अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची प्रारुप यादी प्रसिद्ध;
लिंकवर मतदारांना शोधता येणार आपले नाव
अमरावती, दि. 17 (जिमाका ): भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक विधानपरिषद मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार, दि. 3 डिसेंबर 2025 रोजी शिक्षक मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदारांना आता घरबसल्या आपले नाव ऑनलाइन शोधता येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालय आणि विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दि 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन नाव शोधण्यासाठी अधिकृत लिंक शिक्षक मतदारांच्या सुविधेसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी संकेतस्थळ https://ceoelection.
उपलब्ध करून दिले आहे.
अमरावती विभागातील सर्व पात्र शिक्षकांनी या प्रारुप यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करावी. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन उप-जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
000
सोमठाणा खुर्द येथील प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणार;
कागदपत्रे सादर करण्याचे अकोट वन्यजीव विभागाचे आवाहन
अमरावती, दि. 17 (जिमाका) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मौजे सोमठाणा खुर्द या गावाचे पुनर्वसन सन 2013-14 मध्ये करण्यात आले असून, या गावातील 42 शेतमुल्यांकनधारक व 21 वनहक्कधारक यांना आता नवीन भूसंपादन कायद्यानुसार शेतीची एक पट रक्कम व त्यावरील 30 टक्के दिल्याचा रक्कम अदा करण्यात आलेले आहे. भूसंपादन कायदा 2013 नुसार, मौजे सोमठाणा खुर्द येथील 42 शेतमल्यांकनधारक व 21 हक्क धारक यांच्यासाठी निधी उपलब्ध झाला असून शेतमुल्यांकन व वन हक्कधारक यांना शेतीचा मोबदला रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग यांनी यासंदर्भात माहिती दिली असून उर्वरित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे आवाहन केले आहे.
मौजे सोमठाणा खुर्द येथील पुनर्वसन अधिनियम 1999 च्या तरतुदींनुसार झाले होते. सुरुवातीला शासन निर्णयानुसार 42 शेतमुल्यांकनधारक व 21 वनहक्कधारक यांना शेतीच्या मूल्यांकनाची 1 पट रक्कम आणि त्यावर 30 टक्के दिलासा रक्कम देण्यात आली होती. मात्र, केंद्र शासनाचा भूसंपादन अधिनियम 2013 लागू झाल्याने आणि नवीन धोरणानुसार जमिनीचा मोबदला वाढीव दराने मिळणे अपेक्षित असल्याने, आता या लाभार्थ्यांना मुल्यांकनाच्या 4 पट रक्कम देय ठरली आहे. त्यानुसार, यापूर्वी अदा केलेली 1 पट रक्कम व 30 टक्के दिलासा रक्कम वजा करून उर्वरित मोबदला वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
काही लाभार्थ्यांना यापूर्वीच रक्कम अदा करण्यात आली आहे, परंतु उर्वरित शेतमुल्यांकनधारक व वनहक्कधारकांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत. यामुळे प्रशासनाला देय रक्कम वितरित करण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. तरी संबंधित लाभार्थ्यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्ज, बँक पासबुकची छायाप्रत, शेतीचा 7/12 उतारा आणि मूळ खातेदार मयत असल्यास वारस प्रमाणपत्र व वारसाच्या बँक खात्याची छायाप्रत अकोट वन्यजीव विभाग कार्यालयात तात्काळ जमा करावी. लाभार्थ्यांची नावनिहाय यादी महाराष्ट्र वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, ग्रामस्थांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला प्रलंबित मोबदला प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन अकोट वन्यजीव विभाग उपवनसंरक्षक आर. एस. टोलिया यांनी केले आहे.
0000
सैनिक कल्याण विभागात 72 लिपिक पदांची भरती;
31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत
अमरावती, दि. 17 (जिमाका): महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे आणि त्यांच्या अधिपत्याखालील विविध जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांमध्ये 'लिपिक टंकलेखक (गट-क)' या संवर्गातील एकूण 72 रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती प्रक्रियेत महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेले माजी सैनिक तसेच शासन निर्णयानुसार युद्ध काळात किंवा शांततेच्या काळात सैनिकी सेवेत कार्यरत असताना शहीद झालेल्या किंवा अपंगत्वामुळे नोकरीसाठी अयोग्य ठरलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील एका वारसदाराला पात्रतेनुसार अर्ज करता येणार आहे. एकूण 72 पदांपैकी 3 पदे किमान 40 टक्के दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली असून, दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार व गुणवत्तेनुसार ही निवड केली जाणार आहे.
या संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahasainik.maharashtra.
000
अमरावतीत होणार आंतरराष्ट्रीय 'एआय' परिषद
अमरावती, दि. १७ ( जिमाका): तंत्रज्ञानाच्या युगात मैलाचा दगड
ठरणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित 'ICAIISD-2025' या दोन दिवसीय
आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे १९ व
२० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून संशोधन, नवोन्मेष
आणि समाजविकासाचा जागतिक संवाद विदर्भाच्या मातीत घडणार आहे.
शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता या परिषदेचे उद्घाटन
होणार असून, यासाठी देश-विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ आणि उद्योजकांची मांदियाळी
जमणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सचिन
मांडवगणे तर प्रमुख अतिथी म्हणून बंगळुरू येथील 'आयआयएसी'चे ज्येष्ठ प्राध्यापक
डॉ. फणिंद्र कुमार यलवर्थी मार्गदर्शन करतील. याशिवाय, न्यूरोसिनॅप्टिकचे समीर
सावरकर, सी-कॅम्पचे डॉ. निरंजन जोशी आणि डॉ. रविंद्र केसकर यांसारख्या दिग्गजांची
उपस्थिती परिषदेला लाभणार आहे.
या परिषदेत प्रामुख्याने शेती, आरोग्य, शिक्षण, स्मार्ट सिटी,
सौर ऊर्जा आणि ग्रामीण विकास यांसारख्या १३ महत्त्वाच्या विषयांवर १३ संशोधन
प्रबंध सादर केले जातील. या परिषदेचे शोधप्रबंध 'स्प्रिंगर नेचर' सारख्या जागतिक
स्तरावरील नामांकित प्रकाशनाद्वारे प्रसिद्ध केले जाणार आहेत.
विदर्भातील विद्यार्थी आणि संशोधकांना जागतिक दर्जाच्या
तज्ज्ञांशी थेट संवाद साधता यावा आणि स्थानिक प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने
उत्तरे शोधता यावीत, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. टाटा मोटर्स आणि टीसीएस
सारख्या उद्योगांचे सहकार्य लाभलेली ही परिषद तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा
देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
00000
शहरात कलम 37 (1) व (3) लागू
अमरावती,दि.17 : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिसूचना व आदेशान्वये पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
अधिसूचना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) नुसार शस्त्र तसेच विस्फोटकाच्या मालाची वाहतूक, जमावाचे एकत्रीकरण, बदनामीकारक वक्तव्य तसेच कलम 37 (3) नुसार कोणत्याही मानवी मेळाव्यास, मिरवणुकीस कोणत्याही ठिकाणी आयोजित करण्यास सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपरोक्त नमूद कालावधीकरिता बंदी घालण्यात येत आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाचे परिक्षेत्र वगळून करण्यात आला असून दि. 30 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment