Monday, September 21, 2020

वैद्यकीय यंत्रणेसमोरील सर्व प्रश्न प्राधान्याने व तत्काळ सोडवू। - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांची डॉक्टरांशी चर्चा

 वैद्यकीय यंत्रणेसमोरील सर्व प्रश्न प्राधान्याने व तत्काळ सोडवू।   -  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


        कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी आरोग्य सुविधांत सातत्याने भर टाकण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत अखंडित रूग्णसेवेसाठी डॉक्टरांकडून अमूल्य योगदान मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने यापुढेही वैद्यकीय सुविधांत भर घालण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे. उपचारांबाबत खासगी वैद्यकीय यंत्रणेपुढील सर्व प्रश्न प्राधान्याने व तत्काळ सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

       कोरोनाबाधितांवरील उपचार व आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने रुग्णालयचालक, तसेच डॉक्टरांची बैठक बचतभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर, सचिव डॉ. आशिष साबू, डॉ. सोहेल बारी, डॉ. बख्तार, सौरभ मालाणी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

         पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, या कठीण काळात डॉक्टर मंडळी रुग्णसेवेसाठी अमूल्य योगदान देत आहेत. परिस्थिती गंभीर आहे. मात्र, आपणा सर्वांच्या सहकार्याने एकजुटीने त्यावर मात करू. ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर इंजेक्शन यांचा पुरेसा पुरवठा, पॅरामेडिकल स्टाफ व इतर मनुष्यबळ उपलब्ध होण्याबाबत सर्वप्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा नियोजनातून पाचशे ऑक्सिजन सिलेंडरबाबत निधीची तरतूद केली आहे. त्याचा बफर स्टॉकही करण्यात येईल. लक्षणे नसलेल्या रूग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देण्यात येत आहे. त्याशिवाय, शासकीय व खासगी रूग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. जोखमीच्या रुग्णांवर उपचारासाठी आयसीयू सुविधा वाढविण्यात येत  असल्याचेही त्यांनी सांगितले.

   खाटा उपलब्धतेबाबत माहिती

         पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, शासकीय सर्व खासगी रूग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांच्या उपलब्धतेबाबत नागरिकांना अद्ययावत माहिती मिळावी यासाठी डॉक्टर मंडळींनी संपर्क क्रमांक, उपलब्ध खाटांची माहिती द्यावी जेणेकरून गरजू रूग्णांपर्यंत ती माहिती पोहोचेल व तत्काळ उपचारासाठी दाखल होऊ शकेल. याबाबत प्रशासनाकडून प्रसिद्धीची कार्यवाही केली जाईल.

         कोरोना उपचारांबाबत शासनाने निश्चित केलेले दर, नियम यांचे काटेकोर पालन व्हावे. हा नफा कमविण्याचा काळ नाही. आर्थिक स्थिती सगळीकडे गंभीर आहे. त्यामुळे निश्चित दर, सर्व नियम यांचे पालन व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

          पॅरामेडिकल स्टाफ व इतर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत रोजगार नोंदणी कार्यालयाकडून पात्र उमेदवारांची माहिती मिळवून कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले. टेलिमेडिसिन सेवांबाबतही प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा सामान्य रूग्णालय येथील कोरोना योद्धा दिवंगत डॉ. प्रतीक्षा वालदेकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. 

              ०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...