Saturday, September 19, 2020

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी 100 खाटांची अतिरिक्त सुविधा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 







कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी 100 खाटांची अतिरिक्त सुविधा

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा कोविड रूग्णालयासाठी स्वतंत्र पर्यायी रस्ता

 

अमरावती, दि. 19 : कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता येथील आयटीआय परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रशिक्षण केंद्र व तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेत 100 खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सुपर स्पेशालिटी रूग्णालयासाठी स्वतंत्र रस्त्याचीही निर्मिती होत आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

कोरोनाबाधितांसाठी उभारण्यात येणा-या अतिरिक्त सुविधांच्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील ‘डीआरडीए’च्या प्रशिक्षण केंद्राच्या जागेची, तसेच नियोजित रस्त्याची व सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील इमारतीची पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपविभागीय अधिकारी राजपूत, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

   पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आयटीआय परिसरातील प्रशिक्षण केंद्राच्या जागेत 60 व सुपर स्पेशालिटी रूग्णालय परिसरातील इमारतीत 40 अशा एकूण 100 खाटांची अतिरिक्त रूग्णालय सुविधा निर्माण होणार आहे. महिला रूग्ण किंवा लो- रिस्क रूग्णांसाठी या स्वतंत्र व्यवस्थेचा वापर होऊ शकेल.  त्याचप्रमाणे, सुपर स्पेशालिटी रूग्णालयात स्थित जिल्हा कोविड रूग्णालयासाठी  सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतंत्र रस्ता असावा म्हणून लगतच्या आयटीआय परिसरातून रस्ताही निर्माण केला जात आहे. वेळेची तातडी लक्षात घेऊन ही कामे जलदगतीने पूर्ण करावीत, तसेच ही कामे गुणवत्तापूर्ण असावीत. सर्व अद्ययावत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिले.

 

           कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता उपचार सुविधांतही सातत्याने भर टाकण्यात येत आहे. आवश्यक तिथे ऑक्सिजनची सुविधा पुरवली जाईल. जिल्ह्यात उपचार सुविधांची कमी पडू देणार नाही. मात्र, कोरोनाच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.  कोरोनावर मात करण्यासाठी हरप्रकारचे प्रयत्न होत आहेत. मात्र, या प्रयत्नांना सगळ्यांची साथ आवश्यक आहे. त्यामुळे गांभीर्याने दक्षता पाळावी. कोरोनाला कुणीही सहजपणे घेऊ नये. या साथीवर मात करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेऊन ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहनही यावेळी पालकमंत्र्यांनी केले.  

 

            उपचारासाठी रूग्णालयाच्या अतिरिक्त सुविधेसाठी तसेच रस्त्यासाठी सुमारे ६६ लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा रस्ता स्त्री रूग्णालयाच्या जवळून जातो. त्यामुळे स्वतंत्र रस्त्याचे निर्माण केल्यामुळे कोविड रूग्णालयाकडे जाण्यासाठी स्त्री रूग्णालयाच्या रस्त्याचा वापर करण्याची गरज पडणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.  त्याचप्रमाणे, अतिरिक्त उपचार सुविधांमुळे गरजेनुसार खाटा उपलब्ध होतील. ही सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...