Friday, April 11, 2025

DIO NEWS AMRAVATI 11-04-2025















 अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला निधीची कमतरता भासू देणार नाही

- क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

            अमरावती, दि.11 (जिमाका ):  राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संकुलातील विविध क्रीडा सुविधांची पाहणी करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन दिले.

            श्री. भरणे यांनी संकुलातील खेलो इंडिया आर्चरी सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्क्वॅश कोर्ट, ज्युदो, कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटन बहुउद्देशीय हॉल, जिम, कार्यालय आणि बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या क्रीडा वसतिगृहाच्या कामाची पाहणी केली.यावेळी मंत्री श्री.भरणे यांनी संकुलातील सुविधांवर समाधान व्यक्त केले.

            अमरावती जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करता येतील, अशा प्रकारच्या विविध क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या जातील. या संकुलातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  अमरावती विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी आर. व्ही. वडते, क्रीडा कार्यकारी अधिकारी ममता कोळमकर आदि उपस्थित होते.

हव्याप्र महाविद्यालयाच्या दीक्षांत समारोह कार्यक्रमाला उपस्थिती

            श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामार्फत चालविले जाणारे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन बहुसंकाय  स्वायत्त महाविद्यालयाचा 11 व्या दीक्षांत समारोह कार्यक्रमाला  क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

             अनंत क्रीडा जिम्नॅस्टिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, प्राचार्य श्रीनिवास देशपांडे आदी   उपस्थित होते.

श्री. भरणे यांनी विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  क्रीडा क्षेत्रात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्य तळमळीने आणि अव्याहतपणे सुरू आहे. हव्याप्रला क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक सर्वतोपरी मदत शासनामार्फत करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी यावेळी संस्थेची कारकीर्द सांगितली. श्री. असनारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशांत देशपांडे यांनी संस्थेची माहिती दिली.

00000

रविवारी जय भीम पदयात्रेचे आयोजन

अमरावती, दि. 11 (जिमाका): केंद्रीय श्रम व रोजगार, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त रविवार, दि. 13 एप्रिल रोजी जय भीम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

पदयात्रेची सुरुवात सकाळी 7 वाजता विभागीय क्रीडा संकुल, नेहरू स्टेडियम येथून होईल. पदयात्रा स्टेडियम, शिवाजी बहुउद्देशीय शाळा, वीर माता दुर्गावती चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, दयासागर हॉस्पिटल, इर्वीन चौक मार्गे निघणार आहे. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रेचा विभागीय क्रीडा संकुलात समारोप करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासन, शैक्षणिक संस्था, मंडळे, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र, महानगरपालिका, भारत स्काउट गाइड आणि शासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग, शिक्षणाधिकारी, उच्च शिक्षण विभाग, पोलिस विभाग यांच्या पदयात्रेत सहभाग राहणार आहे. या पदयात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000




जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

         अमरावती दि. 11 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी इब्राहिम शेख, जिल्हा सुचना अधिकारी मनिष फुलझुले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

00000

मासोदमध्ये आरोग्य स्थिती नियंत्रणात

अमरावती, दि. 11 (जिमाका): जिल्ह्यातील मासोद येथे दि 7 एप्रिल रोजी दूषित पाण्यामुळे रोगाची लागण झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बाधितांच्या घराशेजारील आणि मुख्य पाण्याच्या स्रोताचे जैविक नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे मासोदमधील आरोग्य स्थिती नियंत्रणात आली आहे.

मासोद गावातील एकूण 202 घरे आणि 925 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. बाधितांवर चांदूरबाजार येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील 10 रुग्णांपैकी 6 जणांना उलट्या आणि जुलाब, तर 4 जणांना कोणतेही लक्षण नसताना दाखल करण्यात आले. रूग्णांनी दि. 7 एप्रिलच्या संध्याकाळी रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध घरी जाण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर गावात 8 एप्रिलपर्यंत उलट्या किंवा जुलाबाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. प्रशासनाने विलगीकरण कक्ष स्थापन करून आवश्यक औषधसाठा उपलब्ध केला आहे. गावात नियमित सर्वेक्षण सुरू असून वैद्यकीय कर्मचारी सतत कार्यरत आहेत. बहुउद्देशीय पुरुष कर्मचाऱ्यांमार्फत वितरित होणाऱ्या टँकरमधील पाण्याची तपासणी केली जात असून पाणी पिण्यासाठी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावरच जलसाठा उपलब्ध केला जात आहे.  

बाधित व्यक्तींच्या घरी आरोग्य कर्मचारी नियमित भेट देत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गावात दवंडीच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती केली जात आहे. सध्या गावाची परिस्थिती नियंत्रणात असून एकही रुग्ण नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी कळविले आहे.

00000

 

 



अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 3 रेल्वे स्थानकांचा कायापालट

- रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांची माहिती

    अमरावती, दि. 11 : भारतीय रेल्वेच्या 'अमृत भारत स्टेशन' योजनेंतर्गत राज्यातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच बडनेरा रेल्वे स्थानकाला 36.3 कोटी आणि धामणगाव रेल्वे स्टेशनला 18 कोटी रुपयांचा निधी दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासाठी देण्यात येणार आहे.


    या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.


    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांचे आभार मानले.


    या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे अमरावती आणि ग्रामीण 
भागातील स्थानकांमध्ये बडनेरा आणि धामणगाव रेल्वे यांना स्थान देण्यात आले आहे.


    या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.


    या पुनर्विकासात स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे. बडनेरा (36.3 कोटी), धामणगाव स्टेशन (18 कोटी) निधी देण्यात येणार आहे


000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...