'नववर्ष प्रण - सुरक्षित अन्न' विशेष तपासणी मोहीम सुरू
अमरावती, दि. 31 (जिमाका) : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत जिल्ह्यात 'नववर्ष प्रण - सुरक्षित अन्न' विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. हे विशेष अभियान 24 डिसेंबरपासून सुरू झाले असून 10 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील हॉटेल, उपहारगृहे, क्लब हाऊस आणि रिसॉर्ट्स इत्यादी आस्थापनांची कसून तपासणी केली जाणार आहे. तपासणीसोबतच संबंधित आस्थापना चालकांसाठी सुरक्षित अन्नाबाबतच्या सवयी आणि नियमांबाबत सभा व कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी सर्व अन्न व्यावसायिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने केले आहे. या मोहिमेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाणार आहे.
00000
सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सुरू
अमरावती, दि. 31 (जिमाका) : सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी अमरावती येथील भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्रातर्फे दि. 1 जानेवारी ते 31 जुन 2026 या मुदतीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. 1 ते 30 जानेवारी 2026 या दरम्यान प्रवेश देण्यात येणार आहे.
सहकार विभागाने सहकारी संस्थांमध्ये काम कारणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकारी व्यवस्थापन पदविका अनिवार्य केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दुरूस्थ शिक्षण पद्धतीने पुर्ण करता यावा, तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये सदर पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पोस्टल पद्धतीने सुरू केला आहे.
प्रवेशासाठी प्राचार्य, भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार प्रशिक्षण केंद्राचे भाऊसाहेब भोकरे यांनी केले आहे.
00000
मेरा युवा भारततर्फे तालुकास्तरीय खेळ स्पर्धा
अमरावती, दि. 31 (जिमाका) : मेरा युवा भारत आणि नांदगाव खंडेश्वर जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथे विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र जेवडे, तालुका वकील संघ उपाध्यक्ष मोहन जाधव, शीतल काळे उपस्थित होते.
यात कबड्डी, खो-खो, 100 मीटर मुलांचे धावणे, गोळाफेक, 100 मीटर मुलींची धावणे, खो-खो या स्पर्धेत विजेता संघाला प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक, तसेच वैयक्तिक खेळाडूंना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पारितोषिक म्हणून मेरा युवा भारत अमरावती, युवा कार्यक्रम विभाग युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार ही ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धा मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूपेंद्र जेवडे यांनी आयोजित केल्या. स्पर्धेसाठी जन स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला.
00000
एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन
*12 हजारहून अधिक उमेदवार देणार परीक्षा
अमरावती, दि. 31 (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 येत्या रविवारी, 4 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी प्रशासनाने तयारी केली आहे.
ही परीक्षा रविवार, दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या एकाच सत्रात पार पडेल. अमरावती शहरामध्ये परीक्षेसाठी एकूण 41 परीक्षा उपकेंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी एकूण 12 हजार 864 उमेदवार प्रविष्ट होणार आहेत. परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 1 हजार 250 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले असून उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment