यामुळे अधिकचे मनुष्यबळ घेऊन प्रस्ताव मार्गी लावावेत. अर्ज निपटारा करण्यासाठी डिसेंबरची अंतिम मुदत ठेवून कार्यवाही करावी. बँकांनी कर्ज मंजुरीनंतर हे कर्ज उचल करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उद्योगांना प्रोत्साहित करावे.

 

विविध योजनांमधून कर्ज देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. यात 35 टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्यात येत आहे. शासनाच्या योजनेतून कर्ज दिल्यामुळे एकप्रकारे हे कर्जाची हमी शासनाने घेतली आहे. त्यामुळे बँकांनीही कर्ज मंजुरीकरीता पुढे यावे. उद्योजक कर्जाची उचल करू शकतील, अशा कर्जांची प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत. यामुळे उद्योग सुरू होण्यास मदत मिळेल, असेही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.

000000


'भारत जनसंग्राम पक्ष'ला निवडणूक आयोगाची नोटीस

अमरावती, दि. 3 : जिल्ह्यातील 'भारत जनसंग्राम पक्ष' या राजकीय पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाने गेल्या सहा वर्षांपासून, म्हणजेच २०१९ पासून, कोणत्याही निवडणुकीत उमेदवार उभा केला नसल्याने ही कारवाई करण्यात येत आहे. आयोगाने पक्षाला नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून वगळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या पक्षाला 4 सप्टेंबरपर्यंत म्हणणे सादर करावयाचे आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या कलम २९-अ अंतर्गत 'भारत जनसंग्राम पक्ष' राजकीय पक्ष म्हणून नोंदणीकृत आहे. मात्र, २०१९ पासून झालेल्या लोकसभा किंवा कोणत्याही राज्य विधानसभेच्या निवडणुका किंवा पोटनिवडणुकांमध्ये या पक्षाने कोणताही उमेदवार उभा केलेला नाही. यामुळे, हा पक्ष कलम २९-अ च्या उद्देशांसाठी राजकीय पक्ष म्हणून कार्यरत नाही, असे आयोगाचे म्हणणे आहे.

या प्रस्तावावर कारवाई करण्यापूर्वी, निवडणूक आयोगाने पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे. पक्षाला ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत आपले लेखी म्हणणे, अध्यक्षांचे किंवा सरचिटणीसांचे प्रतिज्ञापत्र, आणि संबंधित कागदपत्रे मुख्य निवडणूक अधिकारी, कक्ष क्रमांक 624, ॲनेक्स, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, १० सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईतील मंत्रालय येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीला पक्षाचे अध्यक्ष, सरचिटणीस किंवा पक्षप्रमुख यांची उपस्थिती अनिवार्य आहे.

 

 

पक्षाने दिलेल्या मुदतीपर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही, तर पक्षाला या प्रकरणी काहीही म्हणायचे नाही असे गृहीत धरून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

 

00000

 



Tuesday, September 2, 2025

DIO NEWS AMRAVATI 02-09-2025

 


जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

अमरावती, दि. 01 : अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर सोमवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयएएस अधिकारी श्रीमती कौशल्या एस. आणि उपजिल्हाधिकारी सोनल सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. दोन्हीही अधिकारी त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अनुभवावर आधारीत मार्गदर्शन करणार आहेत.

सदर शिबिर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात होणार असून, प्रवेश निःशुल्क आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000



ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 2 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार, दि. 3 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, बुधवार, दि. 3 सप्टेंबर रोजी 3 वाजता विश्रामगृह, तिवसा येथे तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा करतील. दुपारी 3.30 वाजता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.

00000






मेळघाट आरोग्य परिक्रमेतील पहिल्या शिबीरात 207 रूग्णांची तपासणी

* मेळघाटात 56 शिबीरे घेण्यात येणार


अमरावती, दि. 2 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार मेळघाट आरोग्य परिक्रमा अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत मेळघाटातील गावांमध्ये 56 आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात सोनोग्राफी, एक्स-रे सह औषधोपचार मोफत देण्यात येत आहे. या अभियानातील चिखलदरा येथील पहिल्या शिबीरात 207 रूग्णांची तपासणी करण्यात आली.

मेळघाट परिसरात या अभियानांतर्गत 30 मे पासून आरोग्य शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. यातील चिखलदरा येथे शिबीरात 208 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात गर्भवती माता, वृद्ध, बालके, महिलांनी आरोग्य चिकित्सेचा लाभ घेतला. शिबीरात स्त्रीरोग विभाग 71, अति जोखमीच्या माता 52, स्तनदा माता 19, बालरोग 49, नेत्ररोग 39, असंसर्गजन्य रोग 48, ईसीजी 19, मोतीबिंदू 9, शस्त्रक्रिया 7, हृदयरोग 2, मधुमेह 2, तसेच जिल्हास्तरावी तातडीची उपाययोजना करणे आवश्यक आहे अशा रूग्णांची तपासणी करण्यात आली. 52 रूग्णांची सोनोग्राफी करण्यात आली. यातील 24 रूग्णांना संदर्भित करण्यात आले आहे.

मेळघाटातील आदिवासींची सर्वकष आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मेळघाट आरोग्य परिक्रमा अभियान राबविण्यात येत आहे. यात प्रत्येक आठवड्यात एक याप्रमाणे महिन्याला चार आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे. पुढील सात महिने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तपासणी करून रूग्णांवर उपचार आणि आवश्यक औषधोपचारही मोफत करण्यात आले.

शिबीरात शल्यचिकित्सक डॉ. संजय पाठक, बालरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंग राजपुर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. आशिष धवळे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. स्नेहल शेट्टी, डॉ. राठी यांनी सेवा दिली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी संजिता महापात्र यांच्या संकल्पनेतून अभियान राबविण्यात येणार आहे. शिबीरासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखेडे, डॉ. वानखडे, डॉ. पिंपरकर आणि डॉ. जाकीर यांच्यासह गोडे वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहकार्य केले.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या खुर्च्या विक्रीसाठी दरपत्रक आमंत्रित

 

अमरावती, दि. 2 : जिल्हाधिकारी कार्यालयातील वापरात नसलेल्या शासकीय लाकडी आणि लोखंडी खुर्च्यांची जाहीर विक्री केली जाणार आहे. यासाठी दरपत्रक आमंत्रित करण्यात आले आहे.

यामध्ये विविध प्रकारच्या २३७ खुर्च्यांचा समावेश आहे. या खुर्च्या 'जशा आहेत त्याच स्थितीत' विकल्या जाणार आहेत, त्यामुळे इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी प्रत्यक्ष पाहणी करूनच दि. 10 सप्टेंबरपर्यंत दरपत्रक सादर करावेत. या संदर्भातील सविस्तर अटी व शर्ती amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी कळविले आहे.

00000

 

 

शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात अद्वितीय स्मृतिचिन्ह

 शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात अद्वितीय स्मृतिचिन्ह



Monday, September 1, 2025

आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावंतासाठी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती



 आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावंतासाठी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती

#महाराष्ट्रशासन

#शासनयोजना

#अमरावती

 

सारथी मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था

  


सारथी मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था


#महाराष्ट्रशासन

#शासनयोजना

#अमरावती

 

श्रीमंत मालोजी राजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम कौशल्य प्रशिक्षणातून अत्याधुनिक प्रशिक्षण

 


श्रीमंत मालोजी राजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम कौशल्य प्रशिक्षणातून अत्याधुनिक प्रशिक्षण

#महाराष्ट्रशासन

#शासनयोजना

#अमरावती

महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेतून शिक्षणासाठी परदेश भरारी सोपी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाला सहाय्य



 महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेतून शिक्षणासाठी परदेश भरारी सोपी

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाला सहाय्य

#महाराष्ट्रशासन

#शासनयोजना

#अमरावती

स्टार्टअप कल्पनांना मूर्त रूप देणारा सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास कार्यक्रम


स्टार्टअप कल्पनांना मूर्त रूप देणारा सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास कार्यक्रम



 

विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी सुविधायुक्त छत्रपती शिवाजी महाराज संकुल



 विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी सुविधायुक्त छत्रपती शिवाजी महाराज संकुल

#महाराष्ट्रशासन

#शासनयोजना

#अमरावती

 

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...