Monday, April 7, 2025

DIO NEWS AMRAVATI 07-04-2025

 कृषी पुरस्कार: 31 मेपर्यंत प्रस्ताव मागविले

अमरावती, दि. 7 (जिमाका): कृषी विभागामार्फत कृषी व कृषीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था यांना विविध पुरस्कारने  दरवर्षी गौरविण्यात येते. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 आहे. सन 2024 या वर्षासाठी जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी आणि कृषी संलग्न क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, गट आणि संस्थांसाठी विविध पुरस्कारांसाठी इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी आपले प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

विविध पुरस्कार आणि त्यांचे स्वरूप:

खालील प्रमुख पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत:

  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार: रोख ३ लाख  रूपये , स्मृती चिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार
  • वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय) पुरस्कार: रोख 2 लाख  रूपये, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार
  • वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार:  रोख 1 लाख 20 हजार रूपये,  स्मृती  चिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार
  • उद्यान पंडित पुरस्कार: रोख 2 लाख  रूपये,  स्मृती चिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार.
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (सर्वसाधारण व आदिवासी गट): रोख  44 हजार रूपये,  स्मृती चिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार
  • युवा शेतकरी पुरस्कार (वयोमर्यादा कमाल 40 वर्षे): :  रोख 1 लाख 20 हजार रूपये,  स्मृती चिन्ह, सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार.

पात्रता निकष:

या पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती, गट किंवा संस्था कृषी क्षेत्रात, ज्यात शेती, फळबाग आणि कृषी संलग्न क्षेत्रांचा समावेश आहे, तसेच प्रसार माध्यमे किंवा संघटनात्मक कार्यात कार्यरत असाव्यात. अर्जदाराच्या स्वतःच्या नावावर शेती असणे आणि शेती हा त्यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय असणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम केलेले आणि अधिक नफा मिळवणारे शेतकरी यासाठी पात्र असतील. कृषी पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल. महत्त्वाचे म्हणजे, अर्जदार शासकीय, निमशासकीय किंवा सेवानिवृत्त अधिकारी नसावा. सेंद्रिय शेतीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सेंद्रिय मालाचे पीजीएस प्रमाणीकरण असणे अनिवार्य आहे.

आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया:

अर्जदारांना त्यांच्या प्रस्तावासोबत अद्ययावत सातबारा (7/12) आणि आठ अ (8अ) सादर करणे आवश्यक आहे. तसेच, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा सन 2024 चा चारित्र्य पडताळणी अहवाल प्रस्तावासोबत जोडणे अनिवार्य आहे. इच्छुक अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज पुराव्यासह सादर करणे आवश्यक आहे. अर्ज तीन प्रतींमध्ये संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. अर्जदार अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

या पुरस्कारांविषयी अधिक माहितीसाठी इच्छुक अर्जदार त्यांच्या संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

000000

-भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु;

30 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

 

             अमरावती, दि. 07 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत रब्बी पणन हंगाम 2024-25 मध्ये भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी तालुकास्तरावर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी बांधवांसाठी ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरु करण्यात आले असून दि. 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक एस. आर.

महाजन यांनी केले आहे.

मका व ज्वारी खरेदीसाठी खरेदी केंद्र सुरू

        धारणी तालुक्यामध्ये आदिवासी विकास महामंडळ मार्फत बैरागड, सावलीखेडा, हरीसाल, धारणी  तर चिखलदरा तालुक्यामध्ये आदिवासी विकास महामंडळ मार्फत चुरणी, आणि गौलखेडा बाजार येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे.

                 आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी व्यवस्थापन प्रशासन, विपणन प्रादेशिक व्यवस्थापक धारणी कार्यालयामार्फत तालुक्यात धारणीमध्ये आदिवासी विकास महामंडळामार्फत बैरागड - केंद्र प्रमुख आर. आर. पवार, मो. नं. (8999210859), सावलीखेडा -केंद्र प्रमुख आर. सी. सोनोने, मो. नं. (9423770755),  हरीसाल केंद्र प्रमुख श्रीमती आर. के. भगत, मो. नं. (7350895832),  धारणी- केंद्र प्रमुख श्रीमती ए. डी. चोरे, मो. नं. (8888010844), चिखलदरा तालुकामध्ये आदिवासी विकास महामंडळ मार्फत चुरणी  केंद्र प्रमुख श्रीमती व्हि. पी. निंघोट, मो. नं. (7350342181), गौलखेडा -बाजार केंद्र प्रमुख श्रीमती पि. एस. सिरस्कर, मो. नं. (7038800697) या सहा गावात खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत. वरील ठिकाणी शेतकऱ्यांनी नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...