Friday, September 11, 2020

तंबाखूमुक्त समाजासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम

 




तंबाखूमुक्त समाजासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक

-          जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम

 

अमरावती, दि. 11 : तंबाखूमुक्त, तसेच निरामय, आरोग्यसंपन्न समाजासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांच्या समन्वयासह विविध संस्था, शासकीय, तसेच खासगी आस्थापना यांचा सक्रिय सहभाग मिळवून प्रभावी जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी आज येथे दिले.   

            तंबाखू नियंत्रण समितीची बैठक जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात डॉ. निकम यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. अन्न सुरक्षा अधिकारी राजेश यादव, पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस निरीक्षक आर. एस. टाले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, शिक्षण विभागाचे अधिकारी ए. एन. रामटेके, सलाम मुंबई फौंडेशन व विश्वरचना ग्रामीण विकास संस्थेचे विजय धर्माळे, विजय देशमुख, डॉ. रामदास देवघरे, डॉ. मंगेश गुजर, उद्धव जुकरे, पवन दारोकार आदी यावेळी उपस्थित होते.  

            जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम म्हणाले की, तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत विविध कार्यवाही होत असताना समाजात सर्वदूर विशेषत: तरूणाईपर्यंत पोहोचून तंबाखूचे दुष्परिणाम व व्यसनमुक्तीचे, निरामय आरोग्याचे महत्व मनावर बिंबवणे आवश्यक आहे. त्यानुसार पुढील काळात प्रथमत: सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी व्हावी.  तालुका स्तरावर अंमलबजावणी पथक व समिती तयार करावी. जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त जाहीर करून तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.

एप्रिल ते ऑगस्टदरम्यान 57 लाख 51 हजार रूपये किमतीचा तंबाखूजन्य पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे श्री. यादव यांनी सांगितले. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस विभागाकडून पूर्णत: सहकार्य केले जाईल, असे पोलीस निरीक्षक श्री. टाले यांनी सांगितले. शिक्षण विभाग व सलाम मुंबई फौंडेशन यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील 75 शाळांत यलो लाईन कॅम्पेन राबवून शाळेच्या प्रवेशद्वारापासून शंभऱ मीटर परिसरात पिवळ्या रंगाचा सहा इंच जाडीचा पट्टा मारून त्यावर तंबाखूमुक्त शाळा अशी नोंद करण्यात येणार असल्याचे श्री. धर्माळे यांनी सांगितले.

तंबाखूमुक्तीच्या एनटीसीपी कार्यक्रमात एप्रिल महिन्यापासून चार कार्यशाळा व 101 ठिकाणी फलक लावण्यात आल्याची माहिती डॉ. गुजर यांनी दिली.  उद्धव जुकरे यांनी सूत्रसंचालन केले.

                        000  

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...