Monday, December 29, 2025

DIO NEWS 29-12-2025

 नववर्षानिमित्त चिखलदरा येथील वनवे वाहतूक व्यवस्था दोन दिवस राहणार

*पर्यटकांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

अमरावती, दि. 29 ( जिमाका): सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि घाट रस्त्यावरील संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वाहतूक नियमात अंशत: बदल केले आहेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, बुधवार (31 डिसेंबर 2025) ते गुरुवार (1 जानेवारी 2026) या कालावधीत चिखलदरा मार्गावर 'वन-वे' (एकमार्गी) वाहतूक लागू करण्यात आली आहे.

चिखलदऱ्याकडे येणारा परतवाडा ते चिखलदरा हा रस्ता अरुंद आणि तीव्र घाटाचा असल्याने अपघाताची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने चिखलदऱ्याला जाण्यासाठी आणि परतण्यासाठी वेगवेगळे मार्ग निश्चित केले आहेत. नवीन नियमानुसार, पर्यटकांना चिखलदऱ्याला जाताना परतवाडा-धामणगाव गढी-चिखलदरा या मार्गाचा वापर करावा लागेल. तर पर्यटनानंतर परत येताना चिखलदरा-घटांग-परतवाडा या एकमार्गी रस्त्यानेच खाली उतरावे लागणार आहे.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या मार्गावरील गावांमध्ये राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना या नियमातून सवलत देण्यात आली आहे. मात्र, इतर पर्यटकांनी या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियम, 1988 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 नुसार कारवाई करण्यात येईल. चिखलदऱ्यातील कडाक्याची थंडी आणि पर्यटकांचा ओघ पाहता जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

000000

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी

पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

 अमरावती, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यादिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवार नामांकन पत्र दाखल करण्याची शक्यता आहे. अशावेळी सभांचे आयोजन व मिरवणूक काढण्यात येतात.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना दि. 10 जानेवारी 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी करुन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान करण्याचेआदेश पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी निर्गमित केला आहे.

 रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, सर्व धाब्यावर आणि सार्वजनिक ठिकाणच्या कपडे धुण्याचा व उतरविण्याचा जागेच्या ठिकाणी व इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सक्षम अधिका-यांनी या अधिनियमाच्या कलम 33, 35, 37 ते 40, 44 व 45 अन्वये कार्यवाही करावी, असे पोलीस आयुक्त यांच्या आदेशात नमूद केले आहे.

 

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...