Thursday, April 24, 2025

DIO NEWS AMRAVATI 24-04-2025

 

महाराष्ट्र दिन शहर परेड मैदानावर साजरा होणार

अमरावती, दि. 24 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिवस 1 मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त साजरा होणारा मुख्य शासकीय कार्यक्रम जवाहरलाल नेहरू स्टेडीयमऐवजी पोलिस मुख्यालयाच्या शहर परेड मैदानावर सकाळी 8 वाजता होणार आहे.

महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस मुख्यालय, अमरावती शहर परेड मैदान येथे होणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येत होता. मात्र स्टेडियमवर 400 मीटर रनिंग ट्रॅकचे काम सुरू असल्याने कार्यक्रमाच्या स्थळात बदल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्टेडीयम कार्यक्रमासाठी योग्य नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस पोलिस मुख्यालयाच्या परेड मैदानावर होणार आहे.

000000



सहसंचालक प्रदीप घुले यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान

अमरावती, दि. 21 (जिमाका) : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना 'उत्कृष्ट आयटीआय, रोजगार मेळावे, संवाद फोरम' उपक्रमासाठी 10 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा 2024-25 या वर्षातील राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त प्रस्तावामधून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, क्षेत्रीय कार्यालयाच्या उपक्रमांची प्रथम पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पारितोषिक विजेत्यांना मिळालेली रकम कार्यालयाची सुधारणा किंवा स्पर्धेत पाठवलेल्या प्रस्तावाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी करावी लागणार आहे.

000000

अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

*जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

अमरावती, दि. 24 : अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावे, बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा गॉगल वापरावे, मद्य, चहा, कॉफी आणि शीतपेये पिणे टाळावे, शिळे अन्न खाऊ नये, उन्हात काम करताना चेहरा आणि डोके ओल्या कपड्याने झाकावे, शक्यतो, दुपारी 12 ते 3 या वेळेत जास्त शारीरिक श्रम करणे टाळावे, चक्कर आल्यास किंवा अस्वस्थ वाटल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटावे, ओआरएस आणि लस्सी, ताक, लिंबू पाणी यासारखी पेये प्यावे, प्राण्यांना सावलीत ठेवावे आणि त्यांना भरपूर पाणी द्यावे.

त्याचप्रमाणे दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे टाळावे, गडद रंगाचे जाड कपडे घालू नये, तापमान जास्त असल्यास जास्त शारीरिक श्रमाची कामे करू नये, तसेच उष्माघात झालेल्या व्यक्तीची काळजी घेताना उष्माघात झालेल्या व्यक्तीला थंड ठिकाणी घेऊन जावे, त्याच्या शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावे, शरीर थंड पाण्याने पुसावे, ओआरएस आणि लस्सी, ताक, लिंबू पाणी यासारखी पेये द्यावे, तातडीने आरोग्य केंद्रात घेऊन जावे.

उष्माघात हा जीवघेणा ठरू शकत असल्यामुळे तातडीने उपचार सुरु करणे आवश्यक आहे, तसेच उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

कश्मिरमधील 64 प्रवासी सुरक्षित

अमरावती, दि. 24 : पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती कक्षातर्फे आतापर्यंत 64 नागरिकांशी संपर्क करण्यात आला आहे. हे सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत.

जिल्हा आपत्ती कक्षातर्फे कालपर्यंत 47 आणि आज 17 नागरिकांशी संपर्क साधण्यात आला आहे. याबाबतची माहिती मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, नियंत्रण कक्ष येथे पाठविण्यात आली आहे. सर्व प्रवाशी श्रीनगर येथे सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा आपत्ती कक्षाने दिली आहे.

000000

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा दौरा

अमरावती, दि. 9 (जिमाका) : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे शनिवार, दि. 26 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौऱ्यानुसार, शनिवार, दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 12.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंजाबराव देशमुख मेडीकल, कॉलेज, पंचवटी चौक येथे सभापतीपदी निवड झाल्याबद्दल आयोजित नागरी सत्कार साहेळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार अमरावती येथून शासकीय वाहनाने प्रयाण करतील.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...