उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन
अमरावती, दि. 18 (जिमाका) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर अंजनगाव सुर्जी येथील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.
00000
शुक्रवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर
आयएएस आकाश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांचे मार्गदर्शन
अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्हा प्रशासन अमरावती यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर क्र. 3' चे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर शुक्रवार, दि. 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात पार पडणार आहे.
मार्गदर्शन शिबिरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 20 वा क्रमांक पटकावणारे आयएएस अधिकारी आकाश वर्मा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात 8 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सदर शिबीर सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. या शिबिरात यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन आणि यशाची सूत्रे यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
00000
राज्यस्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून देणार
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करतात. नैसर्गिक क्रीडा कौशल्य असूनही अत्याधुनिक साहित्याअभावी खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमी पडतात. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील नाविण्यपूर्ण योजनेतून किमान 10 ते 15 आंतरराष्ट्रीय खेळाडूंना 50 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर दिली.
राज्यस्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथील आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंजवर दि. 17 ते 20 डिसेंबर 2025 या दरम्यान होत आहे. आज या स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, अनिल इंगळे, आदी उपस्थित होते.
श्री. येरेकर यांनी, प्रतिभा असलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय आणि ऑलिंपिक स्पर्धेकरीता आवश्यक असलेले साहित्य उपलबध झाल्यास जिल्ह्यातील खेळाडू यात सहभागी होण्यास मदत होईल. खेळाडूंनी सकारात्मक विचार करुन जीवनामध्ये यशाचे शिखर गाठावे, असे आवाहन केले. तसेच स्पर्धेचे रितसर उद्घाटन केले.
राज्यस्तरीय 17 व 19 वर्ष मुले आणि मुली शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेत सन 2025-26 मध्ये राज्यातील 8 ही विभाग आणि एका क्रीडा प्रबोधिनीतील 485 मुले व मुली खेळाडू, पंच, सामनाधिकारी, निवड समिती सदस्य व संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या राज्यस्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेचे मुले व मुली या वयोगटातील सर्व सामने जिल्हा क्रीडा संकुलातील खेलो इंडिया आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंजवर सुरु झाले आहे. दि. 18 डिसेंबर 2025 रोजी धनुर्विद्या प्रकारामधील इंडियन राऊंडची स्पर्धा झाली. दि. 19 डिसेंबर 2025 रोजी कंपाऊंड राऊंड, दि. 20 डिसेंबर 2025 रोजी रिकर्व्ह राऊंडचे सामने होणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमात सुरवातीला जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहन व क्रीडा ज्योत प्रज्वलन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी आभार मानले.
000000
अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा
अमरावती , दि. 18 ( जिमाका ) : अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव व्हावी, त्यांना याबाबत माहिती मिळावी यासाठी दरवर्षी 18 डिसेंबर रोजी 'अल्पसंख्याक दिवस ' साजरा करण्यात येतो. अल्पसंख्यांक हक्क दिवसाचे औचित्य साधून आज नियोजन भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नगर प्रशासन सहाय्यक आयुक्त विकास खंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, कौशल्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, योजना शिक्षणाधिकारी राजेश वरखडे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी इम्रान खान, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गायकवाड, पोलीस उपअधीक्षक राजेश भोयर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत अल्पसंख्यांकांसाठी शासनाने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांना व्हावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
सहाय्यक आयुक्त श्री. खंडारे यांनी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत विविध योजना उपक्रम राबविले जातात. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा , असे आवाहन केले. अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काची जाणीव व्हावी यासाठी हा दिवस साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती भाकरे यांनी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असणाऱ्या योजना, विविध उपक्रम, शिष्यवृत्ती याबाबत माहिती दिली. सहाय्यक आयुक्त श्रीमती बारस्कर यांनी कौशल्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्लेसमेंट ड्राईव्ह याबाबत माहिती दिली. यावेळी शिक्षकवृंद, विद्यार्थी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुरेंद्र रामेकर यांनी मानले.
0000000
ध्वजनिधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा
येत्या मंगळवारी
अमरावती, दि. 18 (जिमाका): सर्व माजी सैनिकांना, वीर पत्नींना कळविण्यात येते की, मंगळवार, दि. 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजनिधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा संपन्न होत आहे. तरी सर्व माजी सैनिक, वीर पत्नी यांनी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
000000
अमरावती मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथे
माजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती
अमरावती, दि. 18 (जिमाका): मेस्को क्षेत्रीय कार्यालय, सैनिकी मुलांचे वसतिगृह नवसारी, अमरावती येथे भारतीय संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी 'लिपिक नि टंकलेखक' या पदाच्या एकूण दोन जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी सशस्त्र सेना दलातील निवृत्त जेसीओ, ओआर, वीर पत्नी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय 57 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. शैक्षणिक पात्रतेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान, एम.एस. ऑफिस, अकाऊंटिंग आणि मराठी व इंग्रजी टायपिंगचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.लष्करी सेवेत कार्यालयीन अधीक्षक किंवा मुख्य लिपिक पदाचा अनुभव असलेल्यांना निवडीत प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवाराची वैद्यकीय श्रेणी शक्यतो 'शार्प-1' असावी.
निवड झालेल्या उमेदवारास दरमहा तीस हजार रुपये मानधन दिले जाईल. इच्छुकांनी आपले अर्ज 5 जानेवारी 2026 पर्यंत ro-amravati@mescoltd.co.in या ई-मेलवर किंवा 'क्षेत्रीय कार्यालय अमरावती, सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी, अमरावती-४४४६०४' या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्रंमाक-0271-2952040, मोबाईल नंबर- 9373164962 तसेच ७४९५०९७९५८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment