Thursday, April 17, 2025

DIO NEWS AMRAVATI 17-04-2025

 


अक्षय तृतीयेला बालविवाह केल्यास होणार कठोर कारवाई

*जिल्हा प्रशासनाचा इशारा

अमरावती, दि. 17 : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बालविवाह करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. बालविवाह करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, तसेच बालवधूचे स्वागत करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मागील सहा वर्षात प्रशासनाने 3 हजार 954 बालविवाह रोखले आहेत. गेल्या वर्षभरात महिला व बालविकास विभागाने 18 बालविवाह थांबवले आहेत. यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 16 (1) नुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.   

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. बालविवाह रोखण्यासाठी गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम, बैठका, रॅली आणि माहितीपत्रके वाटप करण्यात येत आहे.  बालविवाहात सहभागी होणारे धार्मिक गुरु, पंडित, सेवा देणारे, मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन्स मालक आणि वाजंत्री यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अमरावती जिल्हा 3 जानेवारी 2023 पासून बालविवाह मुक्त घोषित करण्यात आला आहे.  नागरिकांनी बालविवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०९८ किंवा ११२ यावर माहिती द्यावी, नागरिकांनी सतर्क राहून बालविवाह रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा २१ एप्रिल रोजी

अमरावती, दि. १७ (जिमाका): शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोर्शी रोड, अमरावती येथील एनएसएस सभागृह येथे दिनांक २१ एप्रिल, २०२५ रोजी सकाळी १० वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुणे येथील नामांकित कंपनी जेबील इंडिया प्रा. लि. तसेच अमरावती जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या भरती मेळाव्यामध्ये आयटीआयमधील फिटर, वायरमन, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, इलेक्ट्रॉनिक्स, सुइंग टेक्नॉलाजी, ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलाजी, कोपा, ट्रॅक्टर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक आणि मोटर मेकॅनिक यांसारख्या विविध व्यवसायांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. यासोबतच, दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारही या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. जास्तीत -जास्त पात्र उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आणि सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे.

इच्छुक प्रशिक्षणार्थींनी या मेळाव्यात सहभागी होताना स्वतःचा बायोडाटा आणि आवश्यक मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे.

      ***

 

अमरावती शहरात वाहतूक बदल; बडनेऱ्याकडे जाणारा

मार्ग महिनाभर बंद

अमरावती, दि. १७ (जिमाका): अमरावती शहर आणि बडनेरा शहराला जोडणाऱ्या जुन्या बायपास मार्गावरील रेल्वे गेटजवळ रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आजपासून पुढील एक महिन्यासाठी या मार्गावर वाहतुकीसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त (मुख्यालय) कल्पना बारवकर यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

बगीया टी पॉइंट ते अलमास गेट (बडनेरा) या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना १७ एप्रिल ते १७ मे २०२५ पर्यंत प्रवेश बंद राहील.

 

पर्यायी मार्ग:

* यवतमाळकडून येणारी जड वाहने: यवतमाळ वाय पॉइंट मार्गे अकोला वाय पॉइंट - कोंडेश्वर टी पॉइंट -बगीया टी पॉइंट किंवा राममेघे कॉलेज चौक - बगीया टी पॉइंट या मार्गाचा वापर करू शकतील.

 * हलकी प्रवासी वाहने (चारचाकी व दुचाकी):

 * अलमास गेट - नेमाणी गोडाऊन मार्गे अमरावती शहरात प्रवेश करू शकतील.

   * बगीया टी पॉइंट - द प्राईम पार्क - एमआयडीसी रोड मार्गे अमरावती शहरात ये-जा करता येईल.

अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटर वाहन कायदा १९८८ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल . नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

000000

योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक योजनेत सहभागी व्हावे

*कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

अमरावती, दि. 17 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक प्रकल्पात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.   

ॲग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एग्रीकल्चर) योजनेंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. यातून शेतकऱ्यांसाठी खास ओळखपत्र तयार करण्यात येत आहे. या योजनेमुळे राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर वाढून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद आणि प्रभावीपणे देणे शक्य होणार आहे.   

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता मिळवण्यासाठी हे ओळखपत्र आवश्यक आहे. जिल्ह्यात या योजनांचा लाभ घेण्यासाठी 2 लाख 71 हजार 762 शेतकरी पात्र आहेत. यापैकी 2 लाख 11 हजार 952 शेतकऱ्यांनी आपले ओळखपत्र तयार केले आहेत. उर्वरीत 59 हजार 810 शेतकऱ्यांनी ओळखपत्र तातडीने तयार करावे, यासाठी शेतकऱ्यांनी सीएससी केंद्र किंवा तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पुढील हप्ते मिळवण्यासाठी 30 एप्रिलपूर्वी ओळखपत्र तयार करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

000000

अनधिकृत बाल संस्थांची नागरिकांनी माहिती द्यावी

*महिला, बालविकास विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 17 : नागरिकांनी त्यांच्या परिसरामध्ये अनधिकृत बाल संस्था कार्यरत असल्यास महिला व बाल विकास विभागास कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे काही बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे आणि अनाथाश्रम चालवले जात असल्याच्या समोर आले आहेत. या संस्थांमध्ये बालकांना डांबून ठेवले जात असून त्यांचे शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सदर बाब ही बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे. या कायद्यानुसार, मान्यता तसेच नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या संस्था चालवल्यास, चालवणाऱ्या व्यक्तीस एक वर्षाचा कारावास आणि एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक दंड होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर, आपल्या परिसरात अनधिकृत संस्था आढळल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किंवा चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधून बालकांवरील अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना अर्जुन गुंडे यांनी केले आहे.

00000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...