मोझरी येथे आदिवासी विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र आणि सायन्स पार्क - ॲड. यशोमती ठाकूर

 




पालकमंत्र्यांद्वारे झूम ॲपद्वारे चर्चा

मोझरी येथे आदिवासी विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र आणि सायन्स पार्क

- ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 15 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गुरुकुंज मोझरी (ता. तिवसा) येथे आदिवासी विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र आणि विज्ञान उद्यान (सायन्स पार्क) उभारण्यात येणार आहे.  या अनुषंगाने आदिवासी विकास विभाग, त्याचप्रमाणे, प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

            गुरुकुंज मोझरी, ता. तिवसा येथील प्रशिक्षण इमारत व इतर जागा ही आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पंचायत राज व्यवस्थेतील लोकप्रतिनिधी, पेसा समन्वयक आणि बचत गट यांना प्रशिक्षण देण्याकरिता या प्रशिक्षण संस्थेचा उपयोग होणार आहे. या कामाला गती देण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी आज विभागाच्या अधिका-यांशी झूम ॲपद्वारे चर्चा केली.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आदिवासी विकास विभागाने पाच एकर जागेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांना सादर करावा. याबाबत जिल्हाधिका-यांकडून निर्णय व कार्यवाही व्हावी. त्यासाठी नियोजन विभागाकडून सक्षम प्राधिकारी यांची मान्यता घ्यावी. संस्थेला इमारती हस्तांतरित केल्यानंतर फर्निचर व इतर आवश्यक त्या सुविधा आदिवासी विकास विभागाच्या प्रशिक्षण संस्थेकडून निर्माण करण्यात येतील, असे निर्देश त्यांनी दिले.

 

मोझरी हे ठिकाण आदिवासीबहुल क्षेत्राच्या समीप असल्याने आदिवासी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींसाठी प्रशिक्षण देण्यास आदर्श ठिकाण आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामविकासाच्या संकल्पना या भागात खोलवर रुजलेल्या आहेत. त्यामुळे येथे आदिवासी विकास विभागाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे निश्चित केले आहे. त्याशिवाय ग्रामविकासाच्या संकल्पना राबविताना त्याला शास्त्रीय दृष्टीकोनाची जोड असावी या हेतूने येथे विज्ञान उद्यान (सायन्स पार्क) उभारण्यात येणार आहे.  

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती