Tuesday, December 30, 2025

DIO NEWS 30-12-2025

                            तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न

अमरावती, दि. 30 (जिमाका): भावी पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी आणि जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या तालुकास्तरीय पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांसाठी  'तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था' कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ‘तंबाखू मुक्त पिढी : शाळांसाठी आव्हान’ या विषयाच्या अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये उपशिक्षणाधिकारी, महानगरपालिका शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, शाळा केंद्र प्रमुख आणि विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराच्या दुष्परिणामांबाबत समाजात आणि विशेषतः लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी शासन स्तरावर निरंतर प्रयत्न सुरू आहेत. ज्यामध्ये शाळा आणि शैक्षणिक संस्था केंद्र व राज्य शासनाच्या निकषांनुसार तंबाखूमुक्त करण्यासाठी रॅली, पोस्टर, घोषवाक्ये, कविता आणि पथनाट्ये यांसारखे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री करणे हा दंडात्मक गुन्हा असून 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू विकणे किंवा तसे करण्यास भाग पाडणे हा कठोर शिक्षेस पात्र गुन्हा आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील शाळांकरिता विशेष पोस्टर्स, बॅनर्स आणि बोर्ड्सचे वाटप करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य  मिलिंद कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षक डॉ. मंगेश गुजर यांनी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या  निकषांची माहिती दिली, तर मंगेश गायकवाड यांनी 'तंबाखू नियंत्रण कायदा 2003' बाबत मार्गदर्शन केले. या मोहिमेत शिक्षण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, संभाजी नगर यांनी संयुक्त सहभाग नोंदवला असून, कार्यशाळेतील प्रशिक्षित अधिकारी आता शाळा स्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन व पर्यवेक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत.

000000

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

        अमरावती, दि. 30 (जिमाका): जिल्ह्यातील रिक्त  ठिकाणी आधार नोंदणी केंद्रांचे वाटपाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती मार्फत करण्यात  येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता प्राप्त व सुरू असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले  आहे. अर्ज स्वीकृतीची तारीख दि. 31 डिसेंबर 2025 ते 09 जानेवारी 2026 ही आहे.

      वलगांव, तालुका अमरावती-1, आसरा, तालुका भातकुली -1, मंगरूळ चव्हाळा, तालुका नांदगाव खंडेश्वर-1, लोणी, तालुका नांदगाव खंडेश्वर-1, घुईखेड, तालुका चांदुर रेल्वे-1, जुना धामणगांव, तालुका धामणगाव-1, वऱ्हा, तालुका तिवसा-1, हिवरखेड, तालुका मोर्शी-1, लोणी, तालुका वरूड-1, पुसला, ता. वरूड-1, बेलोरा, ता. चांदुर बाजार-1, रासेगांव, ता. अचलपूर-1, वडनेर गंगाई, ता. दर्यापूर-1, भंडारज, ता. अंजनगांव सुर्जी-1, धुलघाट, ता. धारणी-1, हरिसाल, ता. धारणी-1, गौलखेडा, ता. चिखलदरा-1, टेंब्रुसोंडा, ता. चिखलदरा-1, असे एकुण 18 नवीन आधार केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

00000

राज्यस्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे  5 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजन

            अमरावती, दि. 30 (जिमाका): सन 2025-26 या वर्षातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभागामार्फत करण्यात येणार आहे. ही क्रीडा स्पर्धा  दि. 5, 6 व 7 जानेवारी 2026 या  कालावधीत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात या कार्यालयाच्या स्तरावरून विविध समित्या गठीत करण्यात आल्या असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

000000

नुतन वर्षानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

*नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 30 (जिमाका) : नवीन वर्षानिमित्त बुधवार, दि. 31 डिसेंबर 2025 रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

आदेशानुसार बुधवारी, रात्री 10 ते दि. 1 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील रस्ते सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद राहतील. यात शहरातील उड्डाणपूल, गाडगेबाबा समाधी मंदिरापासून ते शिवाजी शिक्षण संसथा व जिल्हा स्टेडियमकडे जाणारा उड्डाणपूल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन, कुथे हॉस्पीटल ते नंदा मार्केट व कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनाना प्रवेश बंदी राहणार आहे.

शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त यांनी मुंबई पोलीस कायदा 1951चे कलम 33 (1) (ब), तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 नुसार सदर आदेश निर्गमित केला आहे. या आदेशाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...