Monday, April 21, 2025

DIO NEWS AMRAVATI 21-04-2025

 




जिल्हा क्रीडा कार्यालयात माहिती अधिकाराबाबत व्याख्यान

अमरावती, दि. 21 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमात माहिती अधिकाराबाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी. गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी व प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, तालुका क्रीडा अधिकारी संजय पांडे, संतोष विघ्ने, श्रीमती बांते, श्रीमती इंगळे, क्रीडा अधिकारी आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक स्वप्नील चांदेकर, राहुल निवडुंगे, रितेश अंतनवार, प्रफुल्ल डांगे आदी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयतर्फे नागरिकांना माहिती अधिकार अंतर्गत सुलभ माहिती देण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन केले, व्याख्यानात १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार वरिष्ठ अधिकारी आणि नवनियुक्त अधिकारी-कर्मचारी यांच्याकरिता माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींची माहिती देण्यात आली. कायदा, शासन निर्णय आणि परिपत्रकांचा अभ्यास करून सकारात्मक दृष्टीने माहिती पुरवण्यासाठी जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकारी, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी दक्ष रहावे, असे आवाहन माहिती अधिकार कायद्याचे राष्ट्रीय प्रशिक्षक तथा ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. राजेंद्र पांडे यांनी केले.

00000

--


अमरावती पोलीस आयुक्तालयाचा प्रतिबंधात्मक आदेश जारी

अमरावती, दि. 21 : शहरात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37 (1) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. हा आदेश दि. 1 मेपर्यंत अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू राहील.

या आदेशानुसार, शस्त्रे, लाठ्या, तलवारी किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरली जाऊ शकतील अशा कोणत्याही वस्तू बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा ती फेकण्याची उपकरणे बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन जाणे, व्यक्तींच्या किंवा मृतदेहांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे, गाणी गाणे किंवा वाद्य वाजवणे, असभ्य हावभाव करणे किंवा सभ्यता आणि नीतिमत्तेविरुद्ध तसेच राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतील अशा चित्र, चिन्हे, फलक किंवा इतर वस्तू तयार करणे, प्रदर्शित करणे किंवा प्रसारित करणे, यासाठी मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

00000

जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयात रक्तदान शिबिर

अमरावती, दि. 21 : जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था कार्यालयात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले. यात दि. 16 एप्रिल रोजी रक्तदान शिबिर घेऊन वृक्षारोपण करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमाला विभागीय सहनिबंधक एस. पी. रोडगे, विशेष लेखा परिक्षक एस. एस. पांडे, जिल्हा विशेष लेख परिक्षक जे. आर. गवळे उपस्थित होते. रक्तदान शिबीरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल खराटे, मिलींद तायडे, संगिता गायधने, जयवंत गायधने, प्रवीण कळसकर यांनी सहकार्य केले. यात 30 जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरानंतर वृक्षारोपण करण्यात आले. सहभागी नागरिकांनी कार्यालयाच्या परिसरात वृक्षांची लागवड केली. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

00000

शुक्रवारपासून ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबीर

अमरावती, दि. 21 : जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 25 एप्रिल ते दि. 8 मे कालावधीत जिल्हा क्रीडा संकुलासह विविध ठिकाणी होणार आहे.

या प्रशिक्षण शिबिरात धनुर्विद्या, व्हॉलीबॉल, सॉफ्टबॉल, बॅडमिंटन, तलवारबाजी, बास्केटबॉल, स्क्वॅश, नेटबॉल, शुटींगबॉल, मल्लखांब, टेबल टेनिस, थ्रोबॉल, स्केटींग, कुडो, बॉक्सिंग या 14 प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण अनुभवी प्रशिक्षकांद्वारे दिले जाणार आहे. खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

शिबिरात शारीरिक तंदुरुस्ती, खेळाचे तंत्र आणि कौशल्ये, तसेच खेळाडूंचा सर्वांगीण विकास यावर लक्ष केंद्रित केले जाईल. इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी प्रफुल्ल डांगे 9923008411, राहुल निवडंगे 7774001579, स्वप्नील चांदेकर 9767000949, रितेश अनंतवार 8669084142 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी

*कृषि विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 21 : खरीप हंगामात जिल्ह्यात 2 लाख 49 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणी प्रस्तावित आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी फक्त केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बीजी-1 व बीजी-2 या वाणाची लागवड करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

शासनाची मान्यता नसलेल्या इतर कोणत्याही प्रकारच्या कापूस बियाणेची खरेदी कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून करु नये. शासनमान्यता नसलेल्या एचटीबीटी किंवा कोणत्याही प्रकारच्या बियाणांची खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊन पर्यावरणाचे नुकसान करणारे ठरू शकत असल्याने पर्यावरण कायद्यांतर्गत अशा बियाण्यांचा वापर हा कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आला आहे. त्यासाठी 5 वर्षे कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची तरतूद आहे.

विक्रेते शेतकऱ्यांना घरपोच आपल्या परिसरात प्रचलीत वाणांच्या नावाचा वापर करुन तणनाशक (राउंडअप बीटी), चोर बोटी, बीडगार्ड, एचटीबीटी या नावाखाली विनापावती बियाणे विक्री करतात. परंतु शासनाने बीजी-1 आणि बीजी-2 सोडून अशा प्रकारच्या कोणत्याही जनुकीय तंत्रज्ञानाला (बीजी-3) ला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बोगस व बेकायदेशीर बियाणे विक्री अथवा लागवड करताना आढळून आल्यास कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, पंचायत समिती, तालुका कृषि अधिकारी व उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयास कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बिटी कापुस बियाणे खरेदी करताना कापूस बियाणांची खरेदी अधिकृत बियाणे परवानाधारक यांचेकडून करावी, बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, बिलात पिक, वाण लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत आणि कंपनीचे पुर्ण नाव नमूद असल्याची खात्री करावी. कृषि केंद्रधारक पक्के बिल संपुर्ण विवरणासह देत नसल्यास तालुका कृषि अधिकारी व कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. कापूस बियाणे पाकीटावरील सरकार मान्य चिन्ह तपासून घ्यावे. बोलगार्ड 2 मध्ये उपलब्ध असलेल्या बिजी-2 वाणाची किंमत 901 रूपये आहे.

बियाणे पाकीट सिलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करुन बियाणे खरेदी करावी, बियाणांच्या उगवणीची खात्रीसाठी पाकीटावरील अंतिम मुदत तपासावी. बिजी-2 तंत्रज्ञान सर्व वाणांमध्ये सारखेच असते, त्यामुळे एका विशिष्ट वाणाची मागणी टाळावी. कापूस पिकाची लागवड जून महिन्यात 100 मीमी पाऊस झाल्याशिवाय करु नये. पूर्व हंगामी कापूस लागवड पुर्णतः टाळावी

मान्यता नसलेले बोगस व बेकायदेशीर बियाणे विविध नावाने विक्री केली जाण्याची शक्यता आहे. असे बियाणे अधिकृत नसून अशा बियाण्याची उत्पादन व विक्री करण्याला शासनाची मान्यता नाही. हे बियाणे ज्यादा दराने विक्री करून त्याची पावती दिली जात नाही. मान्यता नसलेल्या बोगस व बेकायदेशीर बियाणांच्या पाकीटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली आहे, याचा उल्लेख नसतो व पाकीटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण दिलेले नसते, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते कळविले आहे.

00000



जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना

प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्या हस्ते गौरव

*'मिशन-28' उपक्रमाची राज्यस्तरावर दखल

अमरावती, दि. 21 (जिमाका) : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा 2024-25मध्ये राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम गटातून 'मिशन-28' उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना मुंबई येथे करण्यात आले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाने मेळघाटच्या दुर्गम भागातील माता आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 'मिशन-28' हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला. याच उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य सरकारने पुरस्कार दिला आहे. या पुरस्कारासोबत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना 30 हजार रुपयांचा धनादेशही प्रदान करण्यात आला.

विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त प्रस्तावामधून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, क्षेत्रीय कार्यालय, अमरावती यांच्या 'उत्कृष्ट आयटीआय, रोजगार मेळावे, संवाद फोरम' या प्रभावी उपक्रमासाठी 10 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्पर्धेत राज्यभरातून शासकीय विभाग, कार्यालये आणि अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट प्रशासकीय कार्य आणि उपक्रम सादर केले. राज्यस्तरीय निवड समितीने प्रस्तावांचे मूल्यांकन करून पारितोषिकांसाठी विजेत्यांची निवड केली आहे. पारितोषिक विजेत्यांना मिळालेली रकम कार्यालयाची सुधारणा किंवा स्पर्धेत पाठवलेल्या प्रस्तावाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी करावी लागणार आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...