ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याची
उत्कृष्ट कामगिरी
राज्यपालांच्या हस्ते
जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार
अमरावती, दि. 10 : ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा सत्कार
करण्यात आला. मुंबई येथील लोकभवनातील जय विहार येथे हा कार्यक्रम पार पडला.
राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र आणि स्मृती चिन्ह असे गौरवाचे स्वरूप
आहे.
सत्कारावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाठारकर उपस्थित होते.
जिल्ह्याला २०२४-२५ या वर्षासाठी १ कोटी २३ लाख रूपयांचे लक्ष्य देण्यात आले. त्या
तुलनेत १ कोटी ६४ रूपयांचा निधी संकलित करण्या आला. जिल्ह्याने निधी संकलनात
अमरावती विभागात अव्वल स्थान पटकावले असल्याने हा सन्मान करण्यात आला. संकलित निधी
माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांच्या कल्याणासाठी उपयोगात आणल्या जाणार आहे.
जिल्ह्याने ध्वजदिन २०२४ साठी देण्यात आलेले उद्दिष्ट काही महिन्यांत पूर्ण
केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी इष्टांकापेक्षा अधिक निधी गोळा केला आहे. यामुळे
युद्धविधवा, माजी सैनिक आणि त्यांच्या
कुटुंबियांच्या कल्याण व पुनर्वसन, तसेच कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मदत होणार आहे.
00000
‘अमृत’च्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
अमरावती, दि. 10 : खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ‘अमृत’च्या
अमरावती विभागीय कार्यालयाचे आज उद्घाटन पार पडले.
अमरावतीतील
आशीर्वाद बिल्डिंग, मालटकेडी समोर,
बसस्टँड रोड, टोपेनगर येथे कार्यालयाचे
उद्घाटन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रबंधक संचालक सिद्धेश्वर वरणगावकर, राज्य
व्यवस्थापक दीपक जोशी, नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश
खाडीलकर, अमरावती विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, तसेच जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार उपस्थित होते.
विजय
जोशी यांनी, जिल्ह्यात ‘अमृत’चे कार्यालय
सुरू झाल्याने कौशल्य विकास, प्रशिक्षण, रोजगारनिर्मिती, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, स्वयंरोजगार संधी आणि औद्योगिक मार्गदर्शन अधिक सुलभ आणि प्रभावीपणे
उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगार व उद्योजकतेच्या नव्या
दिशांना चालना मिळणार असल्याचे सांगितले.
राज्यात
विविध उपक्रम राबवणारी अमृत संस्था युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी सातत्याने
प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि औद्योगिक
कौशल्य विकासाचे प्रबोधन करीत आहे. आता या सर्व सुविधा अमरावतीमध्ये स्थानिक
पातळीवर उपलब्ध होत असल्याने अनेक उपक्रमांची अंमलबजावणी जलदगतीने होणार आहे.
यावेळी
विविध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच
अमृतचे लाभार्थी यांच्या यावेळी भेटी घेण्यात आल्या. उद्घाटन कार्यक्रमाला विविध
क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, सामाजिक
कार्यकर्ते, विविध जिल्ह्यातील अधिकारी, तसेच अमृत संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
00000
मध्यवर्ती कारागृहात ‘मानवी हक्क आणि संरक्षण’बाबत जागृती
अमरावती, दि. 10 : विधी सेवा प्राधिकरण
आणि मानवी हक्क आयोग, तसेच कारागृह
विभागातर्फे आज कारागृहातील बंद्यांसाठी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे औचित्य
साधून बंद्यांचे ‘मानवी हक्क आणि संरक्षण’ याबाबत कायदेविषयक जागृती करण्यात आली.
बंद्यांना मानवी हक्काची माहिती व्हावी, यासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलिस आयुक्त
अरविंद चावरीया, अधीक्षक किर्ती चिंतामणी, अॅड. अमित सहारकर उपस्थित होते.
पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांनी कारागृहातील बंद्यांना शिस्तीचे वर्तन करुन
नियमाचे पालन करावे. मानवी अधिकाराचे उल्लंघन झाल्यास कायदा आहे, त्यामूळे कोणाच्याही अधिकाराचे उल्लंघन करु नये, सर्व धर्मग्रंथाचे वाचन केल्यास मानवी मुल्य जपली जातील.
तसेच स्वत:मधील मीपणाची भावना कमी झाल्यास मानवी मुल्ये जपता येतील, असे सांगितले. न्यायरक्षक कार्यालयाचे अॅड. अमित सहारकर
यांनी,
बंद्यांचे कारागृहातील हक्क व कर्तव्ये या विषयी माहिती
दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. एस. वमने यांनी प्रास्ताविक केले.
कारागृह शिक्षक ललित मुंडे यांनी सुत्रसंचालन केले. कारागृह अधीक्षक किर्ती
चिंतामणी यांनी आभार मानले. कारागृहातील उपअधीक्षक प्रदिप इंगळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव जाधव, शामराव गिते, मंडल तुरुंगाधिकारी धनसिंग कवाळे, कारागृह शिक्षक संजय घोलप, प्रवीण धर्माळे, गोपाल कचरे, सुभेदार राहूल पंधरे, उमेश साबळे, कृष्णकांत सांबारे, पवन ईखार, यादव कातोरे यांनी पुढाकार
घेतला.
00000
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती
कार्यक्रमात जिल्हा विदर्भात अव्वल
*युवकांनी लाभ
घेण्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन
अमरावती, दि. 10 : राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जिल्ह्याने विदर्भात प्रथम क्रमांक, तर राज्यात सहावे स्थान पटकावले आहे. जिल्ह्याला आर्थिक
वर्ष २०२५-२६ करिता १ हजार ६०० कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे लक्ष्यांक असताना, नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून बँकांना
एकूण २ हजार ४८० कर्जप्रकरणे पाठवण्यात आली आहेत. यापैकी ५११ प्रकरणांना बँकांकडून
मंजुरी मिळाली आहे.
राज्यातील युवक-युवतींच्या सर्जनशीलतेला वाव देऊन स्वयंरोजगारास प्रोत्साहन
देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली
आहे. वाढत्या बेरोजगारीवर उपाय म्हणून युवकांना नोकरी शोधण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय
उभारण्यास प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पात्र लाभार्थ्यांना
प्रवर्गनिहाय एकूण प्रकल्प खर्चाच्या १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.
या योजनेत उत्पादन करणाऱ्या उद्योगांसाठी १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, तर अनुदानाची कमाल मर्यादा १७.५० लाख रुपये आहे. सेवा
उद्योगांसाठी ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज असून अनुदानाची मर्यादा ७ लाख रुपयांपर्यंत
आहे. ग्रामीण भागात व्यवसाय उभारल्यास शहरी भागापेक्षा १० टक्के अधिक अनुदान
मिळते. तसेच, मागास प्रवर्ग, महिला, दिव्यांग, माजी सैनिक आणि अल्पसंख्यांक यांना अतिरिक्त अनुदानाची
तरतूद आहे. अर्ज करण्यासाठी १८ वर्षे वय असणे आवश्यक असून वयाची कमाल मर्यादा
नाही. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अधिकृत पोर्टलवर अर्ज भरता येतो.
या योजनेची अंमलबजावणी जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योग मंडळ
यांचेमार्फत केली जाते. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनामुळे
जिल्ह्यात या योजनेला गती मिळाली आहे. दर महिन्याला सर्व बँकर्स, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक व यंत्रणांची सभा घेऊन योजनेच्या
अंमलबजावणीचा आढावा घेत आहेत. जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक नरेश हेडाऊ यांच्याकडून
बँकांना उद्दिष्टपूर्तीसाठी सूचना देण्यात येत आहेत.
या योजनेत आतापर्यंत राष्ट्रीयकृत बँकांकडूनच कर्ज प्रस्तावाना मंजुरी मिळाली
आहे. खासगी बँकांकडून कर्ज प्रस्तावांना मंजुरी देऊन त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी
प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी खासगी बँकांवर कारवाई
करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा
अग्रणी बँक प्रबंधकांना दिले आहेत. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश
निकम यांच्या नियोजनात जिल्हास्तरावर योजनेची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे
आयोजित केली जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती
कार्यक्रम योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले
आहे.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment