अमरावती शिक्षक मतदार संघाची प्रारूप यादी प्रसिद्ध;
दावे-हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत
अमरावती, दि. 04 (जिमाका) : अमरावती विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत, दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी 3 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या कार्यालयात ही यादी नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध असून, यामध्ये सध्या 8 हजार 104 मतदारांची (पुरुष: 5 हजार 113 आणि महिला: 2 हजार 991) नोंदणी झाली आहे.
या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती सादर करण्यासाठी 3 ते 18 डिसेंबर 2025 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी आपली नावे तपासावीत आणि यादीत काही दुरुस्ती असल्यास किंवा नवीन नोंदणीसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अथवा तहसीलदार तथा पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे निर्धारित वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. प्राप्त झालेले दावे व हरकती निकाली काढून 12 जानेवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
000000
एचआयव्ही जनजागृती रॅलीमध्ये अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अमरावती, दि. 04 (जिमाका): दरवर्षी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त अमरावती शहरात आज 'भव्य एड्स जनजागृती रॅली’चे आयोजन करण्यात आले. ‘अडथळ्यावर मात करू, एकजुटीने एड्सला लढा देऊ, नवपरिवर्तन घडवू’ या घोषवाक्यासह शहरातील अडीच हजाराहून अधिक विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
जिल्हा सामान्य रुग्णालयातून या रॅलीला महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचानालयाचे संचालक डॉ. विनोद कंदेवाड यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कंदेवाड यांनी जिल्ह्याने एचआयव्ही संक्रमणाचा टक्का कमी केल्याबद्दल कौतुक केले. सर्वसमावेशक जनजागृतीने एचआयव्हीच्या जनजागृती कार्यक्रमास मदत होईल आणि आपण निर्मूलनाचे उद्दीष्ट साध्य करू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातून निघालेली ही रॅली रेल्वे कॉटन मार्केट, राजकमल, श्याम चौक मार्गे पुन्हा इर्विन चौकातून जिल्हा सामान्य रुग्णालयात समारोपित झाली. रॅलीत वैद्यकीय, नर्सिंग, समाजकार्य, कृषी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. तसेच, अति जोखमीच्या गटांसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांचे माहिती रथ यात समाविष्ठ होता, ज्यातून समुपदेशन आणि सुविधांची माहिती देण्यात आली. या यशस्वी आयोजनात अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचौरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
0000000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment