जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभाराव्यात
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर
*जिल्ह्यातील पर्यटन वाढविण्यावर भर
अमरावती, दि. 16 : जिल्ह्यात चिखलदरा हे महत्वाचे पर्यटनस्थळ आहे. प्रामुख्याने नैसर्गिक आणि वन्य प्राणी पाहण्यासाठी जंगल सफारी हे प्रमुख आकर्षण आहे. त्यामुळे याठिकाणी विकासात्मक पायाभूत सुविधा उभाराव्यात, तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांच्या करमणुकीसाठी साधने उभारल्यास पर्यटक मुक्कामासाठी थांबण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पायाभूत सुविधा आणि चिखलदरा पर्यटनाबाबत आढावा घेण्यात आला. यात चिखलदरा येथील पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने विविध विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेण्यात आली.
चिखलदरा येथे सिडकोमार्फत स्कायवॉक उभारण्यात येत आहे. स्कायवॉक उभारणीत अडचणी आल्याने काम पूर्ण करण्यासाठी स्कायवॉकच्या मध्यभागी जमिनीतून आधार देणे आवश्यक आहे. यासाठी तात्पुरता पाया उभारण्यात येणार आहे. गोल रस्त्याचे काम करण्यात येणार असून यात वन विभागाच्या जागेवर तोडगा काढण्यात येणार आहे. याठिकाणी निसर्ग पर्यटनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी सादरीकरण करण्यात आले. चिखलदरा येथेच साहसी खेळाची अकॅडमी उभारण्यात येणार आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच कोलकास येथे कोरकू यांच्या जीवनावर आधारीत केंद्र उभारण्यात येणार आहे.
चिखलदरा येथे येणारा पर्यटक याठिकाणी थांबावा, यासाठी लाईट इफेक्ट गार्डनची सूचना करण्यात आली. मात्र याठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर असल्याने ही बाब तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. गाविलगड किल्ल्याचा विकास पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार करावा. आमझरी हे मधाचे गाव म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे येथे प्रशिक्षण आणि इतर सुविधा उभारण्यात याव्यात. यासोबतच मेळघाटातील 22 गावांमध्ये वीज पोहोचण्यासाठी वनविभागाच्या सर्व परवानगी घ्यावी. पीएम मित्रा पार्कमध्ये विज उपकेंद्रासाठी जागा मिळणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे. मोर्शी आणि वरूड भागासाठी संत्रा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात यावी. याठिकाणी कार्यरत जैन आणि एमकेसी यांच्यासोबत समन्वय राखण्यात येणार आहे.
00000
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर
अमरावती, दि. 16 : नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता दि. 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान केंद्र असणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना दि. 19 आणि 20 डिसेंबर रोजी दोन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, अचलपूर, वरुड, दर्यापूर, आणि धारणी येथील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेले मतदान अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्य घेऊन केंद्राचा ताबा घेणार असल्याने दोन दिवसांची सुट्टी असणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहे.
00000
राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा 2025-26
चे अमरावती येथे आयोजन
अमरावती, दि. 16 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १७ व १९ वर्ष मुले व मुलींची राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ चे आयोजन दि. १७ ते २० डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. गुरूवार, दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
जिल्हा क्रीडा संकुलाच्या खेलो इंडिया आर्चरी आंतरराष्ट्रीय रेंजवर स्पर्धा होणार आहे. राज्यातील ८ महसूल विभाग आणि १ क्रीडा प्रबोधिनी, पुणे अशा एकूण ९ विभागांतील १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी सुमारे ४८५ खेळाडू, संघव्यवस्थापक, प्रशिक्षक आणि निवड समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटक कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, राज्य ऑलिम्पीक संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर उपस्थित राहतील. उद्घाटन समारंभात आर्चरी खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू तुषार शेळके, मानव जाधव, कुमकुम मोहोड, यशदिप भोगे, मधुरा धामणगांवकर, पुर्वशा शेंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
निवड समिती इंडियन, कंपाऊंड व रिकर्व्ह या क्रीडा प्रकाराचे निरीक्षण करून महाराष्ट्र राज्याच्या १७ व १९ वर्ष मुले व मुलींच्या संघाची निवड करतील. महाराष्ट्र राज्याचा संघ दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी घोषित करण्यात येणार आहे. निवड झालेल्या संघातील खेळाडू झारखंड व मणिपूर येथे होणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना आकर्षक मेडल्स व प्राविण्य प्रमाणपत्रे. तसेच सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धा सहभाग प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहे.
000000
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment