हिंद दी चादर कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवा
*मान्यवरांचे आवाहन
अमरावती, दि. 1 (जिमाका) : हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नागपूर येथे 7 डिसेंबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
जिल्हा नियोजन सभागृहात आज हिंद दी चादर कार्यक्रमानिमित्त बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, महंत जितेंद्रजी महाराज, राज्यस्तरीय समितीचे सदस्य किसन राठोड, सदाशिव चव्हाण, नंदू पवार, डॉ. निख्खू खालसा, रवींद्रसिंग सलुजा, अनिता पवार , छाया राठोड, बबीता राठोड, ॲड. नवलानी, वासुदेव महाराज, दिनेश सचदेव आदी उपस्थित होते.
जितेंद्र महाराज यांनी सर्व समाजाच्या वतीने शहिदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम एक बलिदानाची आठवण व्हावी, तसेच आपल्या संस्कृतीची जाण नव्या पिढीला व्हावी, यासाठी आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून आपली संस्कृती जपली जाणार आहे. गुरु तेग बहादुर यांनी धर्म रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यांचा त्याग पुढील काळातही माहिती होण्यास या कार्यक्रमामुळे मदत मिळणार आहे.
राज्यस्तरीय समिती सदस्य किसन राठोड यांनी कार्यक्रमामागील सरकारची भूमिका सांगितली. गुरु तेग बहादुर यांची शहादत ही संपूर्ण मानवतेसाठी होती. त्यांच्या बलिदानामुळेच देश टिकून आहे. त्यांचे स्मरण व्हावे, तसेच आपल्या समृद्ध इतिहासाची माहिती समाजाला होण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. शासनाने एक चांगला उपक्रम हाती घेतला असून राज्यभरात तीन कार्यक्रम होणार आहे. यासाठी समितीही गठीत करण्यात आली आहे. प्रचार आणि प्रसारासाठी गाव, तांड्यामध्ये चित्ररथ फिरविण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या भेटी घेण्यात येत आहे. शाळांमधून गुरु तेग बहादुर यांच्या जीवनावरील चित्रफीत दाखविण्यात येत आहे.
या सर्व माध्यमातून समाजाच्या मनाचा विकास होणे आवश्यक आहे. महान व्यक्तींचे कार्य पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांच्या कार्यामधून समाज प्रभावित होणार आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाने सेवक होऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे. शासनाने कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे देश घडविण्यासाठी नागपूर येथील कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी जिल्हास्तरावर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यंत लोकसभागातून चार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अमरावती ते नागपूर मार्गावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
डॉ. निख्खू खालसा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुरु तेग बहादुर यांच्या जीवनावरील चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच उपस्थित त्यांच्या प्रश्नांचचे निराकरण करण्यात आले.
000000
नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी भरपगारी सुट्टी
अमरावती, दि. 1 (जिमाका): आगामी नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार, मतदानाच्या दिवशी, म्हणजेच उद्या, 2 डिसेंबर 2025 रोजी, सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी किंवा कामाच्या वेळेत विशेष सवलत देणे आस्थापनांना बंधनकारक करण्यात आले आहे.
लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार, निवडणूक असलेल्या क्षेत्रातील मतदार असलेले आणि उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना (उदा. कारखाने, दुकाने, हॉटेल्स, खासगी कंपन्या, आयटी कंपन्या, मॉल्स इत्यादी) या नियमांचे पालन करतील.
विशेषतः, कामासाठी निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही ही सुट्टी मिळणार आहे.
धोकादायक किंवा लोकोपयोगी सेवांमध्ये (उदा. आपत्कालीन सेवा) पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, संबंधित कामगारांना मतदानासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक आहे.
आस्थापना मालकांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा सुट्टी न मिळाल्याच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई केली जाईल ,असे आवाहन कामगार उप आयुक्त अधीक्षक नि. रा. सरोदे यांनी केले आहे.
0000000
राष्ट्रीय लोक अदालत 13 डिसेंबर रोजी
अमरावती, दि. 1 (जिमाका) : अमरावती जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार, दि. 13 डिसेंबर 2025 रोजी 'राष्ट्रीय लोकअदालत'चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यात दाखल व 'दाखलपूर्व' अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्याकरिता ठेवण्यात येणार आहेत. या आयोजनाची विशेष बाब म्हणून त्याकरिता कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही व प्रकरणाचा अंतिम निकाल होतो.
तडजोडपात्र प्रलंबित खटले 'राष्ट्रीय लोकअदालत'मध्ये ठेवून तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच (दाखलपूर्व) प्रकरणांबाबत नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच 13 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय लोकअदालत' समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावतीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें. यार्लगड्डा तसेच सचिव डी. एस. वमने यांनी केले आहे.
000000
अपीलीय दिवाणी फौजदारी न्यायालयांना 2 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर
अमरावती, दि. 1 (जिमाका) : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक 2025 साठी जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चांदुर रेल्वे, दर्यापुर, धामणगाव रेल्वे, धारणी, मोर्शी, नांदगावखंडेश्वर तसेच वरूड येथील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुक उदया मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता जिल्ह्यातील सर्व न्यायालये तसेच तालुक्याच्या ठिकाणच्या अपीलीय दिवाणी फौजदारी न्यायालयांना मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
00000
राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी जाहीर
अमरावती, दि. 1 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना मानधन योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेसाठी जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 579 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हा निवड समितीमार्फत त्यापैकी एकूण 77 लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे.
त्यापैकी जिल्हा परिषद व महानगरपालिका क्षेत्रातील 57 लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नगरपालिका क्षेत्रातील 20 लाभार्थ्यांची यादी आचारसंहितेनंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हास्तरीय निवड समितीचे सदस्य सचिव यांनी दिली आहे .
000000